aस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. वयाच्या १६ व्या वर्षी केलेल्या या कामगिरीनंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. मात्र भारतात परतल्यानंतर, मनू भाकेरचा तिच्या गावात सत्कार करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान मनू भाकेर जमिनीवर बसल्याची छायाचित्र चांगलीच व्हायरल झाली होती. यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये सत्कार सोहळ्यात मनूचा अपमान झाल्याच्या अनेक बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र मनूने या सर्व बातम्यांचं खंडन केलं आहे.
याच फोटोवरुन वाद सुरु झाला होता

याणातल्या चरखी दादरी गावात मनूचा सत्कार करण्यात आला. यावेळी हरयाणाचे क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना दीड कोटी रुपयांचं इनामही घोषित केलं. मात्र आपल्या कथित अपमानाबद्दल बोलताना मनूने प्रसारमाध्यमांमधल्या बातम्यांवर चांगलीच नाराजी व्यक्त केली. “त्या सोहळ्यात माझा कोणत्याही प्रकारे अपमान झालेला नव्हता. सोहळ्यादरम्यान माझ्या गावातल्या ज्येष्ठ व्यक्ती आल्या आणि त्यांचा आदर राखण्यासाठी मी उठून उभी राहिले. वयाने आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींसमोर जमिनीवर बसावं लागलं यात मला काहीही वावगं वाटत नाही.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या स्पष्टीकरणात मनूने आपली बाजू मांडली.

सनसनाटी बातम्या तयार करण्यासाठी पत्रकार कोणत्याही थराला का जातात? माझ्यामते कोणत्याही बातम्या मिळाल्या नाहीत की अशा प्रकारच्या बातम्या तयार केल्या जातात. हे प्रकरण थांबायला हवं, अशा शब्दांमध्ये मनूने प्रसारमाध्यमांना फटकारलं. मनू भाकेरचे वडील रामकृष्ण भाकेर यांनीही प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. “अशा प्रकारच्या बातम्यांवर बंदी घालायला पाहिजे. आमच्या गावात वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करण्याची परंपरा आहे, मनूनेही त्या दिवशीच हेच केलं. माझ्या मुलीचा कोणत्याही प्रकारे अपमान झालेला नाहीये. अशा बातम्या देऊन तिने देशासाठी केलेल्या कामगिरीवर विरजण घालू नका.” मनूच्या वडीलांनी आपली संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणातून प्रसारमाध्यमं काही धडा घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here