एस.एम.देशमुख,किरण नाईक यांचा
17 ला रायगडमध्ये भव्य सत्कार

पनवेल ः पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी सतत बारा वर्षे लढा देणारे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख आणि परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांचा रायगड प्रेस क्लबच्यावतीने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर सत्कार करण्यात येणार आहे.पनवेल तालुक्यातील रसायनी मोहपाडा येथील एचओसी कॉलनीत असलेल्या साईबाबा सभागृहात सकाळी 11 वाजता हा सत्कार सोहळा होत आहे.महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार ,राजकीय विश्‍लेषक तथा प्रसिध्द चित्रकार प्रकाश जोशी यांच्या हस्ते देशमुख आणि नाईक यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.
एस.एम.देशमुख याचं रायगडशी असलेलं नातं सर्वांनाच माहिती आहे.रायगडमधील पत्रकारांना एकजूट करण्यापासून ते मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणापर्यंत देशमुख यांनी अनेक प्रश्‍न धसास लावले.रायगडमधील तरूण पत्रकारांची पिढी घडविण्यात देशमुख यांचा मोठा वाटा आहे.त्यामुळं एस.एम.देशमुख यांना सन्मानित करत असताना जिल्हयातील जास्तीत जास्त पत्रकारांनी कार्यक्रमास उपस्थित राहून एस.एम.देशमुख यांच्यावरील प्रेम व्यक्त करावे असे आवाहन परिषदेचे कोकण विभागीय चिटणीस विजय मोकल,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे.सरचिटणीस शशिकांत मोरे आणि कार्याध्यक्ष भारत रांजनकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY