2 ऑक्टोबर रोजी पंचवीस हजार पत्रकार रस्त्यावर उतरणार

0
864

halla-photo-2पत्रकार संरक्षण कायदा करण्यास केली जात असलेली टाळाटाळ,

पत्रकारांवर दाखल केले जात असलेले खोटे गुन्हे याच्या निषेधार्थ,

2 ऑक्टोबर रोजी राज्यातील पंचवीस हजार पत्रकार रस्त्यावर उतरणारः प्रत्येक जिल्हयात होणार निर्धार मोर्चे

मुंबई, दिनांक 20 ( प्रतिनिधी )
पत्रकारांवर होत असलेले हल्ले, पत्रकार संरक्षण कायदा करण्यात सरकार जाणीवपूर्वक करीत असलेली टाळाटाळ आणि माध्यम प्रतिनिधाना बनावट गंभीर गुन्हयांखाली अडकविण्याचे राज्यात सर्रास होत असलेले प्रयत्न याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 2016 रोजी राज्यभर पत्रकार निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध पत्रकार संघटना आणि त्यांचे पंचवीसेक हजार पत्रकार प्रत्येक जिल्हयात होणार्‍या या मोर्चात सहभागी होणार आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या काल मुंबईतील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख होते. विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी तसेच मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार या बैठकीस उपस्थित होते.

महाराष्ट्रात पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळावे या मागणीसाठी गेली आठ वर्षे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली जात आहेत.मात्र सरकार पत्रकारांना केवळ कोरडी आश्‍वासनं देत आलेले आहे. विद्यमान सरकारनेही कायद्याचा मसुदा तयार केला असला तरी तो गेली आठ महिने धूळखात पडून आहे. सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्याने दर चार दिवसाला एका पत्रकारावर राज्यात हल्ला होत आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल 62 पत्रकारांवर शारीरिक हल्ले झाले आहेत. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा अत्यंत चिंताजनक प्रघात पडत चालला असल्याने पत्रकारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या आठ महिन्यात 32 पत्रकारांवर बलात्कार, विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी, खंडणीखोरी सारखे खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांना त्रस्त कऱण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांची राज्यात मुस्कटदाबी होत असताना सरकार हे सारे तटस्थपणे आणि निर्विकारपणे बघत बसले आहे त्याबद्दलही बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. एकीकडे सरकार डॉक्टरांना कायदेशीर संरक्षण देते, जोडीला आता शासकीय अधिकार्‍यांसाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असताना सरकार पत्रकारांच्या तोंडाला मात्र पाने पुसत असल्याने सर्वच उपस्थितांनी या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करीत जेल भरो सारखे आंदोलन करावे अशी सूचना केली. मात्र सर्वानुमते गांधी जयतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी पत्रकार निर्धार मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हयाच्या मुख्यालयात पत्रकार शहरातून मोर्चे काढतील आणि जेथे गांधीजींचे पुतळे आहेत तेथे ते मोर्चाने जाऊन गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करतील. या दिवशी सुटी असल्याने शासकीय कार्यालयं बंद असतील. मात्र, जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार उपलब्ध झाले तर त्यांना निवेदन दिले जाईल किंवा अशी निवेदनं फॅक्सनं, मेलने पाठविण्यात येतील.
मुंबईत सकाळी 9 वाजता पत्रकार गांधी पुतळ्याजवळ हाताला काळ्या रिबिन लावून जमतील, गाधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून पत्रकार मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना कायदा करण्याबाबत आग्रह धरतील.

प्रत्येक जिल्हयात होणार्‍या या मोर्चांमध्ये सर्व संघटनांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन सोळा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केले आहे. कालच्या बैठकीस चाळीस पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या वाढत्या प्रकारांना कसे तोंड देता येईल यावरही चर्चा होऊन एक पाच कलमी कार्यक्रमही नक्की करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here