वृत्तपत्रांचा खप 2.29 कोटी

0
1069
नवी दिल्ली – ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया’च्या (आरएनआय) ताज्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक खप असणाऱ्या ‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले आहे. मराठी भाषिक वृत्तपत्रांमध्ये तर ‘सकाळ’ पुणे अव्वल स्थानीच आहे; तर देशातल्या प्रांतीय भाषिक वृत्तपत्रांत ‘सकाळ’ तिसऱ्या स्थानावर आहे. देशात वृत्तपत्रांची वाढ ५.८ टक्के या वेगाने होत असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘आरएनआय’च्या ‘प्रेस इन इंडिया’ या ताज्या अहवालानुसार, एका आवृत्तीच्या सर्वाधिक खपाच्या भाषिक वृत्तपत्रांच्या (हिंदी, इंग्रजी वगळून उर्वरित) भारतातील ‘टॉप टेन’च्या यादीत स्थान पटकावण्याचा मान मराठी वृत्तपत्रांमध्ये केवळ ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीला मिळाला आहे. या श्रेणीत पश्‍चिम बंगालमधील ‘आनंदबझार पत्रिका’ आणि ‘बर्तमान’ या दैनिकांबरोबरच तीन हिंदी आणि चार इंग्रजी भाषिक दैनिकांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्रात मराठी व अन्य भाषांत मिळून ९०४ नियतकालिकांच्या एकूण २.२९ कोटी प्रती प्रसिद्ध होतात. त्यापैकी पहिल्या ५० नियतकालिकांमध्ये ‘सकाळ’च्या पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिक या ‘लखपती’ आवृत्त्यांचा समावेश आहे. देशातील एकूण दैनिकांपैकी हिंदी वृत्तपत्रांचे दैनिक वितरण ४७.७१ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप ११.४० टक्के आहे. मराठी दैनिके उर्दू व तेलगू भाषांनंतर पाचव्या स्थानी आहेत, असे अहवालातील आकडेवारी सांगते. 
 
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘प्रेस इन इंडिया-२०१४-१५’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. अहवालातील माहितीनुसार, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची सर्वाधिक नोंदणी हिंदी भाषेत (४२ हजार ४९६) झाली असून, दुसरा क्रमांक इंग्रजी भाषेतील (१३ हजार ६६१) प्रकाशनांचा आहे. २०१३-१४ या वर्षात सर्व प्रकाशनांतर्फे मिळून एकूण ४५ कोटी पाच लाख ८६ हजार २१२ प्रतींचे देशभरात वितरण करण्यात आले असून, २०१४-१५मध्ये ही संख्या ५१ कोटी पाच लाख २१ हजार ४४५ प्रती एवढी होती, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
सोशल मीडियाचा वाढता वापर, इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे आव्हान आणि भारतात दाखल  झालेली नव माध्यमे (न्यू मीडिया) यांच्यामुळे मुद्रित माध्यमांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचा दावा तज्ज्ञ करत असले तरी, भारतातील वास्तव मात्र त्यापासून दूर जाणारे आहे. २०१४-१५ या सरत्या वर्षात मुद्रित माध्यमांमध्ये ५.८ टक्के वाढ झाल्याची माहिती सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. चालू वर्षी ५ हजार ८१७ नव्या प्रकाशनांची नोंदणी झाली असून, देशातील एकूण मुद्रित प्रकाशनांची संख्या आता एक लाख पाच हजार ४४३ वर पोचली आहे. ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स इन इंडिया’ या केंद्र सरकारच्या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.  खपाचा विचार केल्यास हिंदी भाषेतील प्रकाशनांच्या २५ कोटी ७७ लाख ६१ हजार ९८५ प्रती दर दिवशी वितरीत केल्या जातात.  त्या पाठोपाठ इंग्रजी भाषेतील प्रकाशनाच्या सहा कोटी २६ लाख ६२ हजार ६७० प्रती, तर ऊर्दू भाषेतील प्रकाशनाच्या चार कोटी १२ लाख ७३ हजार ९४९ प्रती दर दिवशी वितरीत केल्या जातात.  २०१४-१५ या वर्षात ३४ प्रकाशने बंद झाल्याचे अहवाल सांगतो.
 
प्रकाशनांच्या संख्येत महाराष्ट्र दुसरा
उत्तर प्रदेशात १६ हजार १३० प्रकाशनांची नोंदणी करण्यात आली असून, महाराष्ट्रात १४ हजार ३९४ प्रकाशनांची नोंदणी करण्यात आली असल्याचे अहवालात म्हटले आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून, तेथे १२ हजार १७७ प्रकाशनांची नोंदणी झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here