मराठी पत्रकार परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार मा.गो.वैद्य यांना 

 प्रतिष्ठेचा  जीवन गौरव पुरस्कार जाहीर 

मुंबई दिनांक 18 मे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना म्हणून सर्व परिचित असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत आणि तरूण भारतचे भूतपूर्व संपादक श्री.मा.गो.तथा बाबुराव वैद्य यांना जाहीर झाला आहे.25 हजार रूपये रोख,मानपत्र,स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  जूनच्या तिसर्‍या आठवडयात नागपूर येथे होणार्‍या एका कार्यक्रमात मा.गो.वैद्य यांना जीवन गौरव पुरस्काराने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.गेल्या वर्षी हा पुरस्कार वयोवृध्द पत्रकार दिनू रणदिवे यांना देण्यात आला होता. परिषदेच्या् अन्य अकरा पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली आहे.

मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची पहिली संघटना आहे.1939 मध्ये स्थापन झालेल्या परिषदेशी राज्यातील आठ हजारांवर पत्रकार जोडले गेलेले आहेत.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी पत्रकारितेत उत्कृष्ठ काम करणार्‍या तरूण आणि ज्येष्ठ पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.माध्यम जगतात या पुरस्कारांना विशेष प्रतिष्ठा आहे. यावर्षी मा.गो.वैद्य यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

परिषदेने आज जाहीर केलेले 2015-2016 चे अन्य पुरस्कार असे

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना जाहीर करण्यात आला आहे,तर आचार्य अत्रे पुरस्काराने महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके यांना सन्मानित केले जाणार आहे.ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार यंदा लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी  संपादक गजानन जानभोर यांना जाहीर झाला आहे.महिला पत्रकारांसाठी असलेल्या सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांची निवड करण्यात आली आहे.कोकणातील पत्रकारांसाठी असलेला उद्योगपती रावसाहेब गोगटे पुरस्कार यंदा सिंधुदुर्गमधील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत यांना दिला जाणार आहे.मराठवाडयातील पत्रकारांसाठीचा नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार बीड येथील दैनिक चंपावतीपत्रचे मालक,संपादक नामदेवराव क्षीरसागर यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कारासाठी रायगड टाइम्सचे युवा संपादक राजन वेलकर यांची निवड करण्यात आली असून भगवंतराव इंगळे पुरस्कार धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा एकला चलो रे नियतकालिकाचे संपादक गो.पी.लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.मुंबईतील तरूण पत्रकारासाठी यंदा पासून सुरू करण्यात आलेला स्व.शशिकांत सांडभोर पुरस्कार यंदा न्यूज  २४ चे ब्युरो चीफ  विनोद जगदाळे यांना घोषित करण्यात आला आहे.पत्रकार प्रमोद भागवत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा शोध पत्रकारिता पुरस्कार  हितवाद चे प्रतिनिधी    कार्तिक लोखंडे  यांना दिला जाणार आहे.पत्रकारांसाठीचे विविध उपक्रम राबवून राज्यात सर्वोत्कृष्ठ कार्य करणार्‍या पुणे जिल्हा पत्रकार संघाला यंदाचा पत्रमहिर्षि रंगाअण्णा वैद्य त्कृष्ठ जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार दिला जाणार आहे.रोख रक्कम,मानपत्र,स्मृतीचिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे. नागपूर येथे जुनच्या तिसर्‍या आठवडयात मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.याच कार्यक्रमात वसंतराव काणे उत्कृष्ट तालुका पत्रकार संघांच्या यापुर्वीच जाहीर झालेल्या पुरस्कारांचेही वितरण केले जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकातं देण्यात आली आहे.पत्रकावर परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मा.गो.वैद्य यांचा अल्पपरिचय

माधव गोविंद तथा बाबुराव वैद्य यांचा जन्म 11 मार्च 1923 रोजी वर्धा जिल्हयातील तरोडा येथे झाला.संस्कृत विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी 1946 मध्ये एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.नंतर त्यांनी माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाचे कार्य केले.1966 ते 1983 अशी तब्बल 17 वर्षे ते नागपूर तरूण भारतचे संपादक होते.नंतर  1983 ते 1996 या काळात नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध संचालक आणि अध्यक्ष होते.हिंदुत्व आणि अन्य विषयांवरची त्यांची अनेक  पुस्तकं प्रसिध्द आहेत.स्पष्टोक्ते आणि निर्भिड पत्रकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.संघाचे बौध्दिक प्रमुख आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख या जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या.त्यांचे स्पष्ट आणि सडेतोड  अग्रलेख तसेच मागोवा हे सदर त्या काळात वाचकांसाठी एक आनंद पर्वणी असायची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here