रायगड वार्तापत्र

0
854

ढळक घडामोडी

पेण तालुक्यात पाणी टंचाई
महिलांवरील अत्याचारात वाढ 
नागावला जैवविविधा संवर्धन कार्यशाळा संपन्न
रायगडातील अनेक गावांना उजेड मिळणार
शिवजयंती,चवदारतळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा 
 
पेण तालुक्यात पाणी टंचाई 
रायगड जिल्हयात दरवर्षी साडेतीन-चार हजार मिली मिटर पाऊस पडत असतानाही जानेवारीच्या आरंभीच अनेक गावात पाणी टंचाई जाणवायला लागते.टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा कऱण्यासाठी दरवर्षी सरकार कोटयवधींचा चुराडा करीत असले तरी पाणी टंचाई कायम स्वरूपी दूर करता आलेली नाही.पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 28 गावे आणि 43 वाड्यां दरवर्षी प्रमाणेच यंदाही भीषण पाणी टंचाईस तोंड देत आहेत.या भागासाठी 95 लाखांचा पाणी टंचाई आराखडा तयार केलेला असला तरी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असल्याने टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.मात्र टॅकरही कमी पडू लागल्याने गा्रमस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.वस्तुतः पेण तालुक्याला पाणी टंचाईची झळ बसण्याचे कारण नाही.हेटवणे-शङापाडा या दोन धऱणात मुबलक पाणी साठी उपलब्ध आहे.मात्र या दोन धऱणांना जोडणारी नळपाणी पुरवठा योजना गेली पंधरा वर्षे केवळ कागदावरच असल्याने पाण्याचा प्रश्न दरवर्षी  भडसावत असतो.ही योजना 2009मध्ये पुर्नत्वास गेली असती तर ती 22 कोटी रूपयांत पूर्ण झाली असती आज तिचा खर्च दुप्पट म्हणजे 40 कोटींवर गेला आहे.स्थानिकांनी पाणी टंचाई आणि सिंचन व्यवस्था मार्गी लावण्यासाठी पेण ते वर्षा अशी पायी संघर्ष यात्रा काढली होती मात्र तेव्हाही केवळ आश्वासना शिवाय काही मिळाले नाही.सरकार बदलले आहे तेव्हा आता तरी पेण तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा पेण तालुक्यातील जनता व्यक्त करीत आहे.
महिलांवरील अत्याचारात वाढ
रायगड जिल्हयात 8 मार्च रोजी ठिकठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा केला गेला.अनेक ठिकाणी कर्तृत्वान महिलांचे सत्कारही केले गेले.महिलांच्या सर्व क्षेत्राताली योगदानाबद्दल गुणगाणही गायले गेले.मात्र हे सारं होत असतानाच पनवेल तालुक्यात  महिलांवरील अत्याचारांच्या घटनात चिंताजनक वाढ झाल्याचे वास्तवही समोर आलं आहे.पनवेल परिसराचे झपाट्यानं नागरीकरण होत आहे.त्यामुळे सर्वच स्वरूपाच्या गुन्हयात तर वाढ होत आहेच त्याचबरोबर  महिलांवरील अत्याचारांच्या घटनाही सातत्यानं वाढत असल्याचे  उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येतंय.गेल्या 14 महिन्यात पनवेल विभागात विनयभंगाच्या 56 घटना घडल्या.यामध्ये खारघर आघाडीवर असून त्यापाठोपाठ कामोठ्याचा नंबर लागतो.बलात्काराचे 28  गुन्हे दाखल झाले असून त्यातही खारघरमध्ये पाच आणि कामोठ्यात पाच गुन्हयांची नोंद झालीय.498 आणि 509 कलमांतर्गत 41 गुन्हे दाखल झाले आहेत .महिलांवरी वाढत्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
नागावला जैवविविधता संवर्धन कार्यशाळा संपन्न 
अलिबागचा परिसर जैवविविधतेने समृध्द असलेला परिसर म्हणून ओळखला जातो.परिसरात 900हून अधिक वनस्पती प्रजाती,316 प्रकारचे पक्षी,27 सापांच्या प्रजाती,125 हून अधिक फुलपाखरे,20 प्राण्यांच्या प्रजाती,आणि इतर अनेक प्रकारच्या सजीवांचे वास्तव्य या परिसरात असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या अस्तित्तवालाच धोका निर्माण झालेला आहे.हे संकट टाळण्यासाठी आता सामुहिक प्रयत्न व्हायला लागले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग नजिक नागाव येथे ग्रामीण जैवविविधता संवर्धऩ कार्यशाळेचे आयोजन कऱण्यात आलं होतं.त्यामध्ये अलिबाग,उरण,रोहा,मुरूड,चौल,रेवदंडा परिसरातून आलेल्या शंभरावर निसर्ग मित्रांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.कार्यशाळेसाठी निसर्गमित्र संस्था,इला फाऊंडेशन पुणे,अनिस आदि संस्थांनी पुढाकार घेतला होता.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएफचे कार्यकारी संचालक आर.के.जैन,जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर,फणसाड अभयाऱण्याचे सहाय्यक वनसंरक्षक सरोज गवस आदि उपस्थित होते.पक्षी तज्न डॉक्टर सतीश पांडे यांनी विविध प्रजातीचे संरक्षण कऱण्यासाठी त्यांचे अधिवास वाचविणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
रायगडमधील अनेक गावं प्रकाशमय होणार 
देशाला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरही रायगडमधील अनेक गावं, वाड्या,पाडे आजही विजेपासून वंचित आहेत.ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्हयाच्या ग्रामीण भागाला प्रकाशमय करण्याची योजना आखण्यात आली असून  त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे.याबाबतचा 180 कोटी 66 लाख रूपयांचा प्रस्ताव राज्य महावितरण कंपनीतर्फे सरकारला सादर कऱण्यात आला आहे.हा प्रस्ताव मंजुर झाल्यास हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रायगडमधील एकही गाव,वाडी अंधारात असणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या योजनेअंतर्गत 360.50 किलो मिटर लांबीची लघुदाब वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव आहे.1 हजार 174 वितरण रोहित्राची गरज लागणार आहे आणि 92 किलो मिटर एरियल बंच केबलची गरज भासणार आहे.या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील 11 हजार 767 घरांना वीज देण्याचे योजना आहे.त्यासाठी 180 कोटी 66 लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब बाघंबरे यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवजयंती आणि चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन साजरा
रायगड जिल्हयात शिवजयंती आणि चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा कऱण्यात आला.शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत रायगड किल्ल्यावर मोठ्या जल्लोषात कऱण्यात आलं.महाडमध्ये शिवाजी पुतळ्याचे विधीवत पुजन कऱण्यात आलं.त्यानिमित्त भगव्या पताका,झेंडे आदिंमुळे वातावरण भगवे झाले होते.शिवप्रतिमेची शहरातून मिरवणूकही काढण्यात आली होती.मिरवणुकीत विविध तेलचित्रांचे देखावे सादर कऱण्यात आले होते.रायगडच्या अन्य शहरात देखील शिवजयंती उत्सहात साजरी केली गेली.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा 88 वा वर्धापन दिन नुकताच महाडमध्ये साजरा कऱण्यात आला.त्यानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कऱण्यासाठी देशाच्या विविध भागातून भिमसागर मोठ्या प्रमाणात महाडमध्ये उसळला होता.20 मार्च 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी चवदार तळ्याचे पाणी पिऊन सामाजिक क्रंातीचे रणशिंग फुंक ले होते.या ऐतिहासिक दिनाच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात यासाठी दरवर्षी महाडमध्ये 20 मार्च मुक्तीदिन म्हणून साजरा कऱण्यात येतो.या वर्षी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता ,खा.रामदास आठवले,जोगेंद्र कवाडे,प्रकाश आंबेडकर,चंद्रकांत हंडोरे,मनोज संसारे आदि उपस्थित होते.
शोभना देशमुख अलिबाग-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here