दबावतंत्र ? की खरंच काही शिजतंय ?..

0
2358

क गोष्ट आता अधोरेखीत झालीय की,कॉग्रेसची देशव्यापी सुरू असलेली घसरण आणि मोदी नामााचा वाढता प्रभाव यामुळं पुढील किमान दोन निवडणुका तरी देशात आणि राज्यात कॉग्रेस सत्तेवर येऊ शकत नाही.सामांन्यांना कळलेलं हे सत्य नारायण राणे यांच्यासारख्या धुरंधर राजकीय नेत्याला उमगले नसेल असं म्हणता येणार नाही.कॉग्रेस सत्तेवर येत नाही म्हणजे आपलं स्वप्नही साध्य होत नाही,अशा  स्थितीत ‘इथंला’ मुक्काम वाढवून उपयोग नाही हे वास्तवही नारायण राणे यांच्या लक्षात आलेलं आहे.त्यांच्या अस्वस्थतेचं हे खरं कारण आहे.पक्षात दुर्लक्ष होतंय,किंवा उपेक्षा सुरूय हे निमित्त आहे.पक्ष सत्तेत नसल्यावर सर्वांचीच  उपेक्षा होत असते ,कारण पक्षाकडं कार्यकर्त्यांना देण्यासारखं काहीच उरलेले नसतं. त्यामुळं नारायण राणेंची उपेक्षा सुरूय आणि पृथ्वीराजबाबा,राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना भरभरून दिलं जातंय असं दिसत नाही. म्हणजे तक्रार करायचीच तर सर्वानीच करावी ,पण तसे  नाही.उपेक्षा होत असल्याची तक्रार केवळ नारायण राणे यांचीच आहे.’आपल्याला आपल्या योग्यतेचं मिळत नाही’ हा त्यांचा लाडका सिध्दांत आहे.शिवसेना सोडण्यामागचं त्याचं हेच कारण होतं.नंतर कॉग्रेसमध्ये आल्यावरही मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हटल्यावरही त्यांनी आदळ-आपट केलेली होती.तरीही कॉग्रेसची देशव्यापी वाताहत लक्षात घेऊन नारायण राणेंना चुचकारण्याचंच धोरण कॉग्रेस हायकमांडनं अवलंबिलं होतं.त्यानंतरही प्रत्येक वेळी त्यांना आणि त्यांच्या मुलाना तिकीट देणं,त्यांना मंत्री करणं,विधानसभेत पराभव झाल्यानंतरही आमदार करणं,मुलाला पक्षाचा सरचिटणीस करणं हे सारं पक्षानं त्यांना दिलं.नारायण राणेंना पक्षानं जेवढं दिलं तेवढं खचितच अन्य कोण्या नेत्याला,कार्यकर्त्याला मिळालं असेल.तरीही नारायण राणे असमाधानी असतील तर त्यांच्या नाराजीचं कारण वेगळं असू शकते.’सत्तेशिवाय नारायण राणे राहू शकत नाहीत’ हे त्याचं कारण असू शकतं काय ? शक्यता नाकारता येत नाही.मात्र अशा महत्वाकांक्षेला तात्विकतेचा मुलामा द्यायचा असतो.त्यामुळं ‘अशोक चव्हाण यांच्यामुळं राज्यात पक्षाची वाताहत झाल्याचीं थेरी’ त्यांनी मांडली आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अथवा त्यांची प्रदेशाध्यक्षपदावरू उचलबांगडी करावी अशी राणे यांची मागणी आहे.राणेंच्या मागणीकडं हायकमांडनं पूर्णतः दुर्लक्ष केलंय.कारण अशोक चव्हाण यांचा नैतिकच्या आधारावर राजीनाम ध्यायचा तर मग हे सूत्र राहूल गांधी यांनाही लागू होतंच ना.कॉग्रेसच्या राज्यातील पराभवाला जर अशोक चव्हाण जबाबदार असतील तर देशातील आणि अलिकडं युपीत झालेल्या पक्षाच्या दारूण पराभवाला  राहुल गांधी जबाबदार आहेत आणि म्हणून राजीनामा मागायचाच तर राहूल गांधींचा मागावा लागेल.राणे यांनी अजून तशी मागणी केलेली नाही.’अशोक चव्हाण यांच्या जागी माझी  अध्यक्षपदी निवड व्हावी अशी राणेंची इच्छा असल्याचे’ त्यांचे समर्थक सांगतात.आजच्या घडीला तरी ते शक्य नाही असं दिसतंय.याचं कारण पक्षाला आता राणेंबद्दल विश्‍वास राहिलेला नाही.पक्षाला धाकात ठेवण्याची त्यांची स्टाईल आणि मी म्हणेन तेच झालं पाहिजे अन्यथा  अन्य पर्याय शोधण्याची त्यांची अबोल भाषा यामुळं अशोक चव्हाण यांना बदलले तरी राणे प्रदेशाध्यक्ष होत नाहीत हे नक्की.प्रदेशाध्यक्षपद दिलं नाही की,परत उपेक्षा झाल्याची धून राणे वाजवत राहणार.हे सारं कॉग्रेस हायकमांडला ज्ञात आहे.त्यामुळं गेली दहा-पंधरा दिवस एकटे राणे आणि त्यांचे चिरंजीवच बोलतात.कॉग्रेसकडून कोणीच काही बोलत नाही.त्यांच्या विधानांचा प्रतिवादही केला जात नाही अथवा त्यांची मनधरणी करण्याचाही कोणी प्रयत्न करीत नाही.अशोक चव्हाण यांचं चित्र टाकून ,त्यांना बेपत्ता जाहिर करणार्‍या निलेश राणे यांच्या टिट्ववरही अशोक चव्हाण काहीच बोलले नाहीत.किंवा त्यांना नोटीसही पाठविलेली नाही.राणे पिता-पुत्रांना अनुल्लेखानं मारायचं हे कॉग्रेस नेतृत्वाचं सध्याचं सूत्र असावं.या मौनाचा आणखी अर्थ असाही निघू शकतो की,नारायण राणे यांना भाजप प्रवेशाचं निमित्त द्यायला नको.त्यामुळं ‘नारायण राणे यांना कोठे जायचे तर जावू द्या,त्यांची मिनतवारी करण्याची गरज नाही’ असं पक्षानं ठरविलेलं असू शकतं.राणे यांची पक्षात होत असलेली मानसिक उपेक्षा हे देखील त्यांच्या अस्वस्थतेचं एक कारण असू शकतं.

कॉग्रेसवर काय परिणाम होईल ?

समजा नारायण राणे यांनी पक्ष सोडला तर कॉग्रेसवर त्याचे काय परिणाम होतील ? पहिली गोष्ट सिंधुदुर्गातील पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येईल.त्यानं कॉग्रेसला फार फरक पडेल असं नाही.कारण एवढी पडझड झालेली असताना आणखी एक चिरा निखळला तर कॉग्रेसनं मातम करण्यासारखं त्यात काही नाही.कॉग्रेसला चिंताय ती,राणे भाजपत गेले तर आपल्याबरोबर किती आमदार घेऊन जातील याची.सत्तेअभावी कॉग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या आमदारांचा एक गट आहे.तो नारायण राणे यांच्याही संपर्कात असण्याची शक्यता आहे.त्यामुळं हा सारा लवाजमा घेऊन राणे भाजपमध्ये जातील काय अशी भिती कॉग्रेसला नाही म्हटलं तरी आहेच.ही भिती निराधारही नाही.कारण तश्या बातम्या सातत्यानं येतही असतात.अर्थात काही जण नारायण राणेंबरोबर गेले तरी एक गोष्टी स्पष्टय की,त्यांच्याबरोबर कोणी गेल ंतरी त्यांना आमदारकी मिळवून देण्याची ग्वाही राणे देऊ शकत नाहीत. अनुभव असा आहे की,पक्षांतर केल्यानंतर ज्या पोटनिवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये पक्षांतर केलेले नेते पराभूत झालेले आहेत.नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या समवेत जे आमदार बाहेर पडले ते आज कोठे आहेत ? याची खबर कोणालाच नाही.राजीनामा दिलेले आमदार सिंधुदुर्गात तर जिंकले पण शेजारच्या श्रीवर्धनमध्येही श्याम सावंत एका सामांन्य शिवसैनिकाकडून पराभूत झाले.जे बरोबर आले होते त्यांना परत त्याचं स्थान नारायण राणे मिळवून देऊ शकले नाहीत.त्यामुळं आहे ती आमदारकी सोडून धोका विकत घेण्याची कितीजण तयारी ठेवतील? याची खात्री देता येत नाही.’पोटनिवडणुकीत जे पराभूत होतील अशांना विधान परिषदेवर घेण्यात येईल’ असं गाजर भाजपतर्फे दाखविण्यात आलं असल्याचं सांगितलं जातंय..मात्र ते शक्य नाही.किती लोकांना तुम्ही परिषदेवर घेऊ शकाल? .काल पक्षात आलेल्यांना सारी पदं वाटली तर जे वर्षानुवर्षे पक्षात निष्ठेनं काम करतात त्याचं काय असाही पेच पक्षापुढं निर्माण होऊ शकतो.त्यामुळं केवळ पायावर कुर्‍हाड मारून घ्यायची असेल तरच असा धोका पत्करला जावू शकतो.नारायण राणे किंवा अन्य कोणी सांगतो म्हणून असं होण्याची शक्यता नाही.दुसरा मुद्दा असाही आहे की,राणे जर चार-दोन आमदारांना आपल्याबरोबर घेऊन येऊ शकले नाहीत तर भाजपमध्येही त्यांचीं उपेक्षाच होऊ शकते.राज्यात त्यांना फार मोठं स्थान देऊन देवेंद्र फडणवीस नवीन खडसे पक्षात तयार होऊ देणार नाहीत. त्यांनी दिल्लीत जावं असा प्रयत्न फडणवीस करतील.त्यामुळं भाजपमध्ये जावून नारायण राणे यांचं स्वप्न पूर्ण होईल अशी सूतराम शक्यता नाही.त्या अर्थानं नारायण राणे राजकीयदृष्टया फार लाभात राहतील असं वाटत नाही.लाल दिवा जरूर मिळेल पण तेज नसलेला हा दिवा राणेंची अस्वस्थता घालवू शकणार नाही.त्यांचा तेथेही लवकरच भ्रमनिराश होईल आणि आपली उपेक्षा होतंयचं नवं गार्‍हाणं राज्यातील जनतेला ऐकावं लागेल.

राणेंमुळे भाजपचा फायदा होईल ?

नारायण राणेंच्या आगमनानं भाजपच्या होणार्‍या लाभ तोटयाचा विचार करावा लागेल.राणे आले तर तळकोकणात भाजपला संधी मिळेल असं काही भाजप समर्थकांना वाटतं.ते खरंही असलं तरी ही संधी राणे भाजपमध्ये आहेत तोवरच असणार आहे.उद्या भाजपमध्ये राणेंची उपेक्षा होऊ लागली आणि त्यांनी पक्ष सोडला तर त्यांच्याबरोबर पक्षात आलेले परत घरवापसी करतात.हा अनुभव आहे.पनवेलमध्ये भाजपचा आमदार आहे.पण तो भाजपचा नाही.स्वयंभू आहे.रामशेठ ठाकूर ज्या पक्षात असतात त्यापक्षाचा आमदार असतो.सिंधुदुर्गातही हेच चित्र तयार झालेलं दिसेल.नारायण राणे हे व्यक्तीमत्व भाजपला हवंहवंसं वाटण्याचं आणखी एक कारण असंही आहे की,त्यांना शिवसेनेच्या अंगावर सोडता येईल असंही भाजप नेत्यांना वाटतं.ते ही अर्धसत्य  आहे. सिंधुदुर्गातही आता राणे गेल्यानंतर शिवसेनेने खंबीर पर्याय निर्माण केलेले असल्यानं सिंधुदुर्गही राणे यांची जहागीर राहिलेली नाही.स्वतःचा आणि मुलाचा पराभव नारायण राणे यांना सिंधुदुर्गातच पहावा लागलेला आहे.त्यामुळं त्यालाही मर्यादा आहेत.परंतू राणे जर भाजपमध्ये गेले तर एक मेसेज नक्की जावू शकतो की,कॉग्रेसमधून आऊट-गोइंग सुरू झालेलं आहे.जे तळ्यात-मळ्यात आहेत त्यांनाही निर्णय घेण्याची उर्मी यातून मिळू शकते.त्याचा कॉग्रेसच्या मनोधैर्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.भाजपसाठी ते फायद्याचंच ठरणार असल्यानं त्यांना राणे हवेहवेसे वाटायला लागले आहेत.मात्र राणेंचा स्वभाव,त्यांची स्वयंभू कार्यशैली,पक्ष नेतृत्वाविरोधात बंड करण्याची त्यांची वृत्ती आणि महत्वाकांक्षी स्वभाव हे सारं भाजपतल्या प्रत्येकाला माहिती असल्यानं ते भाजपमध्ये आले तरी त्यांना चार हात अंतरावर ठेवले जाईल ,त्यांना फार काही देत बसण्याऐवजी त्यांचा राजकीय वापर करून कसा घेता येईल याचाच भाजप जास्त विचार करणार आहे.त्यामुळंच आरंभी म्हटल्याप्रमाणं सत्ताधारी पक्षात जावूनही राणे यांच्या वाटयाला फार काही येईल अशी शक्यता अजिबात नाही.अशा स्थितीत तिकडं गेल्यानंतर काही दिवसातच ‘होतो तिथं बरं होतो’ म्हणण्याची वेळ राणे यांच्यावर आली नाही म्हणजे मिळविली.राणे यांनाही हे दिसतंय,आगीतून उठून फुंफाटयात पडायची वेळ येऊ नये म्हणूनच ते सावधपणे पाऊले टाकताहेत.अनेकांना तर असंही वाटतं की,राणे पक्षांतराचा निर्णय घेणारच नाहीत.ते कॉग्रेसवर दबावतंत्राचा प्रयोग करीत आहेत असंही काहींचं म्हणणं आहे.

ेएस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here