*मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम महाराष्ट्रासाठी आदर्शवत!*
*खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन*
*पत्रकार परिषदेचा ‘गाव दत्तक’योजनेचा शुभारंभ…*
*आमदार उदय सामंत यांनी जाहीर केला ५ लाखाचा निधी..*
रत्नागिरी,दि.६– रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून  वांद्री गाव वर्षभरासाठी दत्तक घेण्यात येत असल्याची बाब कळल्यानंतर सर्व प्रथम मला खूप आश्चर्य व कुतुहल वाटले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी आदर्शवत असल्याचे उद्गार खासदार विनायक राऊत यांनी काढले.
रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे त्याची सुरूवात ग्रामीण भागापासून केली पाहिजे, लोकप्रतिनिधींच्या सहकार्यांने व विविध योजनेच्या माध्यमातून एखाद्या गावाचा कायापालट करण्यासाठी ‘एक गाव दत्तक’ हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. या उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम संगमेश्वर तालुक्यातील वांद्री या गावी रविवारी संपन्न झाला. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, लांजा नगराध्यक्ष सुनील कुरूप, वांद्री सरपंच अनिशा नागवेकर, सेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, सेना उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, संपादक राजाराम खानोलकर, श्रीकृष्ण देवरूखकर, सुनील चव्हाण, आनंद तापेकर, ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे, भालचंद्र नाचणकर, परिषदेचे जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, तालुकाध्यक्ष राजेश शेळके, प्रणव पोळेकर, जमीर खलफे, अजय बाष्टे, मुश्ताक खान, जान्हवी पाटील, रिध्दी बामणे, सुदीप जाधव, समीर शिगवण, संदेश पवार, तन्मय दाते आदी मान्यवर तसेच सदस्य उपस्थित होते.
आमदार उदय सामंत यांनी मला पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. या उपक्रमाचे कुतुहल होते म्हणून आपण कोणताही विचार न करता याठिकाणी कार्यक्रमाला आलो. या उपक्रमाची संकल्पना अतिशय चांगली असून लोकप्रतिनिधींसाठी दखलपात्र असल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.  या उपक्रमात आपणही हातभार लावणार असून वांद्री गावातील महिला सक्षमीकरणासाठी जो काही आवश्यक निधी आहे तो आपण देणार असल्याचेही राऊत यांनी यावेळी जाहीर केले.
शासनाकडून गाव दत्तक योजना घेतली जाते हे आपल्याला ज्ञात आहे मात्र लोकशाहीच्या एका घटकाकडून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेण्यात येतो त्यासाठी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याचे उद्गार आमदार उदय सामंत यांनी काढले तसेच यावेळी या उपक्रमासाठी 5 लाखाचा निधी दोन विकास कामांकरिता जाहीर केला आहे. यातील अडीच लाख निधी येत्या दोन दिवसात देण्यात येणार असून उर्वरीत निधी दुसऱया कामाला त्वरीत देण्यात येईल असेही यावेळी सामंत यांनी सांगितले. तसेच वांद्री गावात लवकरच भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून यावेळी सर्व आजारांची तपासणी व उपचार केले जाईल असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा सातत्याने पाठपुरावा करून हा गाव इतर गावांसाठी आदर्शवत कसा ठरेल यासाठी परिषदेने प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.
मुळात पत्रकार हे समाजसेवेचे व्रत घेवून समाजात आलेला असतो. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी एकत्र येवून राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून त्रिवेणी संगमातून गावाचा विकास होईल असे प्रतिपादन किरण नाईक यांनी केले.
लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि ग्रामपंचायत वांद्री यांच्या समन्वयातून सहकार्यातून पहिल्यांदाच आगळा उपक्रम संपन्न होत आहे, त्यामुळे आता वांद्री गावातील लोकांचीही जबाबदारी वाढली असून एका वर्षात संपूर्ण कायापालट करण्यासाठी वांद्री ग्रामस्थांकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी माहिती यावेळी सरपंच अनिशा नागवेकर यांनी दिली.  या कार्यक्रमाच्या सुरूवातील आमदार उदय सामंत यांच्या ग्रामपंचायत सचिवालयचे भूमिपूजन पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱयांसमवेत करण्यात आले. त्यानंतर वांद्री गावात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सरस्वती देवी, छ.शिवाजी महाराज व “दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ‘गाव दत्तक’ चा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन विलास कानर, सुशील जाधव यांनी केले.
*‘वांद्री’ गाव दत्तक घेणारे मराठी पत्रकार परिषद हे महाराष्ट्रातील पहिले असून यासाठी वांद्री ग्रामपंचायतीकडून उपस्थित सर्व रत्नागिरी तालुका परिषदेच्या उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्यांचा याठिकाणी जाहीर करण्यात आला*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here