‘पुणे पॅटर्न’ आता महाराष्ट्रातही..

0
1194

ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया शंभर टक्के यशस्वी
पुणे जिल्हा पत्रकार संघानं रचला नवा इतिहास

पुणे  जिल्हा पत्रकार संघानं आज नवा इतिहास निर्माण केलाय.एखादया पत्रकार संघटनेनं ऑनलाईन निवडणुका घेणारा पुणे जिल्हा हा देशातील पहिला आणि एकमेव जिल्हा ठरला. ऑनलाईन निवडणुकांचा प्रयत्न यापुर्वी देशातील एकाही पत्रकार संघटनेनं केलेला नाही.पुणे जिल्हा आणि हा पत्रकार संघ ज्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग आहे त्या परिषदेच्या  निवडणुका पुर्वी बॅलेट पेपरव्दारे होत.ती प्रक्रिया अत्यंत खर्चीक,वेळ खाऊ होती.शिवाय अनेकजण या पध्दतीवर शंका घेत.हे सारं टाळण्यासाठी परिषदेने पुढाकार घेऊन एक सॉफ्टवेअर विकसित केलं.त्याच्या माध्यमातून पहिला प्रयत्न शिरूरला झाला.शिरूर तालुका पत्रकार संघाच्या निवडणुका यशस्वी झाल्यानंतर आज पुणे जिल्हयाच्या निवडणुका अत्यंत यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत.पहिलाच प्रयत्न होता.त्यामुळं काही तांत्रिक अडचणी येणं अपेक्षित होतं.तशा अडचणी आल्या.लिंक आणि पासवर्डचे एसएमएस मिळाले नसल्याच्या अनेक तक्रारी दुपारपर्यंत निवडणूक यंत्रणेकडे आल्या.काहींनी लिंक ओपन होत नाहीत अशा तक्रारी केल्या.हा सर्व्हरचा प्रश्‍न होता.आपल्या सगळ्यांकल्पना आहे,एवढी मोठी सरकारी यंत्रणा असताना शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना सर्व्हरचा किती प्रश्‍न आला होता ते ?.अनेक शेतकर्‍यानी रात्री दोन-चार वाजता आपले अर्ज दाखल केले.तसा प्रश्‍न आरंभीच्या काळात येथेही आलाच.कारण ज्यांना लिंक मिळाली होती असे अनेक पत्रकार एकाच वेळी मतदानाचा प्रयत्न करीत असल्यानं सर्व्हरवर लोड आला आणि लिंक ओपन व्हायला अडचणी आल्या.मात्र जस जसे मतदान होत गेले तस तशी लिंक लगेच ओपन होत गेली.मात्र सातत्यानं तक्रारी येत गेल्यानं मतदानाचा वेळ अगोदर तीनचा पाच केला गेला,नंतर तो सहा केला गेला आणि अंतिमतः साडसहाला मतदान प्रक्रिया बंद करावी लागली.सात वाजता निकाल जाहीर झाला.लिंक ओपन होत नाहीत,एसएमएस लवकर मिळत नाहीत असे पाहून काही सदस्य पॅनिक झाले आणि निवडणूक व्यवस्थेबद्दलच संशय घेऊ लागले.मात्र नंतर  मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.आज ज्या अडचणी जाणवल्या त्या पुढील वळेस नक्कीच दुरूस्त केल्या जातील. काही सदस्यांना एसएमएस मिळाले,लिंकही ओपन झाली पण मतदान करता आले नाही.अशी तक्रारही केली.अर्थात त्याला निवडणूक यंत्रणेचा इलाज नाही.मतदान कसं करायचं याच्या क्लिप सातत्यानं व्हायरल केल्या जात होत्या,प्रक्रियाही विस्तारानं सांगितली जात होती,तरीही मतदान करता आले नसेल तर तो दोष व्यवस्थेचा असू शकत नाही.एसएमएस सदस्यांना पोहोचले की नाही,त्यानं लिंक ओपन केली की नाही हे निवडणूक यंत्रणेला समजू शकत होते.त्यामुळं आम्हाला एसएमएसच मिळाला नाही असा खोटा दावा कोणी करू शकत नव्हते. काही तांत्रिक अडचणी जरूर आल्या पण त्यानं एकूण निकालात कोणताही फरक पडला नाही.अत्यंत पारदर्शक पध्दतीनं या निवडणुका पार पडल्या.त्याबद्दल निवडणूक अधिकारी बाळासाहेब ढसाळ त्यांना सहाय्य कऱणारे सुनील वाळूंज  ज्यानी  हे सॉफ्टवेअर तयार केले ते सर्व सहकारी आणि या सार्‍या व्यवस्थेचं नियोजन करणारे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल याना मनापासून धन्यवाद .या सर्वांनी ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.पुढील काळात हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केला जाणारआहे.

एक काळ असा होता की,पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकाच होत नसतं.दहा-पाच पुढारी एकत्र यायचे आणि तेच कोण अध्यक्ष.कोण उपाध्यक्ष ठरवून तशी घोषणा करायचे.ज्याला लादणे म्हणतात तो प्रकार होता.मागच्या वेळेस ही पध्दत बंद करून बॅलेट पेपरव्दारे मतदान घेण्याचा निर्णय झाला.जे पराभूत झाले त्यानी त्या व्यवस्थेबद्दल संशय व्यक्त केला.शिवाय ती प्रक्रिया खर्चीक आणि वेळखाऊ असल्यानं त्यात बदल करणं आवश्यक होतं.प्रक्रिया अधिक सुलभ आणि काळानुरूप होणं गरजेचं होतं.ऑनलाईन प्रक्रिया हा एकमेव पर्याय होता तो अवलंबिला.तो यशस्वीही झाला.नेहमीच असं घडतं की,जे पराभूत होतात ते निवडणूक यंत्रणेवर आक्षेप घेतात.भाजपं एव्हीएम यंत्रामुळे विजयी होतो असा आरोप सर्रास केला जातो.यात तथ्य नाही.कालच्या निवडणुकीनंतरही असे आक्षेप घेतले जावू शकतात.हा मानवी स्वभाव आहे.मात्र उपलब्ध पर्यायांपैकी ऑनलाईन पर्याय हा सर्वोत्तम पर्याय आहे.पुढील काळातही याच पध्दतीनं निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकशाहीची बूज राखतो हा संदेश अशा निवडणूक प्रकियेतून गेलेला आहे.ऑनलाईन प्रक्रियेचं कौतूक महाराष्ट्रभर सुरू आहे.एक नवा पॅटर्न आपण तयार केला आहे.परिषद काळाबरोबर राहते आहे हा संदेशही यातून गेलेला आहे.हा पर्याय यशस्वी केल्याबद्दल पुणे जिल्हयातील पत्रकारांना मनापासून धन्यवाद.
निवडणुकीत कार्याध्यक्षपदी सुनील लोणकर,उपाध्यक्षपदी एम.जी.शेलार आणि कोषाध्यक्षपदी गणेश सातव विजयी झाले आहेत.या सर्व मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here