मित्रांनो मी आपली वाट बघतोय,शेगावला भेटायचं आहे..

पत्रकार मित्रांनो नमस्कार.

मराठी पत्रकार परिषदेचे 41 वे व्दैवार्षिक अधिवेशन येत्या 19 आणि 20 ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे संपन्न होत आहे.मला खात्री  आहे की,पिंपरी-चिंचवड,रोहा किंवा औरंगाबादच्या अधिवेशनापेक्षाही शेगावमध्ये पत्रकारांची उपस्थिती मोठी असणार आहे.कारण मराठी पत्रकार परिषदचे अधिवेशन हे केवळ दोन दिवस एकत्र यायचे, मौज मजा करायची आणि परत जायचे असे नसते.तर संघटनेच्या कार्याला नवी दिशा ,नवी उर्जा,नवी प्रेरणा देण्याचे काम अधिवेशनाच्या माध्यमातून होत असते..अधिवेशनावरून परत जाणारे पत्रकार एकीचा,परस्पर सहकार्याचा आणि समाजासाठी काही करण्याचा संकल्प घेऊन परत जात असतात हा नेहमीचा अनुभव आहे . पिंपरी-चिंचवडच्या अधिवेशनानंतर  तर मराठी पत्रकार परिषदेचा महाराष्ट्रात झंझावात निर्माण झाला .गेल्या दोन वर्षात कधी नव्हे अशी राज्यात पत्रकारांची भक्कम एकजूट निर्माण झाली.राज्यातील पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले.त्याचा दबाब स्वाभाविकपणे सरकारवर आला आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले पत्रकारांचे 19-20 प्रश्‍न या दोन वर्षात मार्गी लागले .  पत्रकार संरक्षण कायदा हा त्यापैकी एक..पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई आपण पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचय नेतृत्वाखाली लढलो असलो तरी त्यात मराठी पत्रकार परिषदेचा सिंहाचा वाटा होता हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.पेन्शनचा विषय देखील परिषद मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही.छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांचा विषय परिषदेने गंभीरपणे घेतलेला आहे.मराठा मोर्चामुळे ९ ऑगस्टचे आंदोलन तात्पुर्ते स्थगित  करण्यात आले असले तरी त्यांच्या प्रश्‍नांवर मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.इतरही अनेक विषय आहेत.आरोग्याचा,अधिस्वीकृती समिती घेत असलेल्या पत्रकार विरोधी निर्णयाचा विषयही आहे.या आणि अन्य प्रश्‍नांवर आपल्याला चर्चा करून निर्णय घ्यायचे आहेत.परिषदेच्यावतीने पत्रकारांना गरजू,व्याधीने त्रस्त पत्रकारांना आर्थिक मदत देता यावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न आहे.गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या पध्दतीनं आपण 23 पत्रकारांना 30 लाख रूपयांची मदत केली असली तरी हे काम अधिक विस्तारले पाहिजे आणि तालुक्या तालुक्यातील पत्रकारांनाही आपणास मदतीचा हात देता आला पाहिजे असा आपला प्रयत्न्  असणार आहे.यापुढे कोणताही पत्रकार एकटा किंवा एकाकी नाही हे जगाला दाखवून द्यायचे आहे. त्यावरही आपल्या सर्वांंच्या उपस्थितीत ठोस निर्णय घ्यायचा आहे.त्यामुळं आपल्या सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे.

आपले सहकारी,बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या स्वागताच्या तयारीसाठी अहोरात्र झटत आहेत..2500 पत्रकार येतील असे गृहित धरून नियोजन केले जात आहे.येणार्‍या पत्रकारांची निवास आणि भोजनाची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे.भव्य हॉलमध्ये आपले हे अधिवेशन संपन्न होत आहे.2000 नंतर तब्बल 17 वर्षांनी विदर्भात अधिवेशन होत असल्यानं त्यालाही ऐतिहासिक महत्व आहे.अनेक मान्यवर वक्ते अधिवेशनास उपस्थित राहून आपली मतं मांडणार आहेत.विविध परिसंवाद,चर्चासत्र,मुलाखतीचे कार्यक्रम आहेत.रात्री मनोरंजनाचाही कार्यक्रम आहे.एक भव्य-दिवय सोहळा शेगाव नगरीत पार पडत आहेत.या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपणासर्वाना आग्रहाचं निमंत्रण आहे.

खरं म्हणजे अधिवेशनाच्या पत्रिका छापायलाच माझा विरोध आहे.कारण हे अधिवेशन आपले घरचं कार्य आहे.तसं समजूनच प्रत्येक पत्रकारानं,सदस्यानं अधिवेशनाला आलं पाहिजे असा माझा आग्रह आणि विनंती  आहे माहितीसाठी पत्रिका छापल्या जातील,मात्र त्या सर्वापर्यंत पोहोचणे अशक्य आहे.सोशल मिडियाच्या माध्यमातूनच त्या पाठविल्या जातील.त्याचा स्वीकार करावा आणि शेगावला यावं अशी माझी विनंती आहे. मला खात्रीय की,मोठ्या  संख्येनं पत्रकार या अधिवेशनास उपस्थित राहतील आणि आपल्या संघटनेवरचं प्रेम,संघटनेबद्दलचा  आपलेपणा व्यक्त करून .ंंमराठी पत्रकार परिषद अधिक भक्कम,मजबूत करण्यासाठी हातभार लावतील.

 मित्रांनो मी आपली वाट बघतोय,शेगावला भेटायचं आहे..-

 आपला नम्र

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here