कोविड लस द्या,मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना  आर्थिक मदत करा.या मागण्यांसाठी 

राज्यातील पत्रकारांचे 5 एप्रिल रोजी 

इ-मेल पाठवा आंदोलन  

मुंबई दि.31 मार्च ः सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोविड व्हॅक्शीन द्यावे,कोविड-19 ने राज्यातील ज्या 72 पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत द्यावी,पत्रकार सन्मान  योजनेचे निकष बदलून गरजू पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदे्च्यावतीने 5 एप्रिल 2021 रोजी  इ-मेल पाठवा आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.आपल्या मागण्यांसाठी राज्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांच्यावतीने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,माहिती , जनसंपर्क राज्यमंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक यांना 500 मेल पाठविण्यात येणार आहेत.तसेच आपल्या तालुक्याचे आमदार आणि जिल्हयाचे पालकमंत्री यांनाही हे मेल पाठविण्यात येणार आहेत. इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख ,किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी आदिंनी केले आहे..गुगल मिटवर मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकार्‍यांची आज बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनानं कहर केला आहे.त्याचा फटका फ्रंन्टवर असलेल्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.पत्रकारांचे कुटुंबंच्या कुटुंबं बाधित होताना दिसत आहेत.राज्यात ऑगस्ट 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत कोरोनानं 72 पत्रकारांचे बळी घेतले आहेत.800 वर पत्रकार बाधित झाले आहेत.आजही राज्यात किंमान शंभर पत्रकार विविध रूग्णालायात उपचार घेत आहेत.कोरोना योध्दे असलेल्या “पत्रकारांना प्राधांन्याने लस द्यावी” अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने वारंवार केल्यानंतर देखील सरकारने त्याची दखल घेतली नाही.तसेच राजेश टोपे यांनी कोरोनानं मृत झालेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा खामगाव येथे केली होती.मात्र पन्नास लाख सोडा,पन्नास हजारांची मदत देखील एकाही दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मिळालेली नाही.याबद्दल बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त केली गेली आणि या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या कोरोनाची स्थिती असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा सरकारमधील प्रमुखांना जास्तीत जास्त इ मेल पाठवून आपल्या भावना आणि संताप सरकारच्या कानावर घालाव्यात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री ,महासंचालक यांना इ-मेल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हा संघ आपल्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने आणि त्यांच्या लेटरहेडवरून हे मेल पाठवतील.त्यात वरील मागण्यांसोबतच बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे निकष बदलण्याची आणि जास्तीत जास्त गरजू पत्रकारांना सन्मान योजनेचे लाभ मिळवून देण्याची  मागणी करण्यात येणार आहे.

दोन महिने सर्व कार्यक्रम रद्द

मराठी पत्रकार परिषदेचे व्दैवार्षिक अधिवेशन मे मध्ये होणार होते.मात्र तेअनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात  आले आहे.तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व कार्यक्रम बैठका दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.पत्रकारांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे..सरकारने वरील मागण्यांच्या संदर्भात 15 एप्रिल पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यातील पत्रकार एक दिवसाचे राज्यव्यापी आत्मक्लेष आंदोलन करतील असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.आजच्या या ऑनलाईन बैठकीस राजेंद्र काळे (बुलढाणा ) बापुसाहेब गोरे (पुणे) अनिल महाजन ,अनिल वाघमारे ,विशाल साळुंके ( बीड ) विजय मोकल ( रायगड ) मन्सुरभाई ( नगर ) तसेच अन्य जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत अगोदर गेल्या आठ महिन्यात कोरोनां बळी पडलेल्या पत्रकारांना ऋध्दांजली वाहण्यात आली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here