सोशल मीडियावर या 7 गोष्टींपासून दूर राहा

    0
    956

    सोशल मीडियावर या 7 गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा जेलमध्ये जा…….

    मुंबई : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा बहुधा कोणत्याच मुद्द्यावर होत नसावी. त्यात आता सोशल मीडिया आलंय. त्यामुळे आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा दिवसातून सतराशे साठ वेळा चघळला जातो. अर्थात अनेकदा या मुद्द्यावरील चर्चा महत्त्वाची आणि अर्थपूर्णही असते.

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील नेटिझन्सना दिलासा देणारा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तो म्हणजे कलम 66A रद्द केला. यामुळे सोशल मीडियावर विविध मुद्द्यावर व्यक्त होणाऱ्या अनेकांना एक मोठा दिलासा मिळाला.

    सुप्रीम कोर्टाने कलम 66A रद्द केल्यानंतर काही ‘मत’सम्राटांना वाटू लागले की आपण कोणत्याही मुद्द्यावर काहीही लिहू शकतो आणि आपल्याला वाटेल त्यावर टीका-टिप्पणी करु शकतो, असा गैरसमज निर्माण झाला आहे. जेव्हा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त होतो, त्याचवेळी एकप्रकारची जबाबदारीही आपल्यावर असते. ती म्हणजे कुणाच्या भावना न दुखावून मत मांडण्याची. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली वादाग्रस्त विधानं, टीका, मतं मांडली जातात. अशा ‘मत’बहाद्दरांनी खालील 7 गोष्टी वाचल्याच पाहिजेत.

    1. प्रक्षोभक लेखन : कुणी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाच्याही विरोधात अश्लिल भाषेचा, शब्दांचा वापर करत असेल तर त्याच्याविरोधात आयपीसी 294 अन्वये कारवाई होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रक्षोभक लिहिणं टाळावं.
    शिक्षा – जर गुन्हा सिद्ध झाला, तर तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

    2. धार्मिक भावाना दुखावणे : जर कुणी जाणीवपूर्वक इतर धर्मावर टीका करत असेल किंवा जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. धार्मिक चिन्हांचा अपमानही करु नका. असे केल्यास या प्रकरणात आयपीसी 295A अन्वये केस दाखल होऊ शकते.
    शिक्षा – दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.

    3. अपमान : सोशल मीडियावर कोणत्या पोस्टमध्ये किंवा कमेंटमध्ये कुणाचा अपमान केल्यास आणि शिवीगाळ केल्यास कारवाई होईल. जर असे केलात तर आयपीसी कलम 499 आणि 500 अन्वये तक्रार दाखल होऊ शकते.
    शिक्षा – हे प्रकरण सिद्ध झाल्यास 2 वर्षांपर्यत तुरुंगवास होऊ शकतो.

    4. देशाविरोधात लिहिणे : जर कोणत्या पोस्टमध्ये किंवा कमेंटमध्ये देशाविरोधात भाष्य केल्यास कारवाई होऊ शकते. देशाची एकात्मता आणि अखंडतेला धोका निर्माण होईल असे काही मत मांडल्यास आयपीसी कलम 124A अन्वये खटला सुरु होऊ शकतो.
    शिक्षा – या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

    5. विशिष्ट समूहाविरोधात लेखन : विशिष्ट समूहाविरोधात लेखन करु नये. कुणाच्या वर्णावरुन किंवा कुणाच्या जाती-धर्मावरुन प्रक्षोभक लिहू नये. अन्यथा आयपीसी कलम 153A अन्वये कारवाई होऊ शकते.
    शिक्षा – याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

    6. अफवा पसरवणे : सोशल मीडियावर असे लिहिणे ज्यामुळे अफवा पसरु शकतात आणि हे लेखन जाणीवपूर्वक केलेले असेल तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण जाणीवपूर्व अफवा पसरवल्यास आयपीसी कलम 505 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो.
    शिक्षा – अफवा पसरवल्यास 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

    7. जीवे मारण्याची धमकी : सोशल मीडियावर कुणाला जीवे मारण्याची धमकी दिलीत, तर तुमच्यावर पोलिस कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावरुन धमकी देणाऱ्याविरोधात आयपीसी कलम 506 अन्वये खटला दाखल होऊ शकतो.
    शिक्षा – जर धमकी दिल्याचे सिद्ध झाले तर 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

    a

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here