12-12-12 आणि आम्ही…

0
1500
पाच वर्षांपूर्वीचं हे छायाचित्र आहे..12-12-12 रोजीचं. पत्रकार संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी मी आणि किरण नाईक या दिवशी नागपूरमध्ये आमरण उपोषणास बसलो होतो.उपोषण दोन दिवस चाललं.आमच्या उपोषणाला तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या एकनाथराव खडसे यांनी भेट देऊन पत्रकार संरक्षण कायद्यास पाठिंबा दिला होता.या दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहिल असा होता.माझ्या कथा एका संघर्षाची या पुस्तकात तो शब्दबद्ध केला आहे.फेसबुकनं हे छायाचित्रं आज माझ्या वॉलवर टाकले आहे.- स्मृती म्हणून…
उपोषण सुरू केला तेव्हा 200 पत्रकार उपस्थित होते..दुपारी 12 वाजता 100 उरले..चार वाजता.15-20 जण होते…रात्री आठ वाजता तिघं -चौघे होते..त्यानंतर मी आणि किरण नाईकचं उरलोत..कासवछाप आणून द्यायलाही कोणी आमच्याबरोबर नव्हतं…मस्त अनुभव होता

एक रात्र फुटपाथवरची…

हिवाळी अधिवेशन काळात संत्रा नगरी  नागपूर  उपोषण नगरी झालेली असते.विविध संघटना,पक्ष,आणि कर्मचारी आपल्या  मागण्यासाठी नागपूर अधिवेशनात डेरे दाखल होतात.उपोषणालाही बसतात.दरवर्षी वाढत जाणारी उपोषणार्थींची  संख्या  लक्षात  घेऊन  मायबाप  सरकारनं उपोषणार्थींसाठी एक स्वतंत्र गल्लीच बहाल केलीय. विधान भवनाच्या जवळच मागच्या बाजूच्या रस्त्यावरील फुटपाथवर उपोषणार्थी आप-आपले मांडव घालून बसलेले असतात.चित्र जत्रेतल्या सारखंच असतं.जत्रेत व्यापारी आपली पालं ठोकून बसतात.इथं त्याला मांडव म्हणायचं.या साऱ्या उपोषणार्थींची कोण भेट घेतंय ? आणि त्यांच्या मागण्यांची कशी तड लागतेय ? हा विषय माहितीच्या अधिकारात माहिती घेण्यासाऱखाय.मी  आणि किरण नाईक १२ आणि १२ डिसेंबर २०१२ असे दोन दिवस या जत्रेत आमचा मांडव घालून होतो.या दोन दिवसात  एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी दिलेली धावती भेट सोडली तर सत्ताधारी पक्षाकडून उपोषणार्थींना भेटायला कोणीही आलेलं दिसलं नाही.त्यामुळं  या सरकारचं करायचं काय,खाली मुंडकं वरती पाय,किंवा देत कसे नाही,घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांचे अधून-मधून हवेत उमटणारे क्षीण स्वर आणि कोणी तरी येईल आणि आपल्या मागण्याची पूर्तता करील या  भावनेनं आशाळभूतपणे विधानभवनाच्या दिशने लागलेल्या नजरा हेच चित्र मला दोन दिवस उपोषण नगरीत  दिसले.सरकारचं करायचं काय सारख्या धोषणा किती कुचकामी आहेत हे त्या देणारांनाही माहित असते पण कार्यकर्त्याच्या मनात एक जोश निर्मा़ण करण्यासाठी त्या द्याव्या लागतात.सरकारचं खाली मुंडक वरती पाय करण्यासारखी व्यवस्था आपल्या लोकशाहीने आपल्या हाती दिलेली नाही.एकदा मतदान केलं की,पाच वर्षे चालणारा नंगानाच पहात बसण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाहीत हे वास्तव उपोषणार्थीनाही माहित असतं.पण लेकरू रडल्याशिवाय आई देखील त्याला दुध देत नाही या भावनेनं सारी मंडळी नागपुरात आलेली असते.काहींचा निर्घार आमरण उपोषणाचा असतो,काही जण लाक्षणिक उपोषण करीत असतात,काहींचं साखळी उपोषण असतं. प्रकार वेगवेगळे असतील पण सरकार नावाची व्यवस्था आमच्यासाठी काहीच करीत नाही हा संताप आणि भावना साऱखीच असते.उपोषण करणं खडतर तर खरंच पण  या खडतर प्रवासाची सुरूवात  परवानग्या देण्यापासूनच होते.लोकशाहीनं दिलेला आणि गांधीबाबांनी दाखविलेला उपोषणाच्या सनदशीर मार्गाने जाण्यासाठी देखील नागपुरातील पोलिस यंत्रणा आणता येईल तेवढा व्यत्यय आणत असते.आम्हालाही याचा अनुभव आला.पोलिसांची परवानगी,बीऍन्डसीची परवानगी,स्पिकरची परवानगी हे सारे सोपस्कार पार पडल्यावर मांडववाल्याची मनधरणी  करावी लागते,अरेरावी  ऐकावी लागते.तो पर्यत अर्धा  उत्साह मावळून जातो.नंतर सरकारी पातळीवरून होणारी उपेक्षा संतापाची जागा नैराश्य घेते आणि कधी एकदा उपोषण संपते असे बहुतेक उपोषणार्थीना वाटायला लागते.त्यातच उपोषणासाठी जो परिसर दिलेला आहे तो कमालीचा अस्वच्छ आहे.पाठिमागे जंगल आहे.त्यामुळे  डासांचा हल्ला सहन करण्यापलिकडचा असतो.पाण्याचं सोडाच पण शोचाल्याचीही कोणतीच व्यवस्था नसते.एक फिरते शाौचालय दिसलं पण त्यातही पाण्याची व्यवस्था नव्हती. उपोषणार्थींच्या संख्येच्या तुलनेत ते फारच अपुरे होते.त्यामुळे अनेकजण आपल्या मांडवाच्या आसपासच नैसर्गिक विधी आटोपताना दिसले.त्यामुळं परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य असते.सारा परिसर अस्वच्छ असल्याने एखादा सरपटणारा प्राणी कधी कोठून येईल आणि आपल्याला डंख मारेल या भितीनेही अनेकांचा डोळा लागत नाही.निसर्गाचीही उपोषणार्थींना साथ नसते.कारण नागपूर अधिवेशन काळात कडाक्याची थॅंडी असते.हे सारे सहन करूनही हाती काहीच लागत नाही असे दिसतं  तेव्हा आपलंच खाली डोकं वर पाय करण्याची वेळ आपल्यावर येते.

           .हे सारे चित्र मनहेलावू सोडणारे,हताश करणारं  असतं.12 चा दिवस आणि 13 डिसेंबरचा अ र्धा दिवस मी देखील या चित्राचा एक भाग होतो.आमचं आमरण उपोषण सुरू होतं.भाषणं,घोषणांचा गजर सुरू होता.आमच्यातील काही उत्साही मंडळी या सरकारचं करायचं कायच्या घोषणा देत होती.बाजूला एक सफाई कामगार उभा होता.तो कुत्सितपणे आमच्या घोषणांकडं बघून हसत होता.मी त्याला गाठलं. विचारलं, बाबारे तु असा कुत्सितपणे हसतोस का? त्याचं उत्तर मार्मिक होतं.तो म्हणाला ‘मी पंधरा-वीस वर्षे अशी उपोषणं बघतोेय मात्र कोणाचंच काही झालेलं नाही’.त्याचं म्हणणं खरं होतं. त्यामुळं पोटात गोळा आला. आपल्या उपोषणाचंही असंच तर होणार नाही ना?  याची नाही म्हटलं तरी काळजी वाटायला लागली.पण फार वेळ वाट पहावी लागली नाही.मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आला.संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलंय असं सांगितलं गेलं.ठरलेल्या वेळेत आम्ही विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात गेलो.अभय बंग यंाच्या काही महिला कार्यकर्त्यांची भेटीची  वेळ चारची होती. सहा वाजले तरी त्यांची मुख्यमंत्र्यांची भेट होत नव्हती.आम्हीही मुख्यमंत्र्यांच्या दालनात तास-सव्वातास बसलो.किती वेळ थांबायचं ? हा प्रश्न होता.मग साऱ्यांनी ठरवलं परतायचं.मग  निघालो.माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्जवं केली पण थांबण्याचा कारणच नव्हतं.आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटताच उपोषणस्थळी पोहोचलो.आमच्या या भूमिकेचे पडसाद मुख्यमंत्री कार्यालयात उमटले.स्वतः मुख्यमंत्री देखील अस्वस्थ झाले.त्यानंतर आमच्याशी रात्री अकराच्या सुमारास मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला पण किरण नाईक आणि माझाही मोबाईल डिस्चार्ज झाल्याने संपर्क होऊ शकला नाही.त्यानंतर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे काही अधिकारी रात्री बाराच्या सुमारास उपोषण स्थळी आले. मुख्यमंत्र्यांनी सकाळी साडेआठ वाजता चर्चेला बोलावले असल्याचा निरोप आम्हाला दिला.अन्य मोबाईलवरून आम्ही समितीतील अन्य सदस्यांशी च र्चा केली.संवाद तर व्हायलाच पाहिजे त्याशिवाय कोंडी फुटणार कशी असं साऱ्यांचंच मत पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जायचं ठरलं.मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत काय झालं याच्या बातम्या आलेल्या असल्यानं त्याची पुनरूक्ती करण्याचं कारण नाही.पण उपोषणाच्या रात्री आलेले अनुभव कथन करणं आवश्यक आहे. दिवसभर तर पाच पन्नास पत्रकार आमच्याबरोबर  होते पण जस जशी रात्र होऊ लागली तसतसा एकेकानं सुबल्ल्या करायला सुरूवात केली. नऊ-दहा वाजता  प्रफुल्ल मारपकवार, सुरेद्र गांगण आणि अन्य काही पत्रकार येऊन गेले. तेव्हा बरं वाटलं. पण  नंतर एक वेळ तर अशी आली की,मी,किरण नाईक आणि परळीचे पत्रकार प्रेमनाथ कदम असे तिघेच  मांडवात राहिलो.अगोदर दहाजणांनी आमरण उपोषणासाठी आमच्याकडं नावं दिली होती.ती संख्या नंतर तीन वर आली.मांडवातही आम्ही तिघेच राहिलो.मन खट्टू झालं.मनावर नैराश्येचे मळभ दाटून आलं.किरण नाईकही वैतागले,संतापल. पण आम्ही दोघं परस्परांना आधार देत आंदोलनात असे अनुभव येतच असतात असा दिलासा देत राहिलो. विजेची सोय नसल्यानं सभोवताली अंधार, त्यातच डासांचे संगीत आणि त्याचा निर्दयपणे चावा कार्यक्रमामुळेच आमच्या अस्वस्थतेत भरच पडत होती.पण किरणला मी अनेक आंदोलनाचे दाखले देत गांधीजींनाही असे अनुभव आल्याचे संागत त्यांचा संताप कमी करण्याचा प्रयत्न करीत होतो.नंतर काही वेळाने आमचे पुण्याचे पत्रकार मित्र शऱद पाभळे,सुभाष भारद्वाज.सुनील वाळुंज आणि कुमठेकर आले.आम्हाला प्रचड आधार वाटला.त्यांनी येताना कासव छापही आणली होती.त्यांच्या येण्यानं, आमची रात्रभर साथ करण्यानं पुन्हा शंभर हत्तीचं बळ आलं.नैराश्यचं मळभही दूर झालं.मी नंतर  अंधाऱ्या फुटपाथवरही गाढ झोपी गेलो.माणसाच्या प्रेमाची,आपलेपणाची उब किती आधार देत असते ते मला 12 च्या रात्री कळलं.पुण्याचे मित्र आले नसते तर आम्हाला रात्री डोळा लागला नसता.लख्ख डोळ्यांनी तिघेजण एकमेकाकडं बघत रात्र जागवत बसलो असतो.पण तसं झालं नाही.मायेचा ओलावा मिळाला.आपण एकटे नाहीत याचं समाधानही लाभलं.सकाळी उ़ठलो.वर्तमानपत्रं मागवली.आमच्या उपोषणाला फारच त्रोटक प्रसिध्दी मिळाली होती.मी कधीच प्रसिध्दीसाठी काही केलं नाही. करीत नाही.पण यातून मेसेज असा जातो की,सारे पत्रकार एकजूट नाहीत.त्यामुळं सरकारवर जो दबाब येणंअपेक्षित असतं तो येत नाही. माहिती खात्याचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले देखील ,देशमु़ख वर्तमानपत्रांनी तुमची उपेक्षा केली.थोडं वाईट वाटलं पण महाराष्ट्रात सर्वत्र आपलं आंदोलन यशस्वी झाल्याचं कळल्यावर आपण एकटे नाही आहोत याची जाणीव झाली आणि पत्रकारांच्या हक्कासाठीचा लढा आपण असाच चालू ठेवायचा असा ऩिर्धाऱ करूनच मुख्यमंत्र्यांकडं आम्ही गेलो. मुख्यमंत्र्यांची आम्ही घेतलेली ही अकरावी भेट होती.यावेळी नागपूर अधिवशन काळातच मसुदा कॅबिनेटसमोर आणणार,जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी समित्या सक्षम करणार,अधिस्वीकृती समित्या 31 डिसेंबर 2012च्या आत पुनर्गठित करणार,प्रेस क ौन्सिलच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रेस कौन्सिल उभारता येईल काय याचा अभ्यास करणार अशी काही आश्वासनं त्यांनी  दिली होती.नेहमीप्रमाणे ती पूर्ण केली गेली नाहीत.त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.सरकारला एक संधी द्यायची असं आम्ही साऱ्यांनी ठरविलं आणि उपोषण  स्थगित केलं. .उपोषण मागं घेतलं असलं तरी आपली लढाई आम्ही मागे घेतलेली नाही.ती आपली मागणी मान्य होईपर्यत आपण  सोडणार नाही.मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकऱणासाठीचं आंदोलन आम्ही पाच वर्षे सातत्यानं सुरू ठेवलं.अखेर सरकारला झुकावं लागलं. मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरू झालंय. खात्रीय की पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसंदर्भातही सरकारला एकदिवस  झुकावंच लागेल.कारण आपली मागणी न्याय्य आहे.असं स्वतःचं समाधान करून घेत आम्ही उपोषण थांबविलं.संचालक श्रध्दा बेलसरे यांनी आम्हाला संत्रा रस देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.ते सोडलं.त्यानंतर अधिकार्‍यांच्या डोक्यावरचं टेन्शनही कमी झालं. उपोषण संपलं.नंतर आम्ही दिलीप वळसे पाटील,आर.आर.पाटील यांची भेट घेऊऩ मदतीची विनंती केली.पण दुपारनंतर  माझी प्रकृत्ती बिघडली.रूग्नालयात दाखल झालो.इतरांना त्रास नको म्हणून रात्री तातडीनं पुण्याला आलो.चार दिवस मग उपचार सुरू होते.एवढं सारं झाल्यावर मग चर्चा काय सुरू झाली तर उपोषणाचा फार्स करून हाती काय लागलं अशी.ठोस काही मिळेपर्यंत उपोषण सोडायला नको होतं अशी मल्लीनाथी काहींनी केली.आमरण उपोषण म्हणजे काय असतं याची माहिती नसलेल्यांची ही पोपटपंची होती.घरी किंवा पंख्याखाली बसून सोशलमिडियावरून सल्ले देणं जेवढं सोपं असतं तेवढंच प्रत्यक्ष कृती करणं अवघड असतं.मात्र हे असं होणारच ,टोमणे मारले जाणारच याची कल्पना होती.त्याची मानसिक तयारीही केलेली होती.दुसरीकंडं अनेकांनी अभिनंदनही केलं.चळवळ एक पाऊल पुढं,विजयाच्या दिशेनं नेण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.सरकारवरील दबाव वाढविण्यातही आम्ही यशस्वी झालो होतो.मात्र नागपूरचं हे उपोषण कायमच स्मरणात राहिलं.आज कायदा झाला असला तरी 12-12-12 ची ती रात्र कायम स्मरणात राहिल यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here