चळवळ्या पत्रकाराचा सन्मान

0
763

रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून रायगडमध्ये तरूण पत्रकारांची एक फळी तयार झाली आहे.विविध वृत्तपत्रे आणि वाहिन्यांसाठी बातमीदारी करणारे हे पत्रकार केवळ बातमीदारच नाहीत तर सामाजिक कार्येकर्ते म्हणूनही काम करीत आहेत. लेखणीच्या माध्यमातून जनसामांन्यांचे प्रश्न मांडणे,त्याचा पाठपुरावा कऱणे हे आपले बातमीदार म्हणून असलेले उत्तरदायीत्व तर ते प्रामाणिकपणे पार पाडतातच पण त्याच बरोबर प्रश्न सुटत नसतील तर जनतेचे प्रतनिधी म्हणून प्रसंगी रस्त्यावर उतरून सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कामही ते करतात. “रस्त्यावर उतरून आंदोलनं कऱणे हे पत्रकारांचे काम आहे काय?,पत्रकारांच्या लेखणीची ताकद कमी झालीय काय?” अशी वांझोटी चर्चा ज्यांना वातानुकुलीत खोलीत बसून करायचीय त्यांना करू द्या,पण प्रश्न लोकांना न्याय मिळवून देण्याचा असतो तेव्हा लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक सनदशीर मार्गाचा अवलंब करून जनसामांन्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे या भूमिकेतून रायगडचे हे तरूण पत्रकार काम करतात.पत्रकारानी हाती घेतलेला मुबई -गोवा महामार्गाचा प्रश्न हे एक उदाहरण झाले पण असे अनेक प्रश्न पत्रकारांनी धसास लावले आहेत.पत्रकारांबद्दल समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन वाढत असताना रायगडमधील पत्रकार रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जे विधायक कामं करीत आहेत त्याचं स्वागत आणि कौतुक केलंच पाहिजे.
रायगड प्रेस क्लब ही संस्था बारा वर्षांपूर्वी स्थापन झाली.या संस्थेच्या अध्यक्षपदी कर्जत येथील तरूण पत्रकार संतोष पेऱण यांची नुकतीच एकमताने निवड झाली आहे.साधारणतः पधरा दिवसांपूर्वीच संतोष अध्यक्ष झाला आणि काल त्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कष्ट्र पत्रकारिता पुरस्कारही मिळाला.संतोषला मिळालेला हा दुहेरी मुकुट आहे असे मला वाटते.पत्रकारितेचा कसलाही वारसा नसलेल्या एका सामांन्य कुटुंबातून पुढे आलेल्या संतोष पेरणेने अल्पावधीतच केवळ कर्जतमध्येच नव्हे तर रायगडच्या पत्रकारितेत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.मुलतःच चळवळ्या स्वभाव,आपण ज्या वर्गातून आलो आहोत त्या सामांन्यांबद्दल असलेली कणव आणि त्याला मिळालेली पत्रकारितेची साथ याबळावर संतोषने रायगडच्या पत्रकारिता अधिक समाजाभिमुख कऱण्याचा प्रयत्न केला आहे.त्यासाी त्याने संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखविले.वनराई बंधारे बांधणे हे काय पत्रकारांचे काम असू शकते काय?  पण संतोषने कर्जत तालुक्यात दरवर्षी चार दोन वनराई बंधारे बांधून पाण्याचा प्रश्न आपल्यापरीनं सोडविण्याचा प्रयन्त केला.हुतात्मा भाई कोतवाल यांची स्वातंत्र्यात उपेक्षा झाली.ही खंत रायगडमधील साऱ्याच पत्रकारांना होती.संतोष केवळ खंत व्यक्त करीत बसला नाही तर त्याने पुढाकार घेत हुतात्मा स्मारक समिती स्थापन करून दरवर्षी हुतात्मा दिन साजरा करून भाई कोतवाल यांच्या अलौकीक कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा एक चागला उपक्रम सुरू केला आहे.अगदी काल देखील मुख्यमंत्र्याकडून पुरस्कार स्वीकारत असताना संतोषने मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले.त्यात जंजिरा मुक्ती दिन हा शासकीय पातळीवर साजरा करावा आणि या लढ्यात सहभागी झालेल्या रायगडच्या सुपूत्रांचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरव करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.रायगडमध्ये भेडसावणारा पाण्याचा प्रश्न असो,की रायगडावरील अंधार असो,संतोष रायगडचे हे सारे प्रश्न आपले व्यक्तिगत असल्यासारखे त्याचा पाठपुरावा करीत असतो.”पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे” हा पत्रकारांच्या पूर्वसुरींनी दिलेला मंत्र निष्ठेनं जपण्याचा संतोष आणि त्यांची टीम प्रयत्न करीत आहे याचा नक्कीच मनस्वी आनंद होत आहे.संतोष कोढाणे धरणाचा प्रश्न असेल,कर्जत तालुक्यातील उजाड होत जाणाऱ्या शेतीचा आणि शेतकऱ्याचंा प्रश्न असेल,राजनाल्याच्या पाण्याचा प्रश्न असेल,कर्जत तालुक्यातील आदिवासींचे प्रश्न असतील,जिल्हयातील विस्थापितांचे प्रश्न असतील,रस्त्याचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून हिरीरिने मांडले आहेत.संतोष हा हाडाचा पत्रकार असल्यानं त्याला बातमीचा वास येतो.बातमी एकदा समजली की मग त्याचा पाठपुरावा कऱण्यात संतोष कंटाळा करीत नाही.संतोष जसा चांगला बातमीदार आहे तसाच तो चांगला संघटक आहे.संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत मध्ये त्याने पत्रकारांची एक चांगली टीम तयार केली आहे.ही सारी मंडळी केवळ प्रेस क्लबचे सदस्य म्हणून नव्हे तर एक कुटुंब म्हणून वावरताना दिसत आहे.संतोष आता रायगडमधील पत्रकारांच्या या कुटुबाचा कुटुबं प्रमुख झाला आहे.मला पूर्ण खात्री आहे हे कुटुंब अधिक मजबूत कऱण्याचे आणि त्याच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम संतोष अधिक जोमाने करील.रायगड प्रेस क्लबचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा बहुमान संतोषला मिळाला आहे.रायगड जिल्हयातील पत्रकारांचे हे तरूण नेतृत्व नक्कीच रायगडची पत्रकारिता अधिक समृध्द,अधिक आश्वासक करील यात मला शंका वाटत नाही.संतोषचं काम मी गेल्या पंधरा वर्षापासून पाहतो आहे.धडपड,तळमळ,आणि जिल्हयातील जनतेच्या प्रश्नांचा चांगली माहिती असलेला संतोष अध्यक्ष म्हणून पुढील दोन वर्षात नक्कीच उल्लेखनिय काम करेल याची मला खात्री आहे.
संतोषला मिळालेला पुरस्कार आणि संतोषची अध्यक्षपदी झालेली निवड या दोन्ही घटनां त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना आहेत.दुर्दैवानं मला काल त्याच्या या आनंदाच्या सोहळ्यात व्यक्तिगत अडचणीमुळे सहभागी होता आलं नसलं तरी माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा संतोषच्या पाठीशी आहेत.संतोषचं पुनश्च अभिनंदन आणि पुढील कार्यास खंडीभर शुभेच्छा.(SM)

(या मजकुराची कॉपी आपणास माझ्या ब्लॉगवरून करता येईल.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here