दिवसभर कडक उन्हाळा होता.. सायंकाळ होता होता पश्चिमेकडून आभाळ भरलं.. थंड वाराही सुरू झाला.. .. दिवसभर लाहिली होत असल्यानं सायंकाळचा गार वारा आल्हाददायक वाटत होता.. मन प़सन्न करणारं हे वातावरण मी शेतातून अनुभवत असतानाच हलक्या पावसाला सुरूवात झाली..शेतातून घरी पोहचेपर्यंत टपोरया थेंबांसह जोराचा पाऊस सुरू झाला..दाटलेला काळोख, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह जवळपास अर्धातास पाऊस अगदी पावसाळयासारखा धो धो कोसळत राहिला..पाउस पडत होता म्हणण्यापेक्षा पावसाचा धिंगाणा सुरू होता असं म्हणणं योग्य ठरेल.. थेंब गारांसारखे टपोरे असले तरी गारांचा मारा नाही झाला हे सुदैवच..सायंकाळचं आल्हाददायक वातावरण आणि तासाभरातच निसर्गाचं तांडव.. एका तासात भय वाटावं असं वातावरण निर्माण झालं होतं..
राजाची आणि निसर्गाची तक्रार कोणाकडं करणार? अनेक शेतकरयांनी गहू शेतात काढून टाकलेले आहेत.. त्याची पसार पडलेली आहे..तो सारा गहू वाया गेला.. काहींची ज्वारीची काढणी झालीय तर काहींची ज्वारी ऊभी आहे.. त्याचं मोठं नुकसान झाले आहे.. अनेकांच्या हळदीचे ढीग शेतात पडलेले आहेत.. थोडक्यात मोठंच नुकसान झालंय.. कोरोनाच्या धास्तीने काही कुटुंबं शेतात मुक्कामाला गेलेली आहेत त्यांची पळापळ झाली.. सध्या मेंढयांचे कळपच्या कळप आमच्या परिसरात आहेत .. त्यांची खबरबात उद्या सकाळी कळेल.. अगोदरच कोरोनाच्या संकटाचा मार शेतकरी झेलत असताना ही अस्मानी..हतबल करणारी..
शेतकरयांना थोडं अनुदान मिळालं की अनेकांचं पोट दुखतं.. मात्र निसर्गाचा जो मार सातत्यानं शेतकरयांना बसत असतो त्यावर कोणी पोपटपंची करीत नाही..संकटाचा गुमानं मुकाबला करायचा, एवढंच शेतकर्यांच्या हाती आहे.. सारं सहन करणयापलिकडचं आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here