पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत.आता महिला पत्रकारही सातत्यानं हल्ल्याच्या ,विनयभंगाच्या शिकार होताना दिसत आहेत.इंदोरमधील संयोगितगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिला पत्रकाराला केंद्रीय विद्यालयात अनेक तास डांबून ठेवण्यात आल्याची ताजी बातमी हाती आली आङे.
महिला पत्रकार श्रुती माहवाह शाळेच्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी शाळेत गेली होती.व्यवस्थापनाला विचारूनच ही महिला पत्रकार पाचवीच्या वर्गात गेली.तेथे पुस्तकातील काही फोटो आपल्या कॅमेऱ्यांनी घेत असताना तेथील स्टाफने त्याला आक्षेप घेतला.त्यानंतर श्रुतीला व्हाईस प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये आणले गेले.तेथे गेल्यावर आपल्या मोबाईलमधून तिने प्रिन्सिपलबरोबरची चर्चा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पत्रकार महिलेकडचा मोबाईल काढून घेण्याचा आदेश प्रिन्सिपलने पुरूष कर्मचाऱ्यांना दिला.त्यानंतर पार्किंग एरियामध्येही सात-आठ कर्मचाऱ्यांनी पत्रकार महिलेस घेरले आणि तिला डांबून ठेवले गेले.तिच्याशी असभ्य वागणूक केली.त्यानंतर श्रुतीने आपल्या ऑफिसला फोन केला.तेथून याची माहिती पोलिसांना दिली गेल्यानंतर पोलिस आले आणि डांबून ठेवलेल्या श्रुतीची मुक्तता केली.श्रुतीने पोलिसात तक्रार दिली असून डांबून ठेवणे,जिवे मारण्याचा प्रयत्न करने आदि आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.