निवडणुका जवळ आल्यात.आता पत्रकारांना खर्‍या अर्थानं अच्छे दिन येऊ घातले आहेत असं दिसतंय.मागील वर्षीच्या् तुलनेत 2018 मध्ये पत्रकारांवरील हल्लयांच्या घटना घटल्या आहेत.आता तर भाजपनं आपल्या खासदार,आमदारांना फर्मान काढलंय की,बाबानों,पत्रकारांशी दोस्ताना करा ..
2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीपुर्वी काय करावं आणि काय करू नये याची 65 पानी नियमावली भाजपनं तयार केलीय.भाजपमध्ये तयार झालेल्या वाचाळवीरांना या नियमावलीत संयम ठेवायला सांगण्याबरोबरच माध्यमांमुळं या वाचाळवीरांच्या बातम्या देशभर पसरत असल्यानं पत्रकारांशी मैत्री करा अशी ताकीद दिली गेली आहे.नकारात्मक बातम्यांमुळं पक्षाची देशभर बदनामी होत असल्यानं पक्षानं हे पाऊल उचललं आहे.सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह व्हा..असा सल्लाही या लोकप्रतिनिधींना दिला गेलाय.एवढंच नव्हे तर आता लोकप्रतिनिधींच्या खासगी सचिवांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.कार्यालयात येणार्‍या लोकांशी त्यांनी कसे बोलावे,पत्रकारांशी सौजन्यानं वागावं,त्यांना फार काळ ताटकळत ठेऊ नये अशा सूचना त्यांना देण्यात येणार आहेत.कर्मचार्‍यांनी पत्रकारांना माहिती देण्याचं काम करू नये त्याऐवजी त्यांनी पत्रकार आणि लोकप्रतिनिधी मधील दुवा बनावे असा उपदेशही त्यांना करण्यात आला आहे.या सूचना मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी लागू आहेत की,नाही माहिती नाही पण त्यांना या सूचनांची सक्त गरज आहे.कारण हे कार्यालय केवळ ठराविक पत्रकारांनाच मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचू देते बहुतेक पत्रकारांना मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचार्‍यांचा येणारा अनुभव फारसा सुखद नाही.गेली चार वर्षे विविध कारणांनी सरकारवर नाराज असलेल्या पत्रकारांवर या सौजन्यानं किती आणि काय फरक पडेल माहिती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here