–एमपीएससी परीक्षा एेनवेळी रद्द केल्यानंतर राज्यातील अनेक शहरात मुलं उत्स्फुर्तपणे रस्त्यावर आली.. सरकारवर दबाव आणला.. अंतिमतः विजय मिळविला.. मुलांचा जोष आणि त्वेष पाहून माझं मन 47 वर्षे मागं गेलं..1974-75.. तेव्हा मी बीडला मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये दहावीला शिकत होतो.. दहावीच्या तीन चार तुकड्या होत्या.. मी दहावी क मध्ये होतो.. तेव्हा समज असा असायचा की, “अ” तुकडीतले मुलं म्हणजे हुशार, एकदम भारी.. “ब” किंवा “क मधील विद्यार्थी तुलनेत ढ, काहीसे उनाड, बंडखोर वगैरे.. हा समज दृढ करणारी दांडगाई, बंडखोरी दहावी क नं एकदा केली.. मल्टीपर्पज मध्ये तेव्हा उत्तम शिक्षक वर्ग असायचा. .. त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा असली तरी अन्य खासगी शाळांच्या तुलनेत आमची शाळा सर्वच बाबतीत आघाडीवर असायची.. ..दहावीचे निकाल, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेमधये मल्टीपर्पज टॉपवर असायची.. गोदाम सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे.. खरं म्हणजे साहेबांची ही भाषा आमच्यापैकी अनेकांना शत्रू नंबर एक वाटायची.. पण गोदाम सर इंग्रजी कविता गळ्यावर गायचे आणि आम्हाला पाठीमागे म्हणायला लावायचे.. कविता मुखपाठ व्हायच्या.. “पाइपिंग डाऊन दी व्हॅलिज वाइल्ड” ही कविता मी आजही नाही विसरलो.. हसत खेळत आम्ही इंग्रजी शिकायचे..इंग्रजी शिकतानाही मजा यायची.. काळी टोपी, कोट घालणारे गोखले सर कडक शिस्तीचे.. गणित शिकवायचे..आमच्या पैकी अनेकांचा गणिताशी उभा दावा.. पण गोखले सर असं गणित शिकवायचे की आम्ही गणिताच्याही प़ेमात पडायचो.. बोदारडे आणि अन्य गुरूंना आम्ही आजही विसरलो नाहीत. सारेच शिक्षक विद्यार्थी प़िय .. पण long stay चं निमित्त करीत शिक्षण विभागानं एक दिवस अचानक नऊ शिक्षकांच्या बदल्या केल्या . .. ही बातमी वारयासारखी शाळेत पसरली.. सर्वांनाच धक्का बसला..आपले आवडते गुरूजी आता नसणार या जाणिवेनं काही मुलं तर रडायलाच लागली..दहावीचं वर्ष.. मध्यातच हा घोटाळा.. काय करावं कळेना.. मी मॉनिटर.. म्हटलं चला हेड सरांना भेटू.. बरीच मुलं तयार झाली .. 25 – 30 जणांनी मुख्याध्यापकांची केबिन गाठली..तेव्हाही जे डबलडोलकी किंवा भित्री मुलं होती.. ती वर्गातच बसून राहिली.. नको लफड्यात पडायला.. ही त्यांची भूमिका.. आम्ही मुख्याध्यापकांच्या खोलीत गेलो.. हेडमास्तर हतबल होते.. त्यांच्या हातातही काही नव्हतं.. ते म्हणाले, “मुलांनो माझ्या हातात काहीच नाही.. शिक्षण विभागाचा हा निर्णय आहे.. शिक्षणाधिकारी साहेबांचा हा आदेश आहे” .. हे साहेब कुठं असतात, कुठे बसतात वगैरे गोष्टी माहिती असण्याचं आमचं ते वय नव्हतं.. त्यांच्याशी कधी संबंध येणयाचंही कारण नव्हतं.. कोणी तरी आम्हाला सांगितलं “साहेब जिल्हा परिषदेत असतात”. .. मी म्हटलं चला आपण जिल्हा परिषदेत जाऊ.. साहेबांनाच साकडं घालू.. उत्स्फूर्त पणे सारेच म्हणाले “चला जाऊ” .. तोपर्यंत सार्‍याच वर्गातील 200च्या जवळपास मुलं हेडमास्तरच्या केबिन समोर जमली होती.. जिल्हा परिषद दूर नव्हतीच.. शाळेच्या समोरचा रस्ता ओलांडला की जिल्हा परिषदेचे गेट होतं.. त्यामुळं रस्ता ओलांडून 200च्या आसपास मुलं जिल्हा परिषदेत घुसली.. उत्स्फूर्त मोर्चाच होता हा..कालच्या एमपीएससीच्या मुलांच्या उत्स्फुर्त आंदोलना सारखा.. ” गुरूजींच्या बदल्या रद्द करा” अशी एकमेव घोषणा आम्ही देत होतो.. “होत कशी नाही, झालीच पाहिजे” किंवा “हम से जो टकराएगा” , किंवा “या सरकारचं करायचं काय” ? अशा घोषणांचा आम्हाला अजून परिचय झालेला नव्हता. .. आमच्या घोषणांनी आम्ही जिल्हा परिषद दणाणून सोडली.. अचानक कोणाचा मोर्चा आला म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी उत्साहाने बाहेर आले.. घोषणा देतच आम्ही साहेबांना गाठलं.. ते म्हणाले, निवेदन द्या.. मग आम्हाला जसं जमेल तसं निवेदन आम्ही लिहून दिलं … त्यावर “मी बघतो” असं साहेबांनी नेहमीचं टिपिकल उत्तर दिलं..आम्ही काय करणार? आमचा मोर्चा माघारी फिरला.. मग ही बातमी पेपरात आली पाहिजे म्हणून आम्ही पाच सहा जण चंपावतीपत्र कार्यालयात गेलो.. हे कार्यालय तेव्हा कबाड गल्लीच्या टोकाला असलेल्या चौकात होतं.. संपादक नामदेवराव क्षीरसागर यांची भेट घेऊन बातमी छापण्याची त्यांना विनंती केली.. . तेव्हा मोबाईल नसल्यानं फोटो वगैरे नव्हतेच.. दुसरया दिवशी चंपावतीपत्रच्या पहिल्या पानावर सिंगल कॉलमात बातमी छापून आली.. शिर्षक होतं “शिक्षकाच्या बदल्या रद्द व्हाव्यात म्हणून विद्यार्थी रस्त्यावर” बातमीत या आंदोलनाचं नेतृत्व करणारे म्हणून ज्याची ज्यांची नावं होती त्यात माझंही नाव होतं.. वृत्तपत्राशी आलेला हा माझा पहिला संबंध.. वर्तमानपत्रात नाव छापून येण्याची देखील ही पहिलीच वेळ.. त्यावेळी हे माहिती असण्याचं कारण नव्हतं की, पुढील आयुष्यात वर्तमानपत्रं हेच आपलं सर्वस्व होईल म्हणून..पहिल्यांदा माझं नाव छापून आलेला तो अंक किती तरी वर्षे मी जपून ठेवला होता..दहावीनंतर शिक्षणाची परवड होत गेल्यानं.. नाव छापून आलेला तो अंक नंतर कुठं गेला कळलंही नाही… तेव्हा आम्ही मामाबरोबर राहायचो..बीडच्या कबाड गल्लीत.. पेपरातली बातमी वाचून मामा वैतागले..” पुढारपण करू नका, अभ्यास करा, दहावीचं वर्षय” असा दम त्यांनी भरला.. कोणत्याही मध्यमवर्गीय पालकांची हीच भूमिका असते.. मामांची काळजी चुकीचीही नव्हती.. पण मुळातच आमचा बंडखोर स्वभाव असल्याने मामाचा हा काळजीयुक्त दम मनावर घेण्याचं कारण नव्हतं.. बातमीची चर्चा गावभर झाली.पण बदल्या काही रद्द होत नव्हत्या.. .मग दोन दिवस आम्ही शाळा बंद पाडली.. ज्यांची बदली झाली होती त्या गुरूजणांसह सर्वांनीच आमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.. पण आम्ही अडूनच बसलो होतो.. अंतिमतःआमचा बालहट्ट शिक्षण विभागाला पुरवावाच लागला.. बदल्या रद्द केल्या गेल्या.. आम्ही टाळ्या वाजवून हा आनंद साजरा केला.. आमच्या लढ्याचा, बंडखोरीचा तो पहिला विजय होता..हा पहिलाच विजय साजरा करताना एक गोष्ट त्या वयातही लक्षात आली होती की, मागणीचा पाठपुरावा केल्याशिवाय पदरात काही पडत नाही.. हे तत्व नंतरच्या सर्व लढयात मी कटाक्षानं पाळलं चिवट पाठपुरावा करून अशक्य वाटणारया पत्रकार संरक्षण कायदयासारखया गोष्टी देखील पदरात पाडून घेतल्या.. तेव्हा आम्ही नुसतेच निवेदन दिलं असतं आणि गप्प राहिलो असतो तर बदल्या रद्द झाल्या नसत्या.. त्यासाठी दोन दिवस शाळा बंद पाडावी लागली होती… पुढील आयुष्यात संघटन, भक्कम एकजूट, लक्ष्य आणि त्याचा चिवट पाठपुरावा.. ही चतु:सूत्री हे आमच्या चळवळीचे सूत्र बनले होते.. .. मुंबई गोवा महामार्गासाठी चा लढा असो किंवा पत्रकारांचे हक्काचे लढे असोत.. अथकपणे दहा दहा, पंधरा-पंधरा वर्षे मागणीचे पाठपुरावे केले.. त्यातून एका पाठोपाठ एक विजय मिळत गेले.. विषय हाती घेतला आणि त्यात यश आलं नाही असं कधी झालं नाही.. .चळवळ या शब्दाचा अर्थ कळण्याचं तेव्हाचं ते वय नव्हतं.. पण गुरूजींची बदली रद्द व्हावी यासाठी आम्ही दिलेला लढा माझ्या मनात चळवळीचं बिजारोपण करणारा ठरला ..हे नक्की.. नंतर ही चळवळ हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली ..माझ्या आवडत्या व्यवसायाला म्हणजे पत्रकारितेला चळवळीची जोड देऊन महाराष्ट्रात पत्रकारांची भक्कम एकजूट तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो.. एखादी घटना माणसाच्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकते याचं ऊदाहरण म्हणून माझ्या या पहिल्या लढयाकडे मी बघतो…. नंतर सार्वजनिक जीवनात आणि व्यक्तीगत जीवनातही संघर्ष आणि लढे माझ्या आयुष्याचे अविभाज्य भाग ठरले… *एस.एम.देशमुख*

33Sunil Walunj, संचार न्यूज सर्व्हिस and 31 others14 CommentsLikeCommentShare

Comments

Most Relevant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here