मुंबईः मुंबई -गोवा महामार्गाला आद्य पत्रकार,  दर्पणकार  बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.कोकणातील पत्रकारांनी 2007 ते 2011 या कालावधीत या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी सातत्यानं आंदोलनं केली.धरणे,घेराव,रस्ता रोको,मशाल मार्च,लाँगमार्च,उपोषणं,मानवी साखळी,घंटा नाद अशा सनदशीर मार्गाने सर्व प्रकारची आंदोलनं केली गेली .मुंबईला जोडणार्‍या अन्य सार्‍या मार्गाचं चौपदरीकरण झालं होतं मात्र मुंबई-गोवा महामार्गाकडं दुर्लक्ष केलं जात होतं हे वास्तवही कोकणातील जनतेच्या  निदर्शनास आणून दिलं गेलं, कोकणावर अन्याय होतोय,रस्त्यावर दररोज दीड माणसं मृत्यूमुखी पडताहेत आणि चार माणसं कायमचे जायबंदी होताहेत ही विदारकता आणि खराब रस्त्यांमुळं होणारा वेळेचा आणि पैश्याचा अपव्यय याबाबी देखील जनतेच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या आणि जनतेचा पाठिंबा मिळविला गेला.या मागणीसाठी पत्रकारांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला.पत्रकार शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरत होते तव्दतच लेखणीच्या माध्यमातून देखील या प्रश्‍नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत होते.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर ही पहिली वेळ होती की,एक विषय घेऊन पत्रकार रस्त्यावर उतरले होते आणि सतत चार-पाच वर्षे मागणीचा पाठपुरावा करीत होते. अखेर पत्रकारांच्या या अनोख्या लढ्याची सरकारला दखल घ्यावी लागली.2012 मध्ये महामार्गाच्या रूंदीकरणाचं काम सुरू झालं.कोकणातील पत्रकारांच्या एकजुटीचा  हा मोठाच विजय होता.

पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचं काम जसं सध्या  सुरू आहे तसंच तळ कोकणातही आता काम वेगाने सुरू झालेलं आहे. महामार्गाचं श्रेय घेण्यासाठी अनेक राजकीय पुढारी पुढं आले आहेत .’आमच्यामुळेच हे काम होत असल्याचे’ डांगोरे पिटले जात आहेत .. ते साफ झूट आहे . हे श्रेय केवळ आणि केवळ पत्रकारांचे आणि कोंकणातील जनतेचे आहे . जेव्हा पत्रकार आंदोलनं करीत होते तेव्हा एकाही राजकीय नेत्यानं पत्रकारांच्या बाजुनं साधं पत्रकही काढलं नव्हतं.वारंवार विनंत्या करून देखील विधानसभेत हा प्रश्‍न उपस्थित करायला देखील आज श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी तयार नव्हते,उलटपक्षी मुंबई गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा विषय आला की,रेवस-रेडी हा सागरी मार्ग झाला पाहिजे असे सल्ले देऊन विषयांतर करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळं पत्रकारांची एकाकी लढाई सुरू होती.या लढ्यातून हा मार्ग झालेला असल्यानं या  महामार्गाला कोकणातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देणं उचित ठरणार आहे.असं मत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे.

बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोभुर्ले येथील.त्यांनी मुंबईत येऊन दर्पण नावाचे पहिले मराठी नियतकालिक सुरू केले.प्रकांड पंडित आणि भाषाप्रभू असलेल्या बाळशास्त्री जांभेकर याचं नाव महामार्गाला दिल्यास राज्यातील पत्रकारांना त्याचा आनंद तर होईलच शिवाय ते बाळशास्त्रींचे खरे स्मारक ठरेल.

आपल्याकडं रस्ते,पूल,इमारतींना राजकीय नेत्यांची नावं देण्याचीच पध्दत आहे.कारण त्या त्या पक्षाचे किंवा विचारांचे कार्यकर्ते त्यासाठी आग्रही असतात.अंतिमतः अनेकदा राजकीय गरजेतून किंवा मजबुरीतून अशी नावं दिली जातात.त्यामुळं साहित्यिक,विचारवंत,कलावंत,पत्रकार हे कायम उपेक्षित राहतात. कोकणातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देऊन फडणवीस सरकारने  एक नवा आदर्श पायंडा घालून द्यावा असा आग्रह  देशमुख यांनी धरला  आहे

मराठी पत्रकार परिषदेच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव एक मतानं संमत करण्यात आला असून या मागणीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here