रायगड प्रेस क्लब: संघटना नव्हे एक कुटुंब 

0
1442

रायगड प्रेस क्लबचा 13 वा वर्धापन दिन उद्या साजरा होतोय.दर वर्षी जिल्हयातील वेगवेगळ्या भागात हा कार्यक्रम घेतला जातो.यंदा म्हसळ्याची निवड केली गेली आहे.रायगड प्रेस क्लबचा वर्धापन म्हणजे जिल्हयातील पत्रकारांसाठी एक बौध्दिक मेजवाणी असते. गेट टुगेदरही असते.रायगड जिल्हयाचा विस्तार पनवेल ते पोलादपूर असा आहे.150 किलो मिटरचं हे अंतर असलं तरी वेगवेगळ्या भागातून न चुकता सारे पत्रकार वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहतात.यामागं संघटनेवरील प्रेम हे तर कारण असतंच पण परस्परांच्या भेटीची ओढही त्यामागे असते.रायगड प्रेस क्लब ही केवळ संघटना नाही.रायगडमधील पत्रकारांचं हे कुटुंब आहे.आदर्श कुुटुंंबात जो एकोपा,परस्पर जिव्हाळा,प्रेम असते ते सारं येथे दिसतं.भांडयाला भांडं लागतंच नाही असं नाही पण ते तात्कालिक असतं.त्यातून दुरावा किंवा अढी निर्माण झाल्याचं मला दिसलं नाही.स्पर्धा,इर्षा,व्देष ही भावनाही नसते.त्यामुळं रायगड प्रेस क्लब हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे.रायगड प्रेस क्लबच्या स्थापनेत माझा पुढाकार नक्कीच होता.पण मी निमित्त मात्र होतो.तसं नसतं तर मी आता पाच वर्षे रायगडमध्ये नाही तरीही ही चळवळ तेवढ्याच जोमाने,नेटानं चालू राहिली नसती  .रायगड प्रेस कल्बचा अध्यक्ष कोण हे विशेष महत्वाचं नसतं.रायगड प्रेस क्लबनं नेहमीच सामुहिक नेतृत्व मान्य केलेलं असल्यानं सारेच अध्यक्ष आणि सारेच सदस्य अशी येथे भावना असते.त्यामुळं इगो,अहंकाराची लागण या संस्थेला झालेली नाही.तरूण पत्रकारांची ही संघटना राज्यातील  एक आदर्श पत्रकार संघटना आहे असं माझं ठाम मत आहे.

रायगड प्रेस क्लब ही पत्रकारांची संघटना आहे त्यामुळं पत्रकारांचे प्रश्‍न सोडविणे हे तर संघटनेचे कर्तव्यच आहे.ते निर्धाराने पार पाडले जातेच .पत्रकारांना प्रशिक्षण देणे,पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचे कौतूक करणे,आरोग्य तपासणी शिबिरं घेणं ही सारी काम तर प्रेस क्लबनं केलीच पण त्याचबरोबर जेव्हा प्रकाश काटदरे याचं निधन झालं तेव्हा त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आणि त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याचं मोठे काम प्रेस क्लबनं केलं.म्हसळ्याच्याच अमोल जंगमच अकाली निधन झालं.कुटुंबावर आकश कोसळलं अशा स्थितीत रायगड प्रेस क्लबनं पुढं येत त्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला.ही वाणगी दाखलची दोन उदाहरणं आहेत.मात्र इतर अऩेक पत्रकारांना वेळोवेळी प्रेस क्लबनं मदतीचा हात दिलेला आहे.हे फार महत्वाचे आहे.आपल्या हक्कासाठी तर आपण नेहमी लढतच असतो.मात्र जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपल्याबरोबर कोणी नाही ही जाणीव कोणत्याही पत्रकाराला होता कामा नये याची काळजी रायगड प्रेस क्लब घेत आहे त्याचं कौतूक केलं पाहिजे.त्यामुळंच मला रायगड प्रेस क्लबचं काम आदर्शवद वाटते.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक लढयात ही संस्था बिनीचे शिलेदार म्हणून कायम पुढे राहिलेली आहे.मुंबईच्या जवळ असल्यानं आम्ही प्रेस क्लबला हक्कानं आवाज द्यायचा आणि येथील पत्रकारांनी ओ म्हणत धावत यायचं हे नेहमीच होते.आजही हा सिलसिला चालूच आहे.पत्रकार संरक्षण कायद्यासाठीच्या लढाईतही रायगड प्रेस क्लबनं केलेली मदत विसरता येणारी नाही.

 रायगड प्रेस क्लब पत्रकारांची संघटना आहे म्हटल्यावर पत्रकारांचे प्रश्‍न सोडविणे हे तर संस्थेचं उद्ष्टिच आहे पण केवळ ही संघटना तेवढंच करून थांबलेली नाही.समाजाचंही आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवत जिल्हयातील विविध सामाजिक प्रश्‍न क्लबने हाती घेतले आणि ते सोडविले देखील.मुबंई-गोवा महामार्गाचं मार्गी लावलेलं काम हे रायगडमधील पत्रकारांचं ऐतिहासिक कार्य म्हणावे लागेल.सतत आठ वर्षे पाठपुरावा करून, विविध स्वरूपाची शांततेच्या मार्गानं आंदोलनं करून पत्रकारांनी हा प्रश्‍न धसास लावला.मुंबई-गोवा महामार्गाचं काम आज सुरू झालं.या महामार्गाचं श्रेय कोणाला घ्यायचंय ते घेऊ द्या,पण मला विचाराल तर या कामाचं श्रेय फक्त आणि फक्त कोकणातील पत्रकाराचं आणि त्यातही रायगड प्रेस क्लबचंच आहे.सेझच्या निमित्तानं जिल्हयातील गरीब शेतकर्‍यांच्या जमिनी अत्यल्प दरात घश्यात घालण्याचे उद्योग झाले.त्याविरोधात प्रेस क्लबनं आंदोलनं केली आणि सेझला पिटाळून लावण्यात देखील मोठे योगदान दिले.जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कसा  सोडविता येईल  यावर एक सर्व्हे केला गेला,त्याचा अहवाल सरकारला सादर करून पाणी प्रश्‍नावरचा कायम स्वरूपी उतारा काय असेल हे सरकार दरबारी कथन केले एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष हातात फावडे घेऊन वनराई बंधारे उभारण्याचं कामही या संस्थेनं केलं आहे.शहरातील नागरी समस्या दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येक शहरात महाचर्चा घडवून आणत एक सकारात्मक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला.लोकांच्या आरोग्याचे प्रश्‍न असतील किंवा शैक्षणिक प्रश्‍न असतील त्याविरोधात आवाज उठविण्याचं प्रसंगी रस्त्यावर येण्याचं काम प्रेस क्लबनं केलं आहे.थोडक्यात जिल्हयाच्या हितासाठी एक दबावगट म्हणूनच रायगड प्रेस क्लबन काम करीत आहे.त्यामुळं राजकीय,सामाजिक क्षेत्रात ही संस्था आपली स्वतंत्र ओळख तर निर्माण करू शकली त्याचबरोबर आपल्या नावाचा दबदबाही रायगड प्रेस क्लबनं निर्माण केला आहे.पत्रकारांची संघटना कशी असावी,ती कशी चालवावी हे जर कोणाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी रायगड प्रेस क्लब हे उत्तम उदाहरण आहे.रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिनास आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here