अलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण होणार

0
722

मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ आता अलिबाग वडखळ मार्गाचेही चौपदरीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने २२ किलोमीटरच्या या मार्गाच्या रुंदीकरणाला तत्त्वत: मान्यता दिली असून, या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या कामाबरोबरच आता अलिबाग ते वडखळ या मार्गाच्या रुंदीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. २२ किलोमीटरच्या या रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यापूर्वीच राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला होता. यानंतर मुंबई- गोवा महामार्गाबरोबरच या मार्गाचे रुंदीकरण करण्यास केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शवली होती.
यानुसार या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी ध्रुव इंजिनीअरिंग या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यानुसार हा अहवाल तयार करण्यात आला. २२ किलोमीटरच्या या मार्गावर शहाबाज ते अंबेघरदरम्यान बाह्य़वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला. तर काल्रेिखड येथे अस्तित्वात असलेल्या रस्त्याऐवजी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय या मार्गावर धरमतर खाडी येथे विद्यमान पुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या मार्गावरील असणारी पेझारी, पोयनाड आणि शहाबाज ही गावे नवीन महामार्गात येणार नाही. त्यामुळे या गावात रस्त्यालगत असणारी नागरी वस्तीचे विस्थापनही होणार नाही.
प्रकल्पाची अंदाजे किंमत ६०० कोटींच्या घरात असून यातील ३०० कोटींची रक्कम ही काल्रेिखड येथील भुयारी मार्ग आणि धरमतर येथील पुलासाठी खर्ची पडणार आहे. उर्वरित ३०० कोटी हे भूसंपादन आणि रस्ता बांधकामासाठी खर्च होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रीटचा असणार आहे. विद्यमान मार्गावरील तीव्र वळण आणि चढाव काढले जाणार आहेत. त्यामुळे अलिबाग ते वडखळ हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. कमीत कमी विस्थापनाचा पर्याय स्वीकारून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तर नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे जी जागा संपादित केली जाईल, त्या जागेला चौपट भाव मिळणार आहे. भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास दोन वर्षांत चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
प्रकल्पाच्या प्राथमिक अहवालाचे नुकतेच अलिबाग येथे सादरीकरण करण्यात आले. या वेळी आमदार जयंत पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुरवसे, तसेच प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सदस्य उपस्थित होते. या चौपदरीकरणामुळे अलिबागच्या विकासाला गती मिळू शकेल, असा विश्वास शेकाप आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी सहकार्य करावे, जेणे करून अलिबाग ते वडखळ मार्गाच्या कामाला गती मिळू शकेल, असे आवाहन शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केले.

अलिबाग ते वडखळ प्रस्तावित चौपदरी मार्गाची वैशिष्टय़े
’ मार्गाची लांबी २२ किलोमीटर
’ प्रकल्पाची अंदाजे किमत ६०० कोटी
’ शहाबाज ते आंबेघरदरम्यान बायपास ५.४ किलोमीटर
’ काल्रेिखड येथे तीन लेनचा भुयारी मार्ग २.२ किलोमीटर
’ धरमतर खाडी येथे दुपदरी पूल
’ डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटचा रस्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here