प्रसारमाध्यमांमध्ये समाजाचेच प्रतिबिंब!

    0
    875

    मुंबई: प्रेक्षकांना आवडते म्हणून मीडियाला बातम्यांतून चटपटीतपणा आणावा लागत असला तरी त्याची सवय लागणेही चुकीचे आहे. वाचकांची किंवा प्रेक्षकांची गरज पूर्ण करताना एखाद्या गोष्टीला विकृत स्वरुप देण्याचीही गरज नाही. महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक वाढवण्यासाठी मीडियातून हिंसक गोष्टींना उत्तेजन देता कामा नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजात जे घडते त्याचे प्रतिबिंब प्रसारमाध्यमातून उमटत असते. परिणामी प्रसारमाध्यमे हिंसक होत आहेत? असे म्हणणे चुकीचे ठरेल, असा सूर १६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात उमटला.
    दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात परिषदेंतर्गत ‘दिवसेंदिवस प्रसारमाध्यमे हिंसक होत आहेत काय? या विषयावर आयोजित परिसंवादात पत्रकारिता क्षेत्रातील प्रा. जयदेव डोळे, राजीव खांडेकर, जतीन देसाई, उदय तानपाठक आणि शशीकांत सावंत ही मंडळी सहभागी झाली होती. त्यांनी या विषयावर मते मांडतांना मीडियाइतकेच समाजावरही रोष प्रकट केला.
    प्रा. जयदेव डोळे म्हणाले की, आजघडीला तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे पत्रकार एक ठराविक माणूस राहिलेला नाही. सध्याच्या तंत्रज्ञानामुळे घडलेली घटना तत्काळ कळविता येते. मात्र सोशल मीडियाने हिंसकता वाढवली आहे. त्यामुळे हिंसाचार वेगाने पसरत आहे. सोशल मीडियामुळे देशभरात अफवांना उधाण येत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापित मीडिया आक्रमक झाला आहे, असे जनमत असले तरी मीडियाचा अंकुश हा राजकारणी आणि सत्ताधार्‍यांवर पाहिजे. शिवाय आजच्या वातावरणात जशास तसे उत्तर देण्याची प्रवृत्ती मीडियातून वाढत आहे. प्रेक्षकांना आवडते म्हणून चटपटीतपणा आणावा लागत असला, तरी त्याची सवय लागणेही चुकीचे आहे. म्हणजेच वाचकांची किंवा प्रेक्षकांची गरज पूर्ण करताना तिला विकृत स्वरुप देता कामा नये. प्रेक्षक वाढवण्यासाठी हिंसक गोष्टी करता कामा नयेत.
    राजीव खांडेकर म्हणाले की, समाजात जे घडते त्याचे प्रतिबिंब प्रसारमाध्यमातून उमटते. सद्यस्थितीमध्ये लोकांवर वाहिन्यांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे बटबटीतपणाचा अतिरेक होऊ नये, म्हणून मराठी वृत्तवाहिन्या स्वत:वर बंधने घालून काम करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक सलोखा कायम राखण्याची जबाबदारी केवळ वृत्त वाहिन्यांचीच नाही. राजकर्त्यांचीपण आहे. मीडियामध्ये चटपटीतपणा येवू घातला आहे, अशी टीका होत असली तरी चटपटीतपणा हा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याचेच प्रतिबिंब मीडियातून उमटत आहे. (प्रतिनिधी) साहित्य संमेलनासाठी साहित्यप्रेमींची गर्दी.

     


     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here