सामनाकार माध्यमांवर भडकले

0
764

राजकारणात आपला निर्णय़ अंगाशी आला की,त्याचे खापर मिडियावर फोडायचे अशी तऱ्हा आज सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.परवा अलिबागेत शरद पवारांनी सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतला नाही असे विधान केल्यानंतर माध्यमातून काहूर उठले.रात्रीच्या चर्चेतही हा विषय आला.काऱण सरकार स्थिर ठेवण्याच्या बोलीवरच न मागता शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता.त्यांनी एक महिन्याच्या आतच आपल्या विधानावर पलटी मारल्यावर माध्यमं बोलणारच.शिवसेनेच्या बाबतीही असंच आहे.शिवसेना दिल्लीत भाजप सरकारमध्ये आहे आणि राज्यात सेना भाजपवर निमित्त साधून हल्ले करते आहे.त्यावरूनच एका दैनिकाने आपल्या बातमीचा मथळा दिल्लीत मुजरा महाराष्ट्रात गोंधळ असा दिला.त्यामुळे शिवसेना भडकली.आता महाराष्ट्रात विरोधात बसणारी शिवसेना दिल्लीत सत्तेत कशासाठी आहे याचं तात्विक विश्लेषण करण्यापेक्षा माध्यमांवर आगपाखड कऱणे सोयीचे असते.आजच्या सामनाने माध्यमांबद्दल नेहमीच्या पध्दतीनं संताप व्यक्त केला आहे.सामनाचा अग्रलेख येथे देत आहोत.

                                                                                                          ————————————————————————

आम्ही काय व कसे निर्णय घ्यायचे ते आम्हास ‘अभिव्यक्ती’वाल्यांनी सांगू नये. दिल्लीच्या सत्तेत शिवसेना आहे व महाराष्ट्रात ती विरोधकाची भूमिका बजावत आहे हे काही अंधारातले गुपित नाही. मग त्यावर स्वयंभू शहाण्यांनी स्वत:चीच नाडी सोडून शिवसेनेचा ‘दिल्लीत मुजरा व महाराष्ट्रात गोंधळ’ असे नाट्य रंगविण्याची गरज नाही. हुजरे आणि मुजरे हे शब्द शिवसेनेच्या शब्दकोषात नाहीतच. पण ‘पोटावळे’ व ‘स्वयंभू शहाणे’ शिवसेनेच्या विरोधात गोंधळ निर्माण करून कुणाला मुजरे मारीत आहेत व कुणाची हुजरेगिरी करीत आहेत ते आम्हाला लवकर उघड करावे लागेल. 

हुजरे, मुजरे आणि
स्वयंभू शहाणे

सध्याचा ‘मीडिया’ म्हणजे एक अजब रसायन आहे. एकेकाळी ज्यास वृत्तपत्रसृष्टी म्हटले जात असे, त्यास आता ‘मीडिया’नामक उपाधीने संबोधावे लागते. कारण छापील शब्दांच्या पुढे हे क्षेत्र गेले आहे व जो तो आपणच कसे श्रेष्ठ हे दाखविण्याची चढाओढ करीत असतो. पूर्वी लेखण्या होत्या. आता दांडेकरांनी लेखण्यांची जागा घेतली. लेखण्या मोडा व हाती बंदुका घ्या असे त्याकाळी सावरकरांनी सांगितले होते. पण आता तसे सांगण्याचीही सोय उरलेली नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ‘दांडे’ मोडा. आणि हाती काय घ्या? हा प्रश्‍नच आहे! कलमबहाद्दरही बिघडले व दांडेकरी सुधारायला तयार नाहीत. असे त्या ‘मीडिया’चे डबके झाले आहे. एखाद्या नेत्याने वा राजकीय पक्षाने एखादे विधान केले रेे केले की गिधाडे ज्याप्रमाणे एखाद्या मृतदेहावर तुटून पडतात तसे सगळे मीडियावाले त्या विधानास फाडून खाण्यासाठी तुटून पडतात. तुम्ही काहीही बोला, काहीही सांगा, काहीही लिहा; पण आम्ही मात्र आम्हाला हवा तसाच अर्थ काढणार. कारण तेच आमचे ‘इाा्दस् दर्ंि जेे’ आहे! आता शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत या सर्व पोटावळ्यांची हीच भूमिका असेल तर कोणी काय करायचे? बरे, एखाद्या विषयावर सर्व मीडियाचे एकमत व्हावे तर तसेही नाही. हत्ती व सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे प्रत्येकजण आपल्या परीने फाडाफाडी करीत असतो व तुझ्यापेक्षा मीच कसे मस्त फाडले या आनंदात स्वत:चीच फाडून घेत असतो. तर हे आहे आपले अभिव्यक्ती की काय ते स्वातंत्र्य. त्याचे लोणचे घालायचे की त्याला एखाद्या संग्रहालयात ठेवायचे याबाबत आता टिळक, आगरकर, चिपळूणकरांनीच मार्गदर्शन केलेले बरे. हे आम्ही विस्ताराने का सांगत आहोत व कोणासाठी सांगत आहोत? अर्थात, सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांना आम्ही एका दिलदारीने मार्गदर्शन करावे, असे वातावरण खरोखरच राहिले आहे काय? कारण मार्गदर्शन व चर्चा शहाण्यांशीच होते, स्वयंभू शहाण्यांशी नाही. सध्या
महाराष्ट्रात जो राजकीय गोंधळ
चालला आहे तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र त्यावर चर्वितचर्वण जोरात सुरू आहे. वास्तविक, ही गोष्ट उघड आहे की, शिवसेनेने याक्षणी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून दणक्यात काम करण्याचा निर्णय घेतला आहे व विरोधी पक्षनेता एकनाथ शिंदे हे एका जबाबदारीने तसेच धडाक्याने विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. आता या आमच्या भूमिकेवर पोटावळ्यांच्या पोटात मुरडा यावा असे काय आहे? ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे व त्या परिस्थितीचा संबंध दिल्लीशी लावण्याची गरज नाही. दिल्लीत भाजप नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे व त्या सरकारात शिवसेनेचे अनंत गीते हे अवजड उद्योग खात्याचा भार वाहत आहेत. स्वत: गीते यांनीही कालपर्यंत सांगितले की, आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडणार नाही व महाराष्ट्रातील चर्चा सकारात्मक सुरू आहे. आता ‘सकारात्मक’चे काय अर्थ काढायचे ते अभिव्यक्तीवाल्यांनी ठरवायचे. खुद्द भारतीय जनता पक्षाकडून या विषयावर वेगवेगळी विधाने प्रसिद्ध होत असताना फक्त शिवसेनेला व शिवसेनेच्या नेत्यांना एकांगी पद्धतीने झोडपायचे हे काही
‘मीडिया’च्या शुद्ध चारित्र्याचे लक्षण
नाही. शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत अधिक कठोरपणे (ठाकरी भाषा आम्हालाही येते) आम्ही त्याबद्दल बोलू शकतो. पण ‘मीडिया’नेच आम्हाला परस्पर संयमी वगैरे ठरवून टाकल्याने अनेकदा पंचाईत होते. वास्तविक आम्ही जे निर्णय घेतो ते फक्त शिवसेनेचे हित व महाराष्ट्राच्या कल्याणासाठी. आम्ही काय व कसे निर्णय घ्यायचे ते आम्हास ‘अभिव्यक्ती’वाल्यांनी सांगू नये. त्यांनी व त्यांच्या शेठजींनी ‘पेड न्यूज’ हिशेबाच्या चोपड्या घेऊन कोणी किती दिले याची मोजदाद करीत खुशाल बसावे व आम्हाला आमचे काम करू द्यावे. महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. कुठे दुष्काळ, तर कुठे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. एलबीटी प्रकरणात धरसोड सुरू असल्याने व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. कुणीतरी मध्येच स्वतंत्र विदर्भ राज्याचे तोबरे भरून महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांवर पिचकारी टाकीत आहेत. हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहत बसायचे काय? स्वाभिमानी शेतकरी संघटना, आठवलेप्रणीत रिपब्लिकन पक्ष सत्ताधार्‍यांचे मित्र असूनही त्यांचा संताप व्यक्त करू लागले आहेत. बहुमताच्या ‘आवाजा’त इज्जत व प्रतिष्ठेच्या किंकाळ्या कशा अस्वस्थ करीत होत्या, याची कबुली दस्तुरखुद्ध मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिली आहे. असे सगळे असताना ‘मीडिया’वाले फक्त शिवसेनेच्या नावाने शिमगा करीत आहेत. हे काही चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. दिल्लीच्या सत्तेत शिवसेना आहे व महाराष्ट्रात ती विरोधकाची भूमिका बजावत आहे हे काही अंधारातले गुपित नाही. मग त्यावर स्वयंभू शहाण्यांनी स्वत:चीच नाडी सोडून शिवसेनेचा ‘दिल्लीत मुजरा व महाराष्ट्रात गोंधळ’ असे नाट्य रंगविण्याची गरज नाही. हुजरे आणि मुजरे हे शब्द शिवसेनेच्या शब्दकोषात नाहीतच. पण ‘पोटावळे’ व ‘स्वयंभू शहाणे’ शिवसेनेच्या विरोधात गोंधळ निर्माण करून कुणाला मुजरे मारीत आहेत व कुणाची हुजरेगिरी करीत आहेत ते आम्हाला लवकर उघड करावे लागेल. शिवसेना स्वाभिमानी बाणा सोडणार नाही. कारण आमचे शहाणपण सत्तेतून आले नसून ते शिवसेनेच्या रक्तात उपजतच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here