रायगड वार्तापत्रःःः

0
1250

 8 कोटी 63 लाखांचा पाणी टंचाई आऱाखडा तयार

रायगडमध्ये साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडत असतानाही दरवर्षी पाणी टंचाई निवारण करण्यासाठी कोटयवधी रूपये खर्च होतात.यावर्षी देखील 8 कोटी 63 लाख रूपयांचा पाणी टंचाई आराखडा जिल्हा परिषदेने तयार करून तो जिल्हाधिकार्‍यांकडं पाठविला आहे.या आराखडयात तब्बल 1810 गावं आणि वाडया पाणी टंचाईग्रस्त असल्याचं नमूद करण्यात आलंय.पेण,महाड,पोलादपूर या तालुक्यांना पाणी टंचाईची झळ अधिक बसते.पाणी टंचाईशी मुकाबला करण्यासाठी 1231 गावं आणि वाडयांवर टँकरनं पाणी पुरवठा केला जाणार आहे.त्यासाठी 5 कोटी 32 लाखांची तरतूद केली गेलीय.579 ठिकाणी विंधन विहिरी बांधल्या जाणार आहेत.त्यासाठी 3 कोटी 30 लाख रूपये खर्च होणार आहे.गेल्या वर्षी 964 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला गेला होता.म्हणजे यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असं दिसतंय.गेल्या वर्षी 512 ठिकाणी विंधन विहिरी बांधल्या गेल्या होत्या.उन्हाळा आला की,पाणी टंचाई निवारण आरखडे तयार होतात,कोटयवधी रूपये त्यावर खर्च होतात पण पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होताना दिसत नाही.टँकरमुक्त रायगडचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार ही रायगडवासियांना प्रतिक्षा आहे.– 8 कोटी 63 लाखांचा पाणी टंचाई निवारण आराखडा तयार

 पर्यावरण मंत्र्यांकडून अलिबागकरांचं कौतूक

स्वच्छ,सुंदर आणि विस्तीर्ण समुद्र किनारा हे अलिबागचं वैशिष्ट्य आहे.असं सांगितलं जातं की,कोकणातील अन्य किनार्‍यांच्या तुलनेत अलिबागचा किनारा सर्वात स्वच्छ किनारा आहे.अलिबागकरांनी घराच्या अंगणासारखी या किनार्‍याची देखभाल केली आहे.या स्वच्छतेबद्दल स्वतः पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही अलिबागकरांचं कौतूक केलंय.’अलिबाग एवढा स्वच्छ समुद्र किनारा मी पाहिला नाही,अलिबागकरांनी किनार्‍याची राखलेली स्चच्छता पाहून मला आनंद होत आहे ,मी अलिबागकरांचे अभिनंदन करतो’ अशा शब्दात रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आणखी एका गोष्टीचं कदम यांनी कौतूक केलं.जिल्हा प्रशासनानं स्वयंप्ररेणेतून रायगड किल्ला प्लॅस्टिकमुक्त केलाय.ही बाब देखील अभिनंदनीय असल्याचं मत त्यांनी नोंदविलं.हा रायगड पॅटर्न संपूर्ण राज्यात नेऊन राज्यातील सर्व गड-किल्ले प्लॅस्टिकमुक्त करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं..राज्यात पाडव्यापासून प्लास्टिक बंदी केली जात आहे.त्यानुषंगानं अलिबागला आयोजित बैठकीत रामदास कदम यांनी विविध सूचना केल्या.

 फौजी आंबवडेला जिल्हाधिकारी देणार भेट 

महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे असं एक गाव आहे की,या गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरी तरूण लष्करात भरती होऊन सीमांंचं रक्षण करतोय.आज गावातील तिनशेच्यावरती तरूण भारतीय लष्करात आहेत तर जवळपास अडीचशे माजी सैनिक गावात वास्तव्य करून आहेत.ही परंपरा आजची नाही.पहिल्या महायुध्दात गावातील 111 तरूण सहभागी झाले होते.त्यातील सहाजणांना वीरमरण आले होते.या वीर जवानांच्या स्मरणार्थ तत्कालिन ब्रिटिश सरकारनं उभारलेला स्मृतीस्तंभ आजही तरूणांना प्रेऱणा देत असतो.23 वाडया आणि 12 कोंडांच हे गाव विकासापासून मात्र कोसोमैल दूर आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटलेला नाही.त्यामुळं मोठी नाराजी व्यक्त होत आहे.गावातील लोकांच्या तक्रारी आणि माध्यमांनी उठविलेला आवाज लक्षात घेऊन आता जिल्हाधिकाऱी लवकरच फौजी आंबवडेला भेट देणार आहे.तेथे काय काय समस्या आहेत याचे अहवाल पाठविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्थानिक अधिकार्‍यांना दिल्याने गावात आनंदाचं वातावरण आहे.वर्षानुवर्षे विकासापासून दूर असलेल्या या गावाची दैना आता संपते का ते पहायचे आहे..

पत्रकार दिन उत्साहात साजरा

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,यावेळी बोलताना भालेराव यांनी ,पुढील पिढीला सकारात्मक पत्रकारितेचा वारसा देण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारितेवर आहे असं मत मांडलं.यावेळी साहित्यिक शरद कोरडे यांच्या झुला या पुस्तकाला राजा राजवाडे स्मृती पुरस्कार देण्यात आला.म.ना.पाटील पुरस्कार तळा येथील पत्रकार संध्या पिंगळे यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार रोहा येथील पत्रकार विश्‍वजित लुमण यांना दिला गेला.यावेळी आमदार पंडित पाटील,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.–

शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here