अखेरचे तीन दिवस आणि आम्ही…

3
2184

5,6 आणि 7 एप्रिल २०१७  हे तीन  दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे तसेच अत्यंत धावपळीचे ठरले.खरं म्हणजे 5 तारखेला माझ्या काकांचा चौदावा होता.तिकडं जाणं आवश्यक होतं.मात्र किरण नाईक, प्रसाद काथे, विनोद जगदाळे  आणि अन्य मित्रांनी सूचना केली की, ‘हे तीन दिवस राज्यातील पत्रकारांसाठी महत्वाचे असल्यानं तुम्ही मुंबईत या’ .हे खरंय की,मी मुंबईतजावून विधानसभेत बसू शकत नव्हतो.पण जे बसतात त्यांच्याकडं आपल्या प्रश्‍नांसाठी आग्रह धरून त्यांना विनंती तर करू शकत होतो ?.आम्हाला तेच करायचे होते.त्यामुळं भावनेला थोडा आवर घालत,घरच्यांची नाराजी पत्करत मी मुंबईला गेलो.5 तारखेला विधान परिषदेत पत्रकार हल्ल्यांबाबत संजय दत्त आणि अन्य सदस्यांनी दाखल केलेल्या लक्षवेधीवर चर्चा होती.सदस्यांचा आग्रह होता की,विषयाचं महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन या लक्षवेधीवर राज्यमंत्र्यांनी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं.त्यामुळं सभापतींनी ही लक्षवेधी राखून ठेवली.मात्र आ.संजय दत्त यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न करूनही मुख्यमंत्री काही सभागृहात येऊ शकले नाहीत.परिणामतः  चर्चा झालीच नाही.आमचा पहिला दिवस निराशेचाच ठरला.दिवसभरात अनेकांच्या भेटी घेतल्या.विशेषतः विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,राधाकृष्ण विखे पाटील,ज्यांनी आपल्या प्रश्‍नाचा सातत्यानं पाठपुरावा केला ते संजय दत्त यांच्या भेटी घेतल्या.त्यांना विषय पटवून दिला.विधान भवन परिसरात दिसेल त्या आमदाराना मदत करण्याची विनंती करीत होतो.तरीही हाती काहीच लागत नव्हतं.सहा वाजता मी थकलो.कारण कोणीच स्पष्ट काही बोलत नव्हतं.’पाहतो ,करतो,बघतो’ हीच उत्तरं ऐकायला मिळत होती.काय करणार आहात हे एकदा मुख्यमंत्र्यांना भेटूनच विचारू असं ठरलं पण त्यांची भेट झाली नाही.परिणामतः हात हलवत भावाच्या घरी परतलो.

 राखून ठेवलेल्या लक्षवेधीवर दुसर्‍या दिवशी विशेष बैठकीत चर्चा होणार होती.त्यामुळं सात वाजताच तयार होऊन ‘आपलं काय म्हणणं आहे ते आ.संजय दत्त आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून कळविलं’.काय मुद्दे मांडावेत याबाबतही बोललो.साडेसात वाजता घरातून बाहेर पडलो.मुंबईतल्या प्रवासाची सवय नाही.एरोलीवरून ट्रेन पकडा,ठाण्याला उतरा,तेथून सीएसटी पर्यंत तेथून टॅक्शी पकडून विधान भवनात पोहोचायला साडेदहा वाजले.ठाणे ते मुंबई हा प्रवास एका पायावर उभा राहूनच केला.गर्दीची सवय नसल्यांनं जीव कोंडल्यासारखा होत होता.सीएसटीला उतरलो तर टॅक्शीच मिळेना.मग बस पकडली अन विधान भवन गाठले.तोपर्यंत चर्चा सुरू झाली होती.मुख्यमंत्र्यांनी ‘कायद्याचं विधेयक याच अधिवेशनात मांडण्याचं आणि पत्रकार पेन्शनबाबतही सकारात्मक भूमिका घेत असल्याचं आश्‍वासन दिलं’ होतं.मात्र या आश्‍वासनानं माझं समाधान होत नव्हतं.पुन्हा गाठी भेटी सुरू झाल्या.आशिष शेलार यांना भेटलोत.’आमच्या काही हाती लागणार आहे का’? असा प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी ‘माझा पाठपुरावा सुरू असल्याचं’ सांगितलं.पुन्हा दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली.मात्र विधेयक येणार की नाही याचं चित्र स्पष्ट होत नव्हतं.विधान मंडळाचे सचिव कळसे साहेब यांचीही भेट घेतली.मात्र निराशाच हाती लागली.एकच दिवस उरला होता आणि काहीच कळत नव्हतं.शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाभोवतीच अधिवेशन फिरत असल्यानं आपल्या विषयाकडं दुर्लक्षच होणार हे दिसत होतं.चार-साडेचारला किरण नाईक आणि मी दोघेही कंटाळलो.निराशही झालो.आता थांबूनही काही उपयोग नव्हता.मी निघालो.सीएसटीवरून पुन्हा गाडी पकडली.सुदैवानं बसायला जागा मिळाली अऩ लगेच डोळाही लागला.साधारणतःगाडी कुर्ल्यापर्यंत पोहोचली असेल .तेवढ्यात कमलेश सुतार यांचा फोन आला.’एसेम,गुड न्यूज आहे.मंत्रिमंडळ बैठकीत कायद्याच्या विधेयकाला मंजुरी मिळाली.अभिनंदन’.कमलेश सुतार यांचे हे शब्द माझा नूर पालटून टाकणारे ठरले.झोप पळाली.वाटलं,ट्रेनमधून उतरावं आणि पळत पळत विधान भवन गाठावं.कमालीचा आनंद झाला होता.पहिली पायरी तर जिंकली होती.पुढं अनेक पायर्‍या होत्या हे जरी खरं असलं तरी कॅबिनेटमधील काहींचा विरोध असताना कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी बिल मंजूर करून घेतलं होतं हे बिलाच्या पुढील वाटचालीसाठी फारच महत्वाचं होतं. ही आनंदाची बातमी महाराष्ट्रभर कळली पाहिजे म्हणून लगेच व्हॉटसअ‍ॅप सुरू केले.पाच मिनिटात ही बातमी महाराष्ट्राला कळली होती.अभिनंदनाचे फान येऊ लागले..आमच्या काही मित्रांची हा कायदा होताच कामा नये अशी तीव्र इच्छा असल्यानं आमच्या मेसेजवर प्रती मेसेज फिरू लागले.’आता कुठं मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालीय या अधिवेशनात हे विधेयक मांडले जात नाही,पावसाळी अधिवेशनापर्यंत वाट पाहावी लागेल’ वगैरे . .मला मात्र खात्री होती की,आता विधेयक तर नक्की मांडले जाणार.कॅबिनेटच्या मंजुरीच्या बातम्या सर्वत्र झळकल्या.दुसर्‍या दिवशी  सात तारखेला बरोबर दहा वाजता मी आणि किरण नाईक विधान भवनात पोहोचलो कार्यक्रम पत्रिकेवर विषय होता.त्यामुळं फार कुठं न फिरता प्रेस रूममधील टीव्ही समोरच बसून राहिलो.बरोबर 11.35 ला रणजीत पाटील यांनी विधान सभेत विधेयक माडलं आणि प्रेस रूममध्ये उपस्थित सर्वांनी बाकडी वाजवून आनंद व्यक्त केला.मग पुन्हा शंकासुरांनी प्रश्‍न उपस्थित करणे सुरू केलं.’बिल तर मांडलंय,पण त्यावर चर्चा होणं ते मंजूर होणं मग ते परिषदेत जाणं आणि तिथं पुन्हा मंजूर होणं हे सारं एका दिवसात होत नाही पर्यायानं कायदा होत नाही’ .हे खरंही होतं पण बोलणाराचा सूर हा ‘कायदा होऊच नये आणि तळ ठोकून बसलेल्यांची जिरावी’ असा होता.माझा नियतीवर आणि माझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्‍वास असल्यानं कोण काय बोलतंय याकडं लक्ष न देता मी वाट पहात बसलो.या काळात किरण नाईक,विनोद जगदाळे,प्रसाद काथे,इंदरकुमार जैन आम्ही दोन-तीन वेळा पोटोबा करून आलो.अखेर मुख्यमंत्री सभागृहात आले आणि त्यांनी प्रस्ताव मांडला.कोणतीही चर्चा न होता तो मंजूर झाला आणि बिलाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार पडला.त्यानंतर चॅनलवाल्यांनी मला बाईटसाठी बोलावलं.त्याच वेळेस आमचे एक परममित्र म्हणाले,’बाईट कसला घेताय,विधान सभेत मंजुर झालं तरी ते विधान परिषदेत येत नाही’.पण हे सारं उसणं आवसान होतं.दोन्हीकडं बिल पास होणार याची खात्री मित्रांनाही होती.झालंही तसंच.विधान परिषदेतही बिल मंजूर झालं.पुन्हा प्रेस रूममध्ये बाकडी आणि टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं गेलं. प्रेस रूममधील उपस्थितांपैकी बहुतेक मित्रांनी माझं अभिनंदन केलं.माझे डोळे पाण्यानं डबडबून गेले.पाच मिनिटं मी डोळे झाकून बसलो.खरंच कायदा झालाय की,मी स्वप्नात आहे हे मला समजत नव्हतं.कारण कामच तेवढं अवघड होतं.देशात कुठल्याच राज्यात जो कायदा नाही ते आम्ही मागत होतो.शिवाय त्यालाही आमच्यामधीलच काही व्हाईट कॉलर मंडळींचा विरोध होता.अशा स्थितीत ही लढाई सोपी नव्हती.म्हणूनच ती जिंकल्यानंतरही हे सत्यय की स्वप्नय असा भास होत होता.पण जे घडत होतं ते सत्य होतं.राज्यातील पत्रकारांचा ऐतिहासिक विजय झाला होता.एखादया मागणीसाठी पत्रकार सतत बारा वर्षे लढले आणि ती मागणी शांततेच्या मागार्र्नं आंदोलनं करून पूर्ण करून घेतली हे देशातील पहिलं उदाहरण होतं.या बारा वर्षात आंदोलनामुळं एकही पत्रकार अडचणीत येणार नाही याची काळजी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं घेतली होती.अनेकजण आम्हाला उचकावत होते.आंदोलनाचे मार्ग सांगत होते.तृप्ती देसाई स्टाइलचं आंदोलन होऊ द्याच्या सूचना केल्या जात होत्या.समितीनं यापैकी काही केलं नाही.अहिंसक मार्गानं सारा लढा लढला आणि तो जिंकला होता.त्याचा आनंद अश्रूच्या माध्यमातून मोकळा करीत होतो. किरण नाईकांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती.

एखादी गोष्ट करायची हे सरकारनं ठरविलं तर काय होऊ शकतं हे आम्ही डोळ्यानं पहात होतो आणि अनुभवतही होतं.बिलाला पाय लावल्यासारखं ते फटाफट इकडून तिकडं पळत होतं.मग प्रेस रूममध्ये विनोद सुरू झाले.एका पत्रकारानं दुसर्‍यावर हल्ला केला तर कायद्याचं संरक्षण कुणाला मिळणार असा प्रश्‍न एकजण विचारत होता तर नवरा आणि बायको दोघेही पत्रकार असतील तर एकानं दुसर्‍याला मारलं तर गुन्हा कुणावर दाखल होणार वगैरे.काही क्षणातच ही बातमी महाराष्ट्रभर पोहोचली.सगळीकडं आनंदोत्सव सुरू झाला.बीडमध्ये तोफा उडविल्या गेल्या.वाशिममध्ये फटाके वाजले.नाशिकमध्ये पेढे वाटले गेले,नांदेडमध्ये बॅन्ंड लावून आनंद व्यक्त केला गेला.क्षणही तसाच होता.एक तप पत्रकार ही लढाई लढत होते.सरकारं येत होती,जात होती.कायद्याचा पाळणा हालत नव्हतां.आश्‍वासनाची एवढी सवय झाली होती की,कोण काय बोलणार हे पाठ झालं होतं.आशा निराशेच्या हिंदोळ्यावर आम्ही हेलकावे खात होतों.त्यातच केजमध्ये एका कार्यक्रमात बोलताना विनायक मेटे यांनी  आमचं टेन्शन आणखीनच वाढविलं होतं.’देशमुख तुम्ही हयात असेपर्यंत कायदा होत नाही’ असं त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं होतं.राज्यातील पत्रकाराना सरकारच्या विरोधात उचकविण्याचा हा प्रयत्न होता की,खरंच तशी स्थिती आहे हे उमगत नव्हतं.त्याअगोदरही अनेकजणांनी तुम्ही खडकावर डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न करताय असं म्हटलं होतं.हे सरकार केवळ आश्‍वासन देणारं आहे,ते पाळणारं नाही असंही म्हटलं जात होतं.काहीजण म्हणत होते,कायदा झाालाच तर निवडणुकांच्या तोंडावर होईल.सकारात्मक कोणी बोलतच नव्हतं.मात्र मी निराश होणार्‍यांपैकी नाही.लढणारा आहे.मुंबई-गोवा महामार्गासाठीचं आंदोलन लढताना काही रडे असेच नकारात्मक बोलत होते.मात्र तिकडंही आम्ही थांबलो नाहीत.लढलोत आणि जिंकलोत.सहा वर्षानंतर का होईना सरकारला आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली.महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं.पेणमध्ये माझा जंगी सत्कार झाला.दैनिक सागरचे संपादक निशिकांत जोशी यांनी माझा दोन कॉलम फोटो टाकून पानभर लेख माझ्यावर लिहिला.’मराठवाड्यातून आलेला पत्रकार कोकणासाठी लढला’ असं शिर्षक होतं लेखाचं..मुंबई-गोवा महामार्गासाठीची लढाई सुरू असतानाच कायद्याची लढाई सुरू केली होती.दोन्ही पातळ्यावर लढत होतो .आज मी यासाठी आनंदीत आहे की,अशक्य वाटणारे दोन्ही प्रश्‍न मार्गी लागले आहेत.मुंबई-गोवा महामार्गामुळं कोकणाच्या विकासाला चालणा मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे ज्या रस्त्यावर दररोज दीड माणसं मरायची तो रस्ता निर्धोक होणार आहे.दुसऱीकडं कायद्यामुळं पत्रकारांवरील हल्ले नक्कीच थांबतील.हल्ला केला तर थेट पोलीस कस्टडी आणि गुन्हा सिध्द झाला तर तीन वर्षे बाजारभावानं जाल हे एव्हाना लोकांना कळल्यानं हल्ले होणार नाहीत.पत्रकारांना निर्भयपणे काम करता येईल.कायदा झाला पाहिजे असा माझा आग्रह होता.तो पूर्ण झाला.कायदा केल्याबद्दल मुखय्मंत्र्यांचे आभार मानणं आवश्यक होतं.साडेपाच पासून रात्री नऊ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पााहात बसलोत.नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रेस रूममध्ये आले.दिलीप सपाटे यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीनं आभार मानले.मी आणि किरण नाईक यांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुप्पगुच्छ देऊन मुख्यंमंत्र्यांना धन्यवाद दिले.आज राज्यातून आभाराचे हजारो एसएमएस पाठविले गेले.मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला होता.बारा वर्षाची तपश्‍चर्या मुख्यमंत्रेी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळ फळास येत होती.पत्रकार संरक्षण कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलं आहे.तळ ठोकून लॉबिंग ( चांगल्या अर्थानं ) करता आलं.त्याअर्थानं माझा मुंबई मुक्काम फलद्रुप ठरला.आम्ही दहा-बाराच्या गटानं फिरत असल्यानं समोरच्यावर दबाव येत होता.वातावरण निर्मितीसाठी हे सारं आवश्यक होतं.किरण नाईक,प्रफुल्ल मारपकवार, प्रसाद काथे,विनोद जगदाळे आणि मुंबईतील इतर बरेच मित्र होतेच तिसर्‍या दिवशी मिलिंद अष्टीवकर आणि नांंदेडचे विजय जोशी यांना मुद्दाम बोलावून घेतलं होतं.थोडं राजकारण आम्हीही शिकलो होतो.

आता या कायद्याचं श्रेय कुणाचं याची निरर्थक चर्चा सुरू केली गेलीय.बारा वर्षात जे कधी कुठेच दिसले नाहीत असेही ‘माझ्याच मुळं’चा नारा देत आहेत.जे तमाश्या बघत होते,जे कायद्याची गरजच काय ?चे तुणतुणे वाजवत होते,जे हे अशक्य आहे असं म्हणत होते ते आज कायदा आमच्यामुळंच झालाय असं कोकलताहेत.हे असंच घडत असतं.यशाचे अनेक बाप असतात.समजा काल हा कायदा झाला नसता तर ? ‘एस.एम.देशमुख यांनी ठाण मांडून काय दिवे लावले’? असं म्हणायला मंडळी मोकळी होती.बोलणारांचं काय दोन्ही बाजुनं ते बोलतात.जे मैदानात असतात त्याना दुःख माहिती असतात.नागपूरला मी आणि किरण नाईक 12-12-12 ला जेव्हा आमरण उपोषणाला बसलो होतो तेव्हा लढो म्हणणारे अनेक होते.उपोषणस्थळी सकाळी 50-60 जण होते,दुपारी चारपर्यंत ही संख्या 25 पर्यंत आली.सात वाजेपर्यंत 10-12जणच उरले आणि रात्री आठ नंतर मंडपात मी आणि किरण नाईक दोघेच उरलो.कासवछाप आणायलाही आमच्याजवळ कोणी नव्हते.थंडी आणि मच्छरांचा मारा सहन करीत रात्र काढली.ती रात्र अजूनही विसरलो नाही..8 मे 2013 च्या पनवेल वर्षा रॅली सकाळी 11 वाजता निघणार होती.11 वाजले तरी दहा पत्रकारही नव्हते.तेव्हा माझा बीपी वाढला होता.नंतर ही संख्या 300 वर गेली पण देशमुख श्रेय घेतात म्हणणारे तेव्हा तिथं किंवा कोणत्याच लढयात नव्हतें.निषेध किती दिवस करीत राहणार?  ठोस कारवाई करा ? असे घरात बसून  म्हणणारे एकाही आंदोलनात किंवा लढयात नव्हते.आमच्यावर गुन्हे दाखल होत होते,आमची उपेक्षा सुरू होती तेव्हाही पोटदुखे गंमत बघत होते,’देशमुखला काही काम नाही म्हणून ही दुकान (?) चालवतोय’ अशीही टीका केली जात होती.मात्र या टिकेकडं मी लक्ष दिलं नाही.मी विचलितही झालो नाही.मी लढत राहिलो.राज्यातील पत्रकारांचा माझ्यावर असलेला विश्‍वास हेच माझं बळ होतं.पत्रकारांची खंबीरसाथ माझ्याबरोबर होती.हे यश या एकजुटीचं आहे..चार दोघा पोटदुख्यांची मी पर्वा केली नाही किंवा करणारही नाही.पण सार्‍या महाराष्ट्रातील पत्रकार माझ्याबरोबर होते.मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं माझं एखादया राजकीय पुढार्‍यासारखं जंगी स्वागत होत ंहोतं.यात आपलेपणा होता,प्रेम होतं,हा माणूस आपल्यासाठी लढतोय याची जाणीव होती.यातून मला बळ मिळत होतं..जे या लढ्यात होते त्यांच्यापैकी कोणी प्रश्‍न उपस्थित केला तर मी नक्की उत्तर देईल पण उपटसुंभांना आणि सुपारी घेऊन माझ्याविरोधात राऩ उठविणार्‍यांनी माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी त्याची दखल घेऊन त्याना मोठं करणार नाही.कारण आरोप करणारांचं चरित्र आणि चारित्र्य केवळ मलाच नव्हे तर महाराष्टाला  माहिती आहे.माझ्यामुळं ज्यांचे हितसंबंध धोक्यात आलेत किंवा धोक्यात येत आहेत किंवा ज्याना माझ्याकडून अपेक्षित व्यक्तिगत लाभ लाटता आलेले नाहीत त्यांनी माझ्या आरत्या उतराव्यात अशी तर मी अपेक्षा करू शकत नाही.ते माझ्याविरोधात कंडयाच पिकविणार,वाट्टेल ते आरोप करणार हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.त्यामुळं अशा हितसंबंधियांची मी चिंता का करू.ज्यांनी पत्रकारांच्या संस्थांचे सांगाडे करून टाकले आहेत,ज्यानी अनेक पत्रकारांना आयुष्यातून उठविण्याशिवाय काहीच केलं नाही अशांनी माझ्याविरोधात जरूर कोकलत बसावे,मित्रांनो,याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही.कारण माझी नीती आणि नियत साफ आहे.पत्रकार संरक्षण कायद्याच्या लढाईसाठी ज्यांनी योगदान दिले अशा सर्वांचे आभार.टिकाकारांचेही आभार कारण त्यांच्यामुळंच मला माझं उद्दिष्ट साध्य करण्याची जिद्द मिळते.आपली लढाई यशस्वी झाल्याबद्दल सर्वाचे मनापासून अभिनंदन.

 एस.एम.देशमुख 

3 COMMENTS

  1. सोनपेठ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतिने सर आपनास आपल्या जिद्दीस अब्जो सलाम……………
    आपला.किरण रमेश स्वामी
    मो.9823547752 .
    Email:- kiranswami77@gmail.com

Leave a Reply to Ajay Vajarkar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here