मग्रुर पाशा पटेल यांना अखेर अटक

0
3118

 

लातूर ः लातूर येथील तरूण पत्रकार विष्णू बुरगे याने तक्रार दाखल करण्याची दाखविलेली हिंमत आणि राज्यातील पत्रकार खंबीरपणे विष्णूच्या पाठिशी उभे राहिल्याने अखेर आज पोलिसांना भाजपचे मस्तवाल नेते पाशा पटेल यांना अटक करावी लागली. अटक केल्यानंतर त्यांना लेगच जामिन मिळाला असला तरी त्यांच्या अटकेने एका सामांन्य पत्रकाराने एका मग्रुर नेत्याच्या विरोधात सुरू केलेली लढाई यशस्वी झाली असे म्हणता येईल.विष्णू बुरगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.आपण थोडी हिंमत आणि एकजूट दाखविली तर असा मग्रुर नेत्यांना आपण सरळ करू शकतो हा संदेश या निमित्तानं गेला आहे.एबीपी माझानं पाशा पटेल यांच्या अटकेचे वृत्त थोडयावेळा पूर्वी दिले आहे.
लातूर येथील महाराष्ट वनचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी बसून पाशा पटेल यांना पेट्रोल दर वाढीच्याबद्दल प्रश्‍न विचारला होता.त्यामुळं संतप्त झालेल्या पाशा पटेल यांनी कोणत्याही सभ्य माणसाला शोभणार नाही अशा अर्वाच्च शब्दात विष्णूला शिविगाळ केली होती.त्याची क्लीप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.पाशा पटेल यांचा सर्वत्र निषेध केला गेला.मात्र आज पहाटे गुन्हा दाखल होऊनही पाशा पटेल यांना अटक होत नव्हती.त्यामुळे कारवाई होणार की नाही अशी भिती व्यक्त होत होती.ही बाब लातूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निदर्शनास आणून देत अटक झाली नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने दिला गेला होता.त्यानंतर आज सायंकाळी पाशा पटेल यांना पोलिसांनी अटक केली.नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी पत्रकाराला शिव्या घातल्या तरी अटक होऊ शकते हा संदेश गेला आहे.
प्रकरण अंगलट येणार असे दिसल्यानंतर नेहमीची ठेवणीतली भाषा पाशा पटेल यांनी सुरू केली होती.माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा टाहो त्यांनी फोडला होता.एक सामांन्य पत्रकार पाशा पटेल यांच्या विरोधात काय म्हणून षडंयंत्र उभारेल याचं उत्तर मात्र त्यांना देत येत नव्हतं.अगोदर मी विष्णूला ओळखत नाही म्हणणारे पाशा पटेल नंतर षडंयंत्रापर्यंत पोहोचले.आता ते मी माफी मागणार नाही अशी भाषा करीत आहेत.’पाशा पटेल तुम्ही माफी मागूच नका,पण लक्षात ठेवा जनता आणि पत्रकार तुम्हाला या शिविगाळीबद्दल कधीच माफ करणार नाही.सभ्य माणसं चुकीची माफी मागतात,तुमच्यामध्ये तेवढी सभ्यता नसल्याने आम्ही तुमच्याकडून अशी काही अपेक्षा करीत नाही’.
दरम्यान पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने हा सारा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातला असून पाशा पटेल यांच्याकडील बिनकामाचे कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्षपदा काढून घ्यावे अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
दरम्यान मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव अनिल महाजन उद्या लातूरला जात असून विष्णू बुरगे यांची ते भेट घेऊन त्याचं अभिनंदन करतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार तुझ्या पाठिशी असल्याचा विश्‍वास देतील.

या प्रकरणात विष्णू बुरगे प्रकरणी राज्यातील वाहिन्या,सर्व वृत्तपत्रे,पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकार बुरगे बरोबर राहिले.त्याबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here