आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर याचं निधन अगदी तरूण वयात म्हणजे 33 व्या वर्षी झालं.व्यायामानं बाळशास्त्रीची शरीरयष्टी पिळदार आणि काटक झालेली होती.शिवाय प्रचंड विद्ववान असलेल्या बाळशास्त्रींच्या चेहरयावर विद्वत्तेचं तेज दिसत होतं.परंतू त्यांची जी छायाचित्र माहिती आणि जनसंपर्ककडे उपलब्ध होती त्यात बाळशास्त्री सत्तर वर्षाचे,थकलेले,दुबळे दिसत होते.त्याचं व्यक्तीमत्व त्यांच्या छायाचित्रातून ध्वनित होत नव्हतं.त्यामुळंहे खरे बाळशास्त्रीच नाहीत अशीच कोणाचीही छायाचित्र पाहताच प्रतिक्रिया होत होती.. बाळशास्त्रींचे चुकीचे छायाचित्र दुरूस्त करून घ्या अशी मागणी राज्यातील पत्रकारांकडून सातत्यानं परिषदेकडे होत होती.त्यानुसार एस.एम.देशमुख अध्यक्ष असताना मराठी पत्रकार परिषदेने मुकुंद बहुलेकर या छायाचित्रकाराकडून बाळशास्त्रींचे छायाचित्र काढून घेतले.या छायाचित्राचं प्रकाशन पुण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते 2000मध्ये करण्यात आले.आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी हेच खरे बाळशास्त्री असे उद्दगार काढत छायाचित्रकार बहुलेकर यांचा स्वहस्ते सत्कारही केला होता.
बाळासाहेबांनी मान्यतेची मोहर उमटविल्यानंतर परिषदेने हेच छायाचित्र वापरायला सुरूवात केली.महाराष्ट्र सरकारनं देखील चुकीचं छायाचित्र वापरायचे सोडून बाळासाहेबांनी मान्यता दिलेलंच छायाचित्र वापरावे यासाठी 2000 पासून परिषद सरकार दरबारी पाठपुरावा करीत राहिली..सरकार जाहिरातीत आणि अन्यत्र वापरत असलेले बाळशास्त्री जांभेकर याचं छायाचित्र चुकीचं आहे ते बदललं जावं अशी विनंती पत्रे अनेकदा दिली गेली.मात्र केवळ परिषदेबद्दलच्या आकसातून काही अधिकारी वास्तवाकडं दुर्लक्ष करीत चुकीचं छायाचित्र जाहिरातीत आणि अन्यत्र वापरत राहिले .
आज माहिती आणि जनसंपर्कने राज्यातील पत्रकारांना सुखद धक्का दिला.पत्रकार दिनाच्या निमित्तानं बाळशास्त्रींना अभिवादन करणार्या ज्या जाहिराती विविध दैनिकातून प्रसिध्द केल्या गेल्या आहेत त्यात प्रथमच बाळासाहेबांनी मान्यतेची मोहर उठविलेले योग्य असे छायाचित्र वापरले आहे.त्याबद्दल माहिती आणि जनसंपर्क विभागाला धन्यवाद दिलेच पाहिजेत.सरकार बदलल्यामुळं हा बदल झालाय का ? माहिती नाही पण जो बदल झालाय त्याचं स्वागत करावं लागेल.कारण गेली 18 वर्षे आम्ही छायाचित्र बदलावे म्हणून पाठपुरावा करीत होतो.ती मागणी आज मान्य झालीय.पत्रकार संरक्षण कायद्यासााठी बारा वर्षे लढावे लागले,पेन्शनसाठी 20 वर्षे आणि बाळशास्त्रींचे रास्त तेच छायाचित्र सरकारने वापरावे यामागणीसाठी अठरा वर्षे पाठपुरावा करावा लागला.म्हणजे पत्रकारांची कोणतीच मागणी सहजासहजी मान्य होत नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
खैर देरसे आये दुरूस्त आये अशीच आमची आजची भावना आहे.योग्य निर्णयाचं स्वागत करण्याची भूमिका नेहमीच परिषदेने घेतलेली असल्यानं बाळशास्त्रीचं योग्य असे छायाचित्र वापरण्याचा जो निर्णय माहिती आणि जनसंपर्कने घेतला आहे त्याबद्दल विभागाचे आणि सरकारचे मनापासून आभार.राज्यातील सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी देखील सरकारने आज जाहिरातीत वापरलेलेच बाळशास्त्री यांचे छायााचित्र वापरावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.