वर्धापन दिन…दैनिकाचा..

0
2547
नुकताच’तो’काम करीत असलेल्या त्याच्या दैनिकाचा  वर्धापन दिन होऊन गेलेला असतो.परीक्षा संपल्यावर मुलांच्या मनावरील वार्षिक परीक्षेचा ताण जसा नाहिसा होतो ना! अगदी तसाच त्याच्याही मनावरचा भार काहीसा हलका झालेला असल्याने काहि काळ का होईना,तो चिंतामुक्त भासत असतो.
  अख्खं जग नववर्ष साजरं करीत असताना वर्धापन दिनाच्या जाहिरातीत त्याचा चेहरा हरवलेला असतो.सारं जग परत नवी चेतना,नवे संकल्प घेवुन कामाला लागलेलं असतं,तो मात्र यापासून फार दूर असतो.दिवस रात्रीच्या चक्रात घडणाऱ्या उलथा पालथी तो टीपत असतो.चांगले वाईट प्रसंग बातमी रुपात मांडताना त्याच्या मनातलं सुख- दुःख बातमीच्या मथळयातुन त्याच्या अंतरंगाचं दर्शन घडवत असतं.पत्रकारिता क्षेत्रात येण्यापूर्वी पत्रकारितेचं शिक्षण घेताना ग्रामीण भागात पत्रकारिता हे पोटापाण्याचं साधन होऊच शकत नाही,आपला व्यवसाय,कामधाम सांभाळून समाजसेवा म्हणून पत्रकारितेचं व्रत सांभाळावं लागेल,हे या क्षेत्रात हयात घालविलेल्या गेस्ट लेक्चररचं उपदेशरूपी बाळकडु,आयुष्यभर त्याची सत्यता ठामपणे पटवून देत असतं.संध्याकाळी मुलांना अंगा खांद्यावर खेळवायचं भाग्यही त्याच्या नशिबात नसतं.बातमी टीपता टीपता मूलं कधी झोपी जातात.हे त्याला देखील कळत नाही. गावो गावचे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,वेग वेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांची माहीती हाताशी ठेवावी लागते.’तो’म्हणजे देव नसून माणुसच असल्याने एका वेळी सर्व ठिकाणी उपस्थित राहु शकत नाही, मग एखाद्या हौशी आणि टच मद्धे असलेल्या कार्यकर्त्याकडुन  कार्यक्रमाच्या उपलब्ध माहितीत चुकून एखादं नाव विसरलं तर बातमी देणाऱ्या पत्रकाराने घोर राष्ट्रद्रोह केल्याप्रमाने नाराज मंडळी त्याची खरडपट्टी काढण्याच्या सुरात आपलं नाव का नाही टाकलं?असा प्रश्न करतात.रोज मात्र सर्वांची नावं पेपर मद्धे झळकवणारा हा’जीव’ मात्र स्वतः पेपरमधील प्रसिद्धिपासून दूरच असतो.गावोगावच्या बातमीत भली मोठी कार्यकर्त्यांची यादी वर्धापन दिनाची जाहिरात मिळविताना अगदी एक किंवा दोन या आकड्यावर येवून ठेपते. एरवी माझं नाव नव्हतं बातमीत,असं म्हणणारे नेत्यांचे जिवलग,भाऊ,आण्णा,आप्पा,तात्या,दादा,भावी अमुक अमुक,युवा नेते यांना तुमचा निरोप सांगतो म्हणून बोळवण करतात.बातम्या देत देत वर्ष,भर भर सरत जातं, डिसेंबर येऊन ठेपतो,लोकं नाताळ,थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या योजना बनवत असतात.दैनिकाचा वर्धापन दिन जोरात व्हावा(जाहिरात मिळवून) म्हणून मीटिंग वैगेरे घेतल्या जातात,पुन्हा नवीन स्वप्नं,नवी जाहिरात ध्येय,घेवुन ‘तो’ वर्षभर ज्यांच्या बातम्या एक नवा पैसाही न घेता ईमाने इतबारे रात्री जागून पेपरमद्धे दिल्या,त्यांना जाहिरातीसाठी गळ घालतो.काहि जण मात्र सुदामाला सुवर्णनगरी देणाऱ्या श्री कृष्णाप्रमाणे लगेचंच जाहिरात द्यायला राजी होतात,त्यांचा होकार ऐकताच त्याच्या डोळ्यात त्यांच्यासाठी वर्षभर केलेल्या बातम्यांसारखे अश्रु तरळतात.काहि मात्र फार हट्टी असतात,नकार नाही आणि होकरही नाही अशा अवस्थेत वर्धापन दिनाची तारीख टळेपर्यंत जिद्दीने मीटिंग मद्धे आहे,नंतर फोन करतो म्हणून सुटका करतात,परत फोन लावला तर call you later असा मेसेज टाकून मोकळे होतात,त्यांचंही कधी कधी बरोबर वाटतं,कारण साऱ्या दैनिकांचे वर्धापन जानेवारीला असल्याने प्रत्येक जण गळ टाकून बसलेला असतो.एरवी पत्रकार नावाचा उपयुक्त जीव, त्याच्या दैनिकाचा वर्धापन दिन आल्यावर अचानक ‘उपद्रवी’ वाटू लागतो.प्रयत्नांची शर्त करून वर्धापन दिन जाहिरात मिळविण्यासाठी तो लढत असतो,ही लढाई लढताना बालपणी इतिहासाच्या पुस्तकातली पावनखिंड लढविणाऱ्या बाजी प्रभूंची कथा नकळत त्याला बळ देत असते.मिळेल तितक्या जाहिरातीवर कब्जा करून तो धीर गंभीर नजरेने तोफेचा आवाज ऐकण्यासाठी व्याकुळ बाजींसारखा वर्धापन दिनाच्या जाहिरात पेज ची वाट पाहत असतो,एखाद्याची फूल पेज जाहिरात दिसल्यावर वर्गातल्या स्कॉलर मुलासारखा तो महान वाटू लागतो.पण जाहिरात कशी मिळवायची याचं ज्ञान समान व्यवसायातली माणसं एकमेकांना देत नाहीत,दुर्दैव असं की आता पर्यंत यातून निवृत्त झालेल्यांनीही ही कला पुस्तकात लिहून ठेवली नाही. व्यावहारिक जगात या क्षेत्रातील एका ज्येष्ठांनी दिलेला सल्ला मात्र तंतोतंत खरा ठरतो तो म्हणजे तुम्ही एखाद्याच्या किती बातम्या दिल्या यावरून तुम्हाला जाहिरात मिळत नाही तर तुमचे त्यांच्याशी संबंध किती दृढ आहेत यावरच तुम्हाला जाहिरात मिळत असते.कदाचित त्यामुळेच त्याच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या किती बातम्या केल्या यावर नाही तर तुम्ही जवळचे आहात,तुम्हाला जाहिरातीसाठी कधी नाही म्हटले का?न विचारता आपली जाहिरात टाकत जा. असं आवर्जून सांगितलं. अशात वर्धापन दिन उजाडतो.आलेल्या सर्व जाहिरातींचे निरोप पाठवनं सुरु असतं,अजुन पैसे गोळा करायचे बाकि असतात,पण इतक्या अक्कलहुशारी व अंगमेहतीने मिळविलेल्या जाहिरतींचा पैसा सहसा कुणी बुडवत नाही.विहीरिचा तळ ढवळावा तशी जाहिरात मिळविण्यासाठी सर्व जवळच्या लोकांची चाचपणी करावी लागते.यातून त्याला फार पैसे मिळतात असं मुळीच नाही. त्याला हे समाजसेवेचं व्रत पुढं न्यायचं असतं…एव्हाना वर्धापन दिन होऊन गेलेला असतो,धोका टळलाय हे ओळखून गर्दीतून ‘पत्रकार’साहेब अशी हाक ऐकू येते.तो भारावून जातो.त्याचं गर्दीत हरविलेले मन भानावर येतं आणि अभिवादनासाठी त्याचाही हात वर जातो.आता पुढील वर्धापन दिनापर्यंत हेच ओळखीचे लोक त्याला टाळणार नसल्याने हसत हसत पुढे निघुन जातो.पुढचा वर्धापन दिन येई पर्यंत त्याला काळजी नसते.
                विवेक बच्चे
          राजगुरूनगर,पुणे
         पत्रकार,९८५०९२७१९२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here