कोणी काहीही म्हणू देत,,कोणी कसलेही तर्क लढवू देत..,रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हेच असतील हे नक्की.याची मुख्य दोन कारणं आहेत.पहिलं असं की,सुनील तटकरेच अनंत गीते यांना समर्थ लढत देऊ शकतात.शरद पवार देखील हे ओळखून आहेत.त्यामुळं भास्कर जाधव याचं नाव समोर आलं असलं तरी तिकट तटकरेंनाच दिलं जाणार या बाबत शंका व्यक्त्त करण्याचे कारण नाही .शरद पवार यांच्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे.त्यांना महाराष्ट्रातून लोकसभेच्या किमान दोन अंकी जागा हव्यात.अशा स्थितीत ज्या जागांवर पक्ष विजयी व्हायची शक्यता आहे तेथे शरद पवार प्रयोग करणार नाहीत हे दुसरं कारण आहे.

2014 ला मोदींची लाट होती.भाजप-शिवसेना तेव्हा एकत्र लढले होते.शिवाय शेकाप तेव्हा सुनील तटकरेंच्या कट्टर विरोधात  होता.म्हणजे सारं वातावरण  तटकरेंसाठी प्रतिकूल होतं.  तरीही तटकरेंचा निसटता पराभव झाला होता.जेमतेम दोन हजारच्या मताधिक्क्यानं अनंत गीते तेव्हा विजयी झाले होते.अनंत गीते यांना आज स्थिती तेवढी अनुकूल नाही.शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.समजा सेना-भाजप एकत्र लढले तरी यावेळेस शेकाप हा सुनील तटकरेंबरोबर आहे.मतदार संघात शेकापची हक्काची सव्वालाख मतं आहेत.गेल्या वेळेस रमेश कदम या आयात केलेल्या उमेदवाराला 1,29,730 एवढी मतं पडली होती.ही मतं यावेळेस तटकरेंच्या पारडयात पडली तर सुनील तटकरेंचा विजय प्रचंड मताधिक्कयानं होऊ शकतो. हे सांगण्यासाठी भविष्यवेत्याची गरज नाही.याला आणखी एक किनार आहे ती म्हणजे केंद्रात मंत्रीपद असताना देखील अनंत गीते रायगडसाठी फार काही भव्यदीव्य करू शकलेले नाहीत.मोठा गाजावाजा केल्यानंतरही पेण ते अलिबाग दरम्यान आरसीएफच्या रेल्वे मार्गावरूनही प्रवासी रेल्वे त्यांना सुरू करता आलेली नाही.त्यामुळं एक प्रकारची नाराजी जिल्हयात आहे.त्याचा थेट फायदा तटकरे यांना होऊ शकतो.

अर्थात राज्यातील सत्तेमुळे असेल पण  रायगडात शिवसेना वाढली आहे .  सुनील तटकरेंचा एकछत्री अंमलही जिल्हयावर राहिलेला नाही. एका अपक्ष उमेदवारानं रोह्यातच  सुनील तटकरेंना घाम फोडला होता हे नजरे करता येण्यासारखं नाही किंवा नव्हतं. एका बाजुला म्हणजे दक्षिण रायगडात शिवसेनेचा प्रभाव वाढत होता आणि पनवेल-उरण परिसरात रामशेठ ठाकूर यांनी कमळ हातात घेतल्यापासून शेकाप आणि राष्ट्रवादीच्या नाकीदम आणला होता.दोन्ही बाजुनं होणारं हे आक्रमक परतवून लावायचं तर दीर्घकालीन वैमनस्य विसरून शेकाप आणि राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता.प्रश्न अस्त्तीत्तवाचा  असल्यानं जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांना अपरिहार्यपणे  काही राजकीय तडजोडी कराव्या लागल्या .या तडजोडींचा चांगलाच फायदा दोन्ही पक्षांना झाला.युतीनंतर सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी जे ठरवलं,जसं ठरवलं तसं घडत गेलं.सुरूवात बाळाराम पाटील यांच्या निवडणुकीपासून झाली.बाळाराम पाटलांचा विजय युती झाल्यामुळंच शक्य झाला हे कोणी अमान्य करू शकत नाही.जिल्हा परिषद निवडणुकानंतर अध्यक्षपदाचा विषय देखील दोन्ही पक्षांनी राजकीय धूर्तपणा दाखवत सोडविला.शेकापच्या जागा अधिक असतानाही अध्यक्षपद आदिती तटकरे यांना दिलं गेलं.जयंत पाटील यांचा हा निर्णय पेणमधील बहुतेक शेकाप नेते,कार्यकर्ते यांना मान्य नव्हता.अन्यत्रही याबाबत कुजबुज सुरू होती.तरीही जयंत पाटील यांनी तो रेटून नेला.पदवीधर मतदार संघातून चित्रलेखा पाटील यांना शेकाप उभं करणार अशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या.तेव्हाही शेकापनं माघार घेत अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला.आपली सारी मतं अनिकेत तटकरे यांच्या पारडयात टाकली.ते विजयी झाले.या दोन्हींच्या बदल्यात मग स्वतःचा विजय जयंत पाटील यांनी नक्की करून घेतला.जयंत पाटील विधान परिषदेवर बिनविरोध विजयी झाले.राजकीय तडजोडी करीत दोन्ही पक्षांनी सत्ता वाटून घेतली.अशा पध्दतीनं सतेचं वाटप होत असतानाच लोकसभेचंही गणित ठरलेलं होतं.लोकसभा सुनील तटकरेंनी लढवावी.शेकापनं त्यांना मदत करावी.याबदल्यात विधानसभेची एखादी अतिरिक्त जागा राष्ट्रवादी शेकापला देऊ शकते.रायगडात जयंत पाटील आणि सुनील तटकरे गळ्यात गळे घालून फिरत असल्यानं अनंत गीते यांच्यासाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.2014 मध्ये शेकापचा स्वतंत्र उमेदवार असताना सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना जवळपास सारखीच मतं पडली होती.यावेळेस शेकापची मतं सुनील तटकरेंना पडणार असल्यानं या सव्वालाख मतांचा फरक भरून काढणं अनंत गीतेंसाठी मोठंच आव्हान आहे.

लोकसभेचे तिकीट सुनील तटकरे यांच्याऐवजी भास्कर जाधव यांना  मिळालं तर ही परिस्थिती कायम राहिल काय ?  हा प्रश्‍न आहे.याचं कारण रायगड लोकसभा मतदार संघ रायगड आणि रत्नागिरी जिल्हयात विभागला गेला असला तरी विधानसभेचे चार मतदार संघ रायगडमधील  आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोनच विधानसभा मतदार संघ रायगड मतदार संघात येतात.याचा अर्थ रायगड जिल्हयातलं मतदान जास्त आहे.म्हणजे उमेदवार रायगडचा असेल तर त्याचा लाभ होऊ शकतो.राष्ट्रवादीला नक्कीच याची जाणीव आहे.त्यामुळं भास्कर जाधव यांनी जरी इच्छा व्यक्त केलेली असली आणि त्यांच्यासाठी माघार घेण्याची तयारी सुनील तटकरे यांनी जरी दाखविली असली तरी हे गणित वाटतं तेवढं सोपं नाही.याचं कारण किमान कोकणातल्या जनतेला सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातील संबंध कसे आहेत याची चांगली जाणीव आहे.दोन्ही नेते एकाच पक्षात असले तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते परस्परांचं खच्चीकरण कऱण्याचा प्रयत्न करीत असतात.अशा स्थितीत बैठकीस उपस्थित न राहता हस्ते – परहस्ते भास्कर जाधव यांनी आपली इच्छा व्यक्त करावी आणि लगेच सुनील तटकरे यांनीही माघार घेण्याची तयारी दाखवावी हे दिसतं तेवढं सोपं नाही.भास्कर जाधवांना  तटकरेंचा कोकणात प्रतीस्पर्धी आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न असावा किंवा लोकसभेच्या निमित्तानं पदरात अन्य काही पाडून घेण्याचा तरी विचार असावा.

भास्कर जाधवांचे हे डावपेच सुनील तटकरेंसाऱख्या चाणाक्ष नेत्याला माहिती नसतील असं थोडंच आहे ? त्यांनीही मग आौदार्याचा आव आणत भास्कर जाधव यांच्यासाठी माघार घेण्याची तयारी दाखविली.सर्वांनाच माहिती आहे की,स्वतः तटकरे दिल्लीत जायला फारशे इच्छूक नाहीत.भास्कर जाधव आपली ही इच्छा सफल करीत असतील तर आपण माघार घेण्यात शहानपण आहे हे त्यांनी ओळखलं आणि तशी तयारी दाखविली. उमेदवार बदलणार असेल तर मित्र पक्षाची भूमिका देखील बघावी लागणार आहे.सुनील तटकरेंच्याबाबतीत शेकापची जी भूमिका आहे ती भास्कर जाधव यांच्याबाबतीत असेलच असं नाही.कदाचित वेगळं राजकारण शिजू शकतं आणि तिसरा उमेदवारही उभा राहू शकतो.पक्षाला हे सारं परवडणारं नाही .  दोघांचे ‘गुरू’ असलेल्या शरद पवारांना दोन शिष्यातील हे  राजकारण ज्ञात नाही असं नाही.त्यामुळंच कोणताही धोका न पत्करता ते ऐनवेळी रायगडचं तिकीट सुनील तटकरे यांच्याच पदरात टाकणार हे नक्की.

एस.एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here