वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आंदोलनास परिषदेचा पाठिंबा

मिडियाशी संबंधित कोणत्याही घटकांचे प्रश्‍न सोडवायचेच नाहीत असेच सरकारचे धोरण दिसते.पत्रकारांचे पेन्शन,कायदा,मजिठियाची अंमलबजावणी,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न सडत पडू दिले जात असतानाच आता वृत्तपत्र विक्रत्याच्या प्रश्‍नांकडंही सरकार निर्दयपणे दुर्लक्ष करीत आहे.प्रिन्ट मिडियाचा कारभार सर्वस्वी वृत्तपत्र विक्रेत्यांवर अवलंबून आहे.उन्हाळा,पावसाळा,हिवाळा अशी तीनही ऋुतुत अगदी तुटपुंज्या कमिशनवर वृत्तपत्र विक्रेते ताजी वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करीत असतात.मात्र अत्यंत महत्वाचा हा घटक कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेला आहे.सरकारनं कधी या घटकांच्या व्यथा समजून घेतल्या नाहीत,मालकांना त्याची गरजच वाटली नाही आणि समाजानं त्यांची कदर केली नाही.वृत्तपत्र विक्रेता कसा जगतो याची पर्वा कोणालाच नसल्यानं विविध समस्यांशी झगटत वृत्तपत्र विक्रेते जीवन जगत आहेत.त्यांचे बुनियादी प्रश्‍न आहेत,जीवनमरणाचे प्रश्‍न आहेत,ते सोडवावेत यासाठी अनेकदा थोरा-मोठ्यांच्या भेटी घेतल्या गेल्या..आश्‍वासनंही मिळाली ..प्रत्यक्षात हाती काहीच लागलं नाही.त्यामुळं संतापलेला हा घटक आता थेट रस्त्यावर उतरायला सज्ज झाला आहे.येत्या 25 सप्टेंबर रोजी राज्यातील वृत्तपत्र विक्रेते आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.मराठी पत्रकार परिषद वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या आंदोलनात सहभागी होऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत आहे.प्रत्येक जिल्हयातील पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांबरोबर धरणे आंदोलनात सहभागी होतील असा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.
काय मागण्या आहेत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ?.वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापन करावी असी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.ती दुर्लक्षित आहे.वृत्तपत्र विक्रेते तसेच हॉकर्स यांना प्रत्येक बस स्टॅन्डवर पेपर विक्रीसाठी स्टॉल लावण्यासाठी जागा मिळावी,विक्रेत्यांना विमा कवच मिळावे,वृत्तपत्र विक्रेत्यांना पेन्शन योजना सुरू करावी असा मागण्या आहेत.गेली अनेक वर्षे या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी ही मंडळी लढा देत आहे.पण कोणीच लक्ष देत नसल्यानं 25 सप्टेंबर रोजी राज्यभर धऱणे आंदोलन करण्यात येणार आहेत.त्यानंतरही जर सरकार जागे झाले नाही तर संपाचे हत्यार उपसण्याची तयारीही आता वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे.तसा इशाराच संघटनेचे नेते बालाजी पवार यांनी दिलाय.विक्रेते म्हणतात आाता आम्हाला आश्‍वासन नकोय तर ठोस निर्णय आणि त्याचीं तातडीनं अंमलबजावणी हवी आहे..वृत्तपत्र विक्रेत्यांचे मजबूत संघटन,त्यांची संघटनेवरील निष्ठा यामुळं त्यांनी नाक दाबलं तर मालकांचं आणि सरकारचंही तोंड उघडायला वेळ लागणार नाही हे नक्की.

सरकारनं वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here