जिद्द अशी की,परिस्थितीलाही नमवलं..!

0
1154

मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या विधवा भगिनींची कथा..

त्महत्त्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाचं त्याच्यानंतर काय होतं याकडं कोणी विशेष लक्ष देताना दिसत नाही.शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर चार-दोन दिवस तर सरकारपासून सार्‍यांची सहानुभूती मिळते.भेटी-गोठी,फोटो काढणे आदि सोपस्कारही होताना दिसतात.मात्र जस जसा वेळ जातो तस तसे हे कुटुंब एकटे आणि एकाकी पडत जाते.अनेक प्रकरणात मुलगा गेल्यानंतर सासू-सासर्‍यानं संबंधित विधवेला घराच्या बाहेर काढल्याची उदाहरणं आहेत .काही भगिनी आपल्या माहेरी निघून गेल्याचे दिसते तर काही भगिनी हाल-अपेष्टा आणि उपेक्षा सहन करीत जगत राहतात.परंतू आजच्या टाइम्स ऑफ इंडियानं दिलेली बातमी नक्कीच दिलासा देणारी म्हणावी लागेल.ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्या आहेत त्यांच्या विधवा आता जिद्दीनं,आत्मविश्‍वासानं,नव्यानं उभ्या राहात असल्याची ही स्टोरी आहे.राधेश्याम जाधव यांनी दिलेल्या या बातमीत उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील काही माता-भगिनी पतीच्या निधनानंतर मोठ्या धैर्यानं परत उभ्या तर राहिल्याचं सांगितलं आहे .   ज्या कर्जासाठी आपल्या पतीवर आत्महत्त्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली ते कर्जही त्यांनी फेडल्याचं समोर आलंय.एवढंच नव्हे तर अत्यंत जिद्दीनं या विधवा महिलांनी आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण देऊन समाजात स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलेलं आहे.टाइम्सच्या बातमीत विद्या मोरे या भगिनीनं सारे  गमविल्यानंतरही फिनिक्ससारखं कसं नव्याने सारं उभं केलंय याची कथा सांगितली आहे.30,000च्या कर्जापायी विद्याच्या पतीनं स्वतःला जाळून घेऊन आत्महत्त्या केली.त्यानंतर विद्यावर आकाश कोसळले.मात्र नंतर या भगिनीने परिस्थितीशी चार हात करीत,कठोर मेहनत करीत नवं विश्‍व उभं केलं आहे.शेती करून या भगिनीनं कर्ज तर फेडलंच पण आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं.विद्याच्या एका मुलाला लष्करात जाऊन देशाची सेवा करायची तर मुलीला पोलीस अधिकारी व्हायचंय.ही दोन्ही मुलं आपल्या क्लासमध्ये टॉपवर असतात.बोतमीत तिनं परिस्थितीशी कसे दोन हात केले,केवळ कोरडी सहानुभूती दाखविणारा समाज खरंच मदतीची गरज असते तेव्हा कसे नाकंमुरडतो,हे सारं तिनं विस्तारानं सांगितलं आहे.इतरही काही महिलांची उदाहरणं या बातमीत आहेत. हा सारा मानसिक बदल नक्कीच सुखावह म्हणावा लागेल.महिला मुळातच खंबीर ,कणखर असतात,कोणत्याही कठीण प्रसंगांना तोंड देण्याची हिंमत त्याच्यात पुरूषांपेक्षा जास्त असते.त्यामुळंच मराठवाड्यात महिला शेतकर्‍याने आत्महत्त्या केल्याचं चित्र दिसत नाही.पती गेल्याचं आभाळा एवढं दुःख,आणि मुलांचं भविष्य आणि भवितव्य या चक्रात अनेक महिला परिस्थितीला शरण जातात असं चित्र आजपर्यंत होतं मात्र टाइम्सच्या बातमीनं ही परिस्थिती बदल आहे,सर्वस्व गमविलेल्या भगिनी पुन्हा नव्या उमेदीनं,जिद्दीनं उभ्या राहात आहेत हे वास्तव जगासमोर आलं.हे नक्कीच स्वागतार्ह आहे.समाजानं या महिलांचं जीवन अधिक सुखकर होण्यासाठी मदत करण्याची गरज आहे.ग्रामपंचायतीनं अशा महिलांसाठी काही योजना आखल्या,त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच एक वेगळी चळवळ उभी राहू शकेल.आत्महत्त्या केलेल्या कुटुंबाच्या मुलांसाठी नव्या  पिढीच्या भविष्यासाठी तरी हे सारं कऱणं आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here