बेळगाव, दि.२४— पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक तर आहेच तसा तो समाजमनाचा आरसा आहे.पत्रकारांचा थेट संबंध समाज, प्रशासन आणि राज्यकर्त्यांशी येतो. पत्रकारांकडून समाजासह इतर व्यवस्थेच्या बऱ्याच अपेक्षा असतात. मात्र पत्रकारांवर हल्ले होत असताना सर्वजण बघ्याची भूमिका घेतात कोणीही पत्रकारांच्या पाठीशी नसतात ही खेदाची बाब आहे. अशी खंत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी व्यक्त केली.

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ४० व्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे किरण नाईक बोलत होते. बेळगावातील पत्रकार जात,धर्म, पंथ, आणि भाषिक वाद न करता संघटितपणे विविध उपक्रम राबवित आहेत याच कौतुक करून संघाच्या पुढील वाटचालीस नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कॉ. कृष्णा मेणसे, खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर, परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, कार्यवाह शेखर पाटील उपस्थित होते.आमदार डॉ. सौ. निंबाळकर यांच्या हस्ते “पत्रकार” या नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले. तिलारीत बुडणाऱ्या दोन मुलींना वाचविणाऱ्या मनोज धामणकर आणि दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या महंमद कैफ मुल्ला या विद्यार्थ्याचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बेळगावसह सीमा भागातील मराठी पत्रकारांना कर्नाटक सरकारकडून प्रसिद्धी पत्रक कानडीत पाठवून मराठी भाषेची गळचेपी तर केली जातेच परंतु कर्नाटक सरकारकडून मराठी वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जात
नाहीत. पत्रकारांना मिळणारी पेन्शन मराठी पत्रकारांना भाषेच्या द्वेषापोटी दिली जात नाही. त्याची दखल मराठी पत्रकार परिषदेने घेतली असून सीमा भागातील मराठी पत्रकारांना महाराष्ट्रातील पत्रकारांप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठी पत्रकार परिषद प्रयत्न करीत असल्याचे किरण नाईक यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, पूर्वीची पत्रकारिता विकासात्मक व समाजाचे प्रबोधन आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी होती.तसेच प्रशासन व राजकारणी मंडळींवर अंकुश ठेवणारी होती.सध्याची पत्रकारिता ही सोशल मिडियामुळे भरकटत जात असल्याची चिंता व्यक्त केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना किरण नाईक म्हणाले, नेत्यांमध्ये संवेदनशीलता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. एखादी बातमी विरोधात छापली की लगेच नेते नाराज होतात आणि त्या पत्रकाराला टार्गेट करून त्याच्यावर हल्ला केला जातो हे राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही.

यावेळी बोलताना खानापूरच्या आमदार डॉ अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, माझ्या मतदार संघात आणि बेळगावात मराठी भाषिक जनता मोठ्या संख्येने असल्याने कन्नडसोबत मराठी कागदपत्र मिळावीत यासाठी सरकारला निवेदन दिले आहे. मला जनतेने निवडून दिल्यामुळे मराठी परिपत्रकासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांवर कानडी लोक अत्याचार करीत असल्याने महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी करून जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन नाईक यांनी मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगून पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा तसेच जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी यासाठी परिषदेने पुढाकार घेऊन दोन्ही मागण्या मान्य करून घेतल्या असून आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कसा पाठपुरावा केला याची महिती दिली.तर बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर यांनी संघाच्या ४०वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनंत लाड यांनी तर समारोप राजेंद्र पोवार यांनी केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here