रायगडातील “सोयीचं” राजकारण

0
1241

रायगड जिल्हयात शेकापला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे.पुन्हा एकदा एवढ्याचसाठी की,शेकाप जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कोणी तरी (म्हणजे कधीकाळचा  विरोधकच ) तारणहार बनून शेकापच्या मदतीला  धाऊन येत असतो.हा इतिहास आहे.यामध्ये कधी कॉ्रेग्रेसमधील बंडखोर असतात,कधी अ.र.अंतुले यांच्यासारखे असंतुष्ट असतात,कधी शिवसेना असते तर कधी राष्ट्रवादी.गेली पाच वर्षे शेकापचे पालन-पोषण कऱण्याचं उत्तरदायित्व  शिवसेनेकडं होतं..लोकसभेच्या वेळेस शिवसेनेच्या विरोधात शेकापनं आपले उमेदवार उभे केल्यानं पिसाळलेल्या सेनेने मग आपली पालकत्वाची भूमिका सोडून देत शेकापला अद्दल घडविण्याची भाषा सुरू केली.लोकसभेनंतर जयंत पाटील यांची अवस्था केविलवाणी  झाली होती.शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकाच वेळी अंगावर घेतल्यानं आणि कॉग्रेसबरोबरही त्यांची लढाई  सुरू असल्यानं जयंत पाटील  चोहोबाजुंनी घेरले गेले होते.ही स्थिती कायम राहिली असती आणि आज राष्ट्रवादी शेकापच्या मदतीला धाऊन आली नसती तर अलिबाग शेकापवर   आपली राजकीय दुकानदारी बंद कऱण्याची वेळ होती.राष्ट्रवादीनं ती वेळ शेकापवर येऊ दिली नाही.त्यामुळं इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल.या उपकाराबद्धल  जयंत पाटलांनी कायमस्वरूपी सुनील तटकरेंचं उपकृत राहायला हवं.कारण जिल्हा परिषदेच्या निमित्तानं मिळालेलं हे जीवदान येणाऱ्या विधानसभेसाठीही शेकापला लाभदायक ठरणारं  आहे.चर्चा अशी आहे की,शेकाप श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार आहे तर राष्ट्रवादी पेणमध्ये आपला उमेदवाद उभा करून रवी पाटलांची कोंडी कऱीत शेकापला हस्ते -परहस्ते मदत करणार  आहे.अलिबागमध्येही मधु ठाकूर आता अडचणीत आलेले आहेत.मधु ठाकूर यांनी लोकसभेच्या वेळेस तटकरेंना सर्वाधिक मताधिक्य दिलेलं असलं तरी आता तो इतिहास झालेला असल्यानं मधु ठाकूर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत.विवेक पाटील आणि सुनील तटकरे यांचे संबंध विचारात घेता तिकडेही शेकापच्या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रवादीची मदत होणार आहे.महाडमध्येही माणिक जगताप अडचणीत येत आहेत.म्हणजे आज झालेला सौदा दोन्ही बाजूने  फायद्याचा ठरणारा आहे.

– सुनील तटकरे आणि जयंत पाटलांचं एकत्र येण्याचं कोडं जिल्हयातील अनेकांना सुटत नाही.याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर “तिसऱ्या शक्तीचा उदय होऊ नये यासाठी या दोन महाशक्ती एकत्र आलेल्या आहेत” असं देता येईल.राज्यात राष्ट्रवादी प्रचंड अडचणीत आहे आणि जिल्हयात शेकापची कोंडी झालेली आहे.म्हणजे अडचणीत दोघेही आहेत.अशा स्थितीत तिसऱ्यानं याचा लाभ उठवू नये यासाठी केलेली ही राजकीय तडजोड आहे एवढाच आजच्या शिवतीर्थावरील घडामोडींचा अन्वयार्थ आहे. लोकसभेत जी पडझड झाली,जो झंझावात आला त्यानं अनेकांची झोप उडाली.रायगडमधील अन्य तालुक्यातील  सोडाच पण श्रीवर्धनची जागाही धोक्यात येऊ शकते अशी लक्षणं दिसायला लागली होती.राज्यात राष्ट्रवादी आणि कॉग्रेसची आघाडी  होणार की नाही ते अजून नक्की नाही.समजा ती झालीच नाही तर रायगडमध्ये  सुनील तटकरे यांच्यासमोरील  अडचणी वाढणार होत्या. राज्याची जबाबदारी त्यांच्याकडं असल्यानं त्यांना जिल्हयात अडकून पडणंही  जमणार नव्हतं.कोणी काहीही म्हणो,परंतू लोकसभेच्या वेळेस जो झंझावात तयार झाला होता अजून तो शांत झालेला नाही हे सुनील तटकरे देखील ओळखून होते.अशा स्थितीत शिवसेनेला रोखायचे तर शेकापला जवळ कऱणं  आवश्यक होतें.त्यामुळंच स्वपक्षातील महेंद्र दळवी असतील किंवा लोकसभेत ज्यांनी मदत केली ते कॉग्रेसचे  मधू ठाकूर किंवा माणिक जगताप असतील यांना काय वाटेल याचा विचार करून भागणारे नव्हते. एक प्रकारे राष्ट्रवादीची ती अपरिहार्यताच होती. शेकापचा प्रश्नच नव्हता आणि  शेकापसमोर अन्य पर्याय़ही नव्हता.त्यामुळं आज जिल्हा परिषदेत जी नवी आघाडी झाली ती “दोन अडचणीत आलेल्या पक्षांची आघाडी आहेे” हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे.राष्ट्रवादीकडं शेकाप ऐवजी शिवसेनेची मदत घेण्याचा एक पर्याय होता असं अनेकांना वाटतं.मात्र व्यावहारिक आणि राजकीयदृष्टया शिवसेनेशी हातमिळवणी कऱण्याची कल्पना किंवा प्रस्ताव सोयीचा नव्हता.कारण .राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष मानते.किमान राष्ट्रवादीनं तसा  बुरखा पांघरलेला आहे.शिवसेना हा त्यांच्या लेखी धर्मान्ध, जातीयवादी पक्ष आहे.सुनील तटकरे यांनी कोल्हापूरच्या किंवा अन्य ठिकाणच्या सभेतील भाषणातून “जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्याचं” आवाहन मत दारांना  केलेलं आहे.अशा स्थितीत अगदी विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेबरोबर  उघड किंवा छुपी अशी कोणत्याही प्रकारची युती केली असती तर ती राज्यात राष्ट्रवादीला अडचणीची ठरली असती. तोच धागा पकडून त्यांना हजार सवाल केले गेले असते.शिवसेनेने असाही एक प्रस्ताव दिला होता की,सेनेचे सदस्य तटस्थ राहतील,शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदही राष्ट्रवादीनेच घ्यावे.मात्र तसे करणे देखील राष्ट्रवादीसाठी सोयीचे नव्हते.कारण प्रश्न केवळ जिल्हा परिषदेचाच नव्हता.जिल्हयात आज राष्ट्रवादीकडं जे कर्जत आणि श्रीवर्धन मतदार संघ आहेत तिथं राष्ट्रवादीची खरी लढाई शिवसेनेसोबतच आहे. महाड आणि माणगावातही शिवसेनेचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत एकत्र बसायचं आणि विधानसभेत किंवा गावागावात परस्परांच्या विरोधात लढायचं हे चित्र भेसूर होतं,शिवाय भलेही अध्यक्ष-उपाध्यक्ष पद  राष्ट्रवादीला  मिळाले असते तरी शिवतीर्थावर दादागिरी चालणार होती ती शिवसेनेचीच.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे बळ सेनेला मिळणार होते त्याचा वापर पुन्हा राष्ट्रवादीच्या विरोधातच होणार होता.या सर्व शक्यता आणि होणाऱ्या परिणामाचा विचार करून सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शेकापला जीवदान दिले आहे.आजच्या निर्णयामुळं शेकापचा हात हातात घेण्याचं समर्थन करणंही सुनील तटकरेंना सोपं जाणार आहे.जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांशी आम्ही हात मिळवणी केली तर बिघडले कुठे असा प्रश्न उपस्थित करीत तटकरे याचे राज्यभर भांडवल करू शकतात.तशी सोय शिवसेनेबरोबर जाण्यात नक्कीच नव्हती.या शिवाय  आपल्याला लोकसभेत शिवसेनेनं पराभूत केल्याची ताजी बोचही तटकरेंच्या मनात होतीच होती.त्यामुळं हे उट्टं काढण्याची ंसंधी तटकरे यांनी सोडलेली नाही. .आजचं राजकीय गणित जमविताना तटकरेंना आणखी एक कोड सोडवायचं  असावं .श्रीवर्धनमधून सुनील तटकरेंना आपला मुलगा किंवा मुलीला तिकीट द्यायचं आहे.मात्र हे करताना पुतण्या अवधूत तटकरे यांनाही नाराज करून चालणार नाही हे ते ओळखून होते.त्यामुळं त्यांनी हे सारं राजकारण करून पार्श्वभूमी तयार केलेली असावी .जिल्हा परिषदेत कॉग्रेसच्या रवी पाटील यांनी तटकरेंच्या उमेदवारांना मदत केलेली नाही.अशा स्थितीत हे निमित्त करीत ते पेणमधून अवधूत तटकरेंना उभे करू शकतात.हे सारं करायचं असल्यानंच त्यांनी शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नाही.शेवटी एकाच घरात किती पदं घेता?असा सवाल जनतेकडून विचारला जाऊ शकतो ती वेळ येऊ नये म्हणून त्यांनी सुरेश टोकरेंचं नाव पुढं केलेलं आहे.”टोकरे सुरेश लाड यांच्या मत दार संघातले आहेत.त्यांना बळ देण्यासाठी ही निवड असल्याचं” तटकरे सांगत असले तरी त्यामागचा हेतू” घरातील पदं लोकांच्या डोळ्यावर यायला नको”हाच होता.

फायद्याच्या तुलनेत तोटे कमीच 

शेकाप बरोबर आघाडी करण्याचे जे राजकीय लाभ राष्ट्रवादीला होणार आहेत त्याच्या तुलनेत होणारे तोटे फार आहेत असं दिसत नाही.महेंद्र दळवी नाराज झाले आहेत.ते शिवसेनेत जाऊ शकतात.एक -दोन जिल्हा परिषद मतदार संघात त्यांची ताकद आहे त्यामुळं ते पक्ष सोडून गेले तरी जिल्हयातील पक्षावर फार परिणाम होणार नाही हे त्याचं गणित आहे.मात्र बोललं असंही जातंय की,अलिबाग राष्ट्रवादी महेंद्र दळवी यांच्याबरोबर आहे.ते बंड करू शकतात.बातमी अशीही आहे की,रोह्यातच राष्ट्रवादीत काही जण बंडाच्या तयारीत आहेत.महेंद्र दळवी किती पाटिबा मिळवितात यावर बरंच अवलंबून आहे.त्यांना मोठा पाठिंबा मिळाल तर मात्र शेकापला पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची घोडचूक ठरू शकते.महेंद्र दळवीची अडचण अशी आहे की,ते बंडखोरवृत्ततीचे आहेत .लोकसग्रह आणि आर्थिकदृष्टया सक्षम असल्यानं  ते वाढू नयेत याची काळजी जयंत पाटील जशी घेत होते तसेच सुनील तटकरे देखील महेंध्र दळवींचे पंख छाटायला संधी शोधत होते.ती मिळाली आहे.मात्र वर म्हटल्याप्रमाणं दळवींना  पाठिंबा मिळाला तर मग मात्र तटकरेंना ही खेळी महागात पडू शकते.

रायगडात आज जे नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे त्याबद्दल लोकांना काय वाटतं़?हा प्रश्न मुर्खपणाचा  आहे.कारण लोकांना काय वाटतं याचा  विचार करून राजकारण करायचं नसतं तर स्व चा विचार करूनच राजकीय खेळ्या खेळायच्या असतात हेच आजच्या राजकारणाचं सूत्र आहे,तसं नसतं तर मग मफलरीनं गळा आवळण्याची धमकी ज्या राज ठाकरे यांनी छगन भुजबळांना दिली होती त्या भुजबळांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला नाशिकमध्य जीवदान दिलं नसतं,किंवा भाजप -सनेचा जातीयवादी असा उद्दार करीत ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी याचं केद्रातील सरकार पाडलं ते रामशेठही भाजपमध्ये गेले नसते.हे सारे तात्विकतेचे मुद्दे  कुलकर्ण्याच्या ओटीवर बसून चर्चेसाठी किंवा वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी चांगले असतात.प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात याला काही अ र्थ नसतो हेच भुजबळ,रामशेठ किंवा आज तटकरे आणि जयंत पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे.एकदा विधिनेषेधच पाळायचा नाही म्हटल्यावर दोन महिन्यांपुर्वी जयंत पाटील यांनी तटकरेंवर सिंचन घोटाळ्याचे  केलेेले आरोप,त्यासाठी आपल्या वर्तमानपत्रांच्या  काढलेल्या पुरवण्या, आपली बदनामी झाली म्हणून  सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या  संपादकांवर दाखल केलेला शंभर कोटींचा दावा या साऱ्या गोष्टीही फुजूल ठरतात. दोन विरोधक आज गळ्यात गळे घालताना पाहून प्रश्न असा पडतो की,काय दोन महिन्यांपूर्वी झालेली लढाई लुटूपुटूची होती काय ?  ,की आपण तटकरेवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहिन होते याचा साक्षात्कार आता जयंत पाटलांना झालाय ? किंवा शेकापला मदत केल्यामुळे सुनील तटकरे शुुचिर्भुत झाले आहेत काय ? हे प्रश्नही  जेवढे  बाष्कळपणाचे तेवढेच वांझोटे ठऱणारे आहेत.जयंत पाटील यांनी केलेले आरोप हा आता इतिहास झाला आहे.शिवतीर्थावर आता जयंत पाटील आणि तटकरे माडीला मांडी लाऊन बसले आहेत, हा वर्तमान आहे.तो तुम्हाला मान्य असो नसो स्वीकारण्याशिवाय तुमच्या आमच्या  हाती काहीच नाही.अन्य पर्यायही नाही.रायगडमधील दोन बलाढ्य शक्ती सोयीनुसार परस्परांशी झुंजत असतात पण तिसरी शक्ती  उदयाला येते असे दिसताच त्या एकत्र येतात आणि महाशक्ती निर्माण करून उदयास येऊ पाहणाऱ्या तिसऱ्या शक्तीचं निर्दालन करतात.मला वाटतं रायगडातील नव्या राजकीय समीकरणाचा एवढाच एक अ र्थ आहे.
(वरील स्लाईडवरील फोटो हे लोकसभा निवडणूक काळातील आहेत.जयंत पाटलांनी त्यावेळेस केलेल्या आरोपाबद्दल आलेल्या बातम्याची ही कात्रणं आहेत.ती मधुकर ठाकूर यांच्या कार्यालयाच्यावतीनं फेसबुक टाकली गेली आहेत.)

(हा लेख आपणास माझ्या   http://smdeshmukh.blogspot.in    या ब्लॉगवरून कॉपी करता येईल)

 एस.एम.देशमुख

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here