साखळी वृत्तपत्रांच्या तुफानी आक्रमणातही महाराष्ट्रातील  जिल्हा पातळीवरची जी मोजकी  दैनिकं स्वतंःचं अस्तित्व टिकवू शकली ,किंबहुना भांडवलदारी वृत्तपत्रांच्या नाकावर टिच्चून उभी राहिली त्यात बीडच्या झुंजार नेताचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.साधनांची कमतरता,मनुष्य बळाची चणचण,जुनाट झालेली यंत्रणा,भांडवलाचा अभाव असा सारा नन्नाचा पाढा असताना अंक काढणं आणि ते चालविणं मोठं दिव्यच होतं.त्यातही बीड सारख्या कायम मागास आणि दुष्काळी जिल्हयातील स्थिती आणखीनच कठीण .जिल्हयात मोठे उद्योग.व्यवसाय नसल्यानं जाहिराती जेमतेम मिळायच्या.मिळणार्‍या जाहिरातीतून मग दैनिकाचा खर्च भागविणं कठीण व्हायचं.तरीही मोतीरामजी वरपे यांनी अशा अनेक अडचणीवर मात करून झुंजार नेता चालविला आणि वाढविला देखील.एवढंच नव्हे तर ‘वृत्तपत्र म्हणजेच झुंजार नेता‘ अशी ओळखही निर्माण करून दिली.झुंजार नेताकडं आज बीड जिल्हयाचं मुखपत्र म्हणूनच पाहिलं जातं.हे सारं सहज साध्य झालेलं नाही.त्यासाठी स्व.मोतीरामजी वरपे यांनी प्रचंड कष्ट उपसले .याची मला आणि जिल्हयातील बुजूर्ग पत्रकारांना नक्कीच माहिती आहे. तो काळ असा होता की,वसा किंवा व्रत समजूनच पत्रकारिता केली जायची. पेपर सुरू करू, त्यातून पैसा मिळवू,किंवा आपल्या अन्य उद्यागोना संरक्षण म्हणून  त्याचा हत्यारासारखा वापर करू किंवा दैनिकाच्या माध्यमातून राजकीय लाभ पदरात पाडून घेऊ असा विचार तेव्हा कोणी करायचं नाही.जनतेची सुख-दुःख वेशिवर टांगणं,व्यवस्थेवर अंकुश ठेवणं ,आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊनच वृत्तपत्रं सुरू केली  जायची मला वाटतं मोतीराम वरपे यांनीही झुंजार नेता याच जाणिवेतून सुरू केला .वरपेंकडं पत्रकारितेचा कोणताही वारसा नव्हता,वृत्रपत्र काढण्याएवढं भांडवलही नव्हतं.आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांनी झुंजार नेता सुरू कऱण्याचं धाडस केलं ते त्यांच्या पत्रकारितेवरील निष्ठेपोटीच . आरंभीच्या काळात असे अनेक प्रसंग आले की,झुंजार नेता बंद पडतो की,काय अशी शक्यता निर्माण झाली.  तथापि येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करीत वरपे यांनी झुंजार नेताला पोटच्या पोरासारखं जपलं,त्याचं पालनपोषण केलं आणि  तेवढ्याच संवेदनशीलपणे त्याला स्वतःच्या पायावर उभे देखील केलं .हे करतानाच त्यांनी बीडमध्ये पत्रकारांचीे नवी पिढी घडविण्याचे मोठं काम केलं .बीडमध्ये नंतरच्या काळात ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीनं अनेकांना कापरं भरवलं असे जिल्हयातील अनेक मान्यवर पत्रकारही झुंजार नेताच्या मुशित तयार झाले आहेत.जिल्हयातील साहित्यिकांना बळ देण्याचं,त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कामही झुजार नेतानं केलं आहे. जिल्हयातील सास्कृतिक चळवळीनाही झुजार  नेताची मदत व्हायची.एवढंच नव्हे तर त्याकाळात जिल्हयात जनहिताच्या ज्या चळवळी चालायच्या किंवा जी लोकआंदोलनं व्हायची त्यांचा आधारही झुंजार नेताच असायचा.रोखठोख,स्पष्ट आणि निःपक्ष भूमिका हे झुंजार नेताचं वैशिष्टय होतं.  बाणा लढाऊ आणि कोणाचीही भिडमुर्वत न ठेवणारा असल्यानं सामांन्य माणसालाही झुंजार नेता आपला आधार वाटायचा.त्यातूनच दहशत नव्हे तर झुंजार नेताचा एक आदरयुक्त दरारा सर्वत्र दिसायचा..तो  टिकवून ठेवण्याचं काम आज संपादक अजित  वरपे आणि त्यांच्या  कुटुंबियांनी केलं आहे हे विशेष.त्यासाठी त्यांनी कालानुरूप झुंजार नेतात बदल केले.रंगीत मशिन आली. छपाई चार रंगात सुरू झाली.पानंही वाढली,पुरवण्या प्रसिध्द होऊ लागल्या. कार्यालय सुसज्ज इमारतीत गेलं,मॅनेजमेंटही आधुनिक पध्दतीनं सुरू झालं.त्यामुळं बाहेरून येणाऱ्या वृत्तपत्रांचा मारा होत असतानाही झुंजार नेता आपलं स्थान केवळ टिकवूनच आहे असं नव्हे तर झुंजार नेतानं आपला नावलौकिक जिल्हा आणि शेजारच्या जिल्हयातही वाढविला आहे.हे यश लोकप्रियतेच्या पातळीवर जसं आहे तव्दतच ते व्यावसायिकतेच्या आघाडीवरचंही आहे.

भांडवलदारी वृत्तपत्रे आल्यानंतर जिल्हा स्तरावरील दैनिकाचं काय होणार ? असा प्रश्न विचारला जायचा.ज्या दैनिकानी  स्वतःमध्ये कालानुरूप बदल घडवून आणले ती दैनिकं स्पर्धेतही आपलं अस्तित्व कायम ठेऊन राहिली.झुंजार नेता हे त्याचं मुर्तीमंत उदाहरण आहे.ज्यांना बदल घडवून आणता आला नाही ती भांडवलदारी व्यवस्थेचा बळी ठरली. अशा बंद पडलेल्या दैनिकांची संख्याही लक्षणीय आहे. अनेक अडथळ्यांवर मात करीत झुजार नेता आज आपल्या वयाची 51 वर्षे पूर्ण करून 52 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.पन्नास वर्षाचा कालखंड हा तसा कमी नाही.पन्नास वर्षातलं बीड जिल्हयातलं राजकारण,समाजकारण,चळवळींंचा झुंजार नेता साक्षीदार आहे.आज बीड जिल्हयात मोठा दुष्काळ आहे.1972 चा दुष्काळही झुंजार नेतानं पाहिला आणि आपल्या परीनं तेव्हा दुष्काळग्रस्तांची दुःख वेशिवर टांगण्याचं देखील काम केलं.आजही त्याच तडफेनं आणि आपलेपणानं झुंजार नेता लोकांचे प्रश्‍न मांडताना दिसतो आहे.झुंजार नेताच्या 51 व्या वर्धापन दिनास माझ्या आणि मराठी पत्रकार परिषदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

झुंजार नेताशी माझं व्यक्तीगत जिव्हाळ्याचं नातं आहे.माझ्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ झुंजार नेतामध्ये रोवली गेली .’सामजिक बांधिलकी’ ‘ या शब्दाची ओळख मला इथंच झाली..अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं बाळकडू देखील इथंच मिळालं.पुढील आयुष्यात अन्यायाच्या विरोधात मी कधी तडजोड केली नाही आणि  भोगाव्या लागणाऱ्या  परिणामांचीही तमा बाळगली नाही..या स्वभावाचा मला आणि माझ्यामुळं कुटुंबाला अनेकदा कमालीचा त्रास झाला ..पण माघार घेतली नाही.मला वाटतं बीडच्या पत्रकारितेचा हा गुणधर्म असावा.माजलगावला कॉलेजमध्ये असताना झुंजार नेताला बातम्या पाठवायचो.तेव्हा बीडमध्ये चंपावतीपत्र आणि झुंजार नेता अशी दोनच प्रमुख दैनिकं होती.त्यामुळं झुंजार नेतात आलेल्या बातमीची चर्चा व्हायची आणि त्याची दखलही घेतली जायची.झुंजार नेतात राजकीय लेखनही तेव्हा भरपूर केलं.त्यातून पत्रकारितेची गोडी वाढत गेली..बी.कॉम करीत असतानाही आपण पत्रकारच व्हायचं असा निर्धारही झुंजार नेतातील लेखनास मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून  केलं.पुढं औरंगाबादला जाऊन बीजे वगैरे केले.नंतरच्या काळात  महाराष्ट्राच्या विविध भागात  मोठ्या दैनिक ात वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करण्याची संधी मिळाली.संपादक म्हणून तब्बल 23 वर्षे काम केलं.त्याचं श्रेय  बीडच्या ‘झुंजार’ पत्रकारितेला  द्यावं लागेल..त्यामुळंच माझी जडणघडण जेथून झाली ते दैनिक आता अधिक विस्तारत आहे हे पाहून नक्कीच आनंद आहे.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here