हवामान खात्याच्या विरोधात गुन्हे दाखल करणार

0
1835

माजलगाव मधील  शेतकरी  उद्या हवामान खात्याच्या विरोधात गुन्हे दाखल करीत आहेत.त्याचं स्वागत यासाठी करायला हवं की यंदाच नव्हे तर गेली काही वर्षे पाऊस चांगला होणार,चांगला होणार असं सांगून हवामान खात्यानं देशातील शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आहे.प्रत्यक्षात पाऊस पडत नाही  यंदाही एप्रिल-मे मध्येच सरासरी पेक्षा चांगला पाऊस होण्याचं चॉकलेट हवामान खात्यानं शेतकर्‍यांना दिलं होतं.प्रत्यक्षात स्थिती काय आहे ? कोंकणासह सारा महाराष्ट्र कोरडा आहे।   खरं तर हवामान खात्याचा अंदाज शेतकर्‍यांसाठी मोठाच दिलासा असतो.त्यावर विसंबून शेतकरी मोठया प्रमाणात बियाणे जमिनीत ओततात.कर्जबाजारी होतात.मात्र गेली काही वर्षे असं दिसून येतंय की,हवामान खात्याचे अंदाज सपशेल फसवे ठरत आहेत.यावर्षी तेच होतंय..ही एकप्रकारे शेतकर्‍यांची फसवणूक नाही काय ? असेल तर त्याविरोधात कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे.त्यामुळेच माजलगावच्या शेतकर्‍यांनी या फसवणुकीच्या विरोधात हवामान खात्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं पाऊल उचलायचं ठरविलं आहे.असे गुन्हे दाखल करता येऊ शकतात काय ? याचं मार्गदर्शन कायदेतज्ज्ञांनी शेतकर्‍यांना केलं पाहिजे.ते शक्य असेल तर असे गुन्हे गावोगाव दाखल व्हायला हवेत.

मराठवाडयातील शेतकर्‍यांची अशी मानसिकता का झाली ? याचंही तसंच कारण आहे. मध्यंतरी मी बीडला होतो.गावाकडं रात्री देशमुख वाड्यावर मित्रांशी गप्पा मारताना एक तरूण  शेतकरी म्हणाला,” हवामान खाते  बियाणे, औषध अणि खत  कंपन्या यांच्यात नक्कीच काही आर्थिक  व्यवहार होत असावेत.त्यामुळंच तर हवामान खाते दोन महिने अगोदर पाऊस चांगला होणारचे अंदाज व्यक्त करते त्यावर विश्‍वास ठेऊन बियाणांची खरेदी होते.खेत टाकली जातात ,अणि औषधी फवारली जातात।  कंपन्या मालामाल होतात.पाऊस काही येत नाही.शेतकरी नागवला जातो बियाणे कंपन्या आणि हवामान खाते यांच्या या संबंधांची चौकशी झाली पाहिजे.तुम्ही पत्रकार त्यासाठी आवाज उठवा”..माझ्या तरूण मित्राचा हा आरोप तेव्हा मी हसण्यावारी नेला असला तरी आज मला तशी शंका वाटायला लागली आहे.कारण “पुढचे 48.पुढचे 48 ” करीत अर्धा जुलै संपला तरी पाऊस नाही.त्यामुळं हवामान खाते खरंच फसवेगिरी करीत आहे काय अशी शंका येऊ लागली आहे.

या संबंधात असेही म्हटले जावू शकते की,शेवटी हवामान खात्याचे अंदाज हे अंदाजच असतात.ते अनेक निकषांवर अवलंबून असतात.हे खरंही आहे.मात्र हे अंदाज सातत्यानं खोटे ठरत असतील,आणि त्यामुळं करोडे रूपयांचे बियाणे मातीत जात असतील तर असे अंदाज व्यक्त करण्याची घाई तरी हवामान खात्यान का करावी असाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.असं म्हणतात की,बाहेरच्या देशात हवामान खात्याचे अंदाज बरेच खरे ठरतात.मग ते तंत्रज्ञान आपल्याकडं का उपलब्ध करून दिलं जात नाही.यामागेही काही हितसंबंध नसतीलच असं कसं म्हणता येईल.एवढा महत्वाच्या विषय,ज्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते त्याकडं कसं काय दुर्लक्ष होऊ शकतं हे न सुटणारं कोडं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here