पराभूतांनो,आता तरी बदला !

0
1109

निवडणुकांचा हंगाम संपला.आता पराभूतांसाठी चिंतनाचा मोसम सुरू होत आहे. चार महिन्यात आणखी एका अग्निपरीक्षेला सामोरं जायचं ना,त्यासाठी राजकीय पक्षांना चिंतन वगैरे आवश्यक वाटतंय. किमान आम्ही चुकांचा शोध घेतोय आणि त्यापासून काही बोध घेण्याची आमची तयारी आहे हे तरी लाोकांना दाखविलं पाहिजे ना..महाराष्ट्रात मनसे,राष्ट्रवादीनं अशा चिंतन बैठका वगैरे घ्यायचं ठरवलंय.चांगली गोष्ट आहे.पण या चिंतन बैठकातून आपण कुठं कमी पडलो,कुणी फसवलं वगैरे गोष्टींवरच खल करण्यापेक्षा पक्ष नेतृत्वाच्या स्वभाव दोषांवरही  चिंतन क रण्याची गरज आहे.कारण पराभवाचं खरं रहस्य तेथेच सापडणार आहे.पराभवाची जी अनेक कारणं सांगितली जातात त्यात सर्वात महत्वाच्या कारणाकडं राजकीय पंडितांचं दुर्लक्ष झालंय हे नक्की.विश्लेषणं वरवरंची झालीत.भ्रष्टाचार,महागाईला जनता कंटाळली आणि ते प्रश्थापितांच्या विरोधात गेली.असं विश्लेषक सागतात.काही अंशी हे ठिकही आहे पण त्यापेक्षाही नेत्यांचं जनतेप्रती असलेलं वागणं-बोलणं आणि त्यातून नेर्तृत्वाबद्दल  लोकांमध्ये निर्माण झालेला तिरस्कार किंवा घृणा आणि अविश्वास .या महत्वाच्या गोष्टी साऱ्यांच्याच नजरेतून निसटल्यात..निवडणूक काळातील मनसे,राष्ट्रवादी ,आम आदमी किंवा शेकाप नेत्यांची बॉडी लॅग्वेज,त्यांची भाषाशैली या गोष्टींकडंही जनतेनं अजिबात दुर्लक्ष केलं नाही.किंबहुना अन्य प्रासंगिक घटकांपेक्षा अनेकांच्या मनात नेत्यांच्या याच गोष्टी कायमच्या घर करून राहिल्या.त्याचं प्रायश्चित नेर्तृत्वाला भोगावं लागणारच होतं.आज चिंतनाची जी वेळ नेतृत्वावर आलीय ती त्यांच्या फळाची पापं आहेत.

.सुरूवात मनसेपासून करू. निवडणूक काळातच नव्हे तर ऐरवी देखील राज ठाकरे यांच्या वागण्याबोलण्यात कमालीची अरेरावी दिसते. निवडणूक काळात ती जाहीर सभामधून जशी दिसायची तशीच ती पत्रकारांशी बोलतानाही दिसायची.जाहीर सभांच्या वेळेस एखाद्या कोपऱ्यात गोंधळ सुरू झाला की, “बसायचं तर बसा नाही तर चालते व्हा” असा दम ते  धायचे . ते लोकांना  पटत नसे . .बाळासाहेबांना ते तसं बोलणं शोभून दिसायचं.लोक ते मनावरही घेत नसतं.राज ठाकरे बाळासाहेबांची नक्कल करीत असले तरी ते बाळासाहेब नाहीत.बाळासाहेब होण्याचा त्यांचा प्रयत्नही म्हणनच लोक स्वीकारायला तयार नाहीत..जी अरेरावी आम जनतेच्याप्रती तीच पत्रकारांबद्दलही. राजदीप सरदेसाई,अर्णव गोस्वामी,विलास आठवले यांना मुलाखती देताना त्यांनी जो असभ्यपणा दाखविला तो सुसंस्कृत महाराष्ट्राला आवडणं शक्यच नव्हतं.काकाना  दिलेले वडे आणि सूप या गोष्टी जाहीर सभांमधून मांडल्या जाव्यात हे ही मराठी माणूस खपवून घेणार नव्हता.उध्दव ठाकरेची औकात काढणं वगैरे गोष्टी राज ठाकरे यांच्या अंगलट आल्या.मला वाटतं त्यांनी नाशिकमध्ये सत्ता असताना काय केलं,त्यांच्या टोलविरोधी आंदोलनाचा फज्जा कसा उडाला या साऱ्या गोष्टी पेक्षा त्यांची  असभ्य भाषा मतदारांना आवडली नाही.त्यांनी त्याचं माप राज यांच्या पदरात टाकलं.चिंतन इतर कोण कुठं चुकला यापासून सुरू करण्याऐवजी आपली  भाषा, आपली  बॉडी लॅग्वेज बदलायला हवी हे त्यांनी मान्य केलं  आणि तसा बदल त्यांनी  प्रत्येक्षात दाखवून दिला तर  विधानसभेत क ाही होऊ शकतं..अन्यथा लोकसभेची पुनरावृत्ती ठरलेली आहे.याचं कारण नवी पिढी अशी अरेरावी खपवून घेत नाही.तासभराचं मनोरंजन होतंय म्हणून तरूण सभेला नक्की येत असतील,मनोरंजनासाटी ते सिनेमालाही जातात पण सभेला जाणं आणि मत देणं यात फरक आहे ते मतदारांनी आणि विशेषतः त़रूण मतदारांनी राज यांना दाखवून दिलंय.एक दणका आवश्यक होता तो मिळाला.हा इशारा समजून राज यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी चिंतन केलं पाहिजे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अरेरावी तर करीत नाहीत पण ते काल जे बोलतता त्याच्या उलट आज वक्तव्य करतात. .निवडणूक काळात त्यांनी हेच केलं.उलट-सुलट विधानं करून त्यांनी गोंधळ उडवून दिला.ही चलाखीही लोकांना आता मान्य होत नाही.गुप्तपणे नरेंद्र मोदींना भेटायचं,बातमी फुटल्यावर आपण भेटलोच नाहीत असं म्हणत कानावर हात ठेवायचे आणि नंतर म्हणायचं, “भेटलो तर काय झालं ते कोणी परदेशातले नेते नाहीत” .ही चालबाजी लोकांना मान्य नाही.नेते आपणास फसवतात हा संदेश यातून जातो,त्यावर मतदार योग्य वेळी भाष्य करतात.लोकसभेत हे दिसलं.

शरद पवारांची असं बेभरवश्याचं राजकारण आणि अजित पवारांची राज ठाकरेंच्या तोडीची अरेरावी. याचा समाचार महाराष्ट्रातील जनतेनं घेतलाच घेतला आणि दोघा काका-पुतण्यांना त्यांची जागा दाखवून देत आम्हाला यापुढं गृहित धरू नका असा इशाराही दिला. अजित पवार कार्यकर्ते,अधिकाऱ्यांवर डाफरतात .त्यांच्या अशा डाफरण्याचं कौतूक त्यांच्या चमच्यांना असू शकतं.सामांन्यांना ती दादागिरी वाटते.अशी कोणाचीही दादागिरी जनता मान्य करीत नाही.ती बोलत नक्कीच नाही.कारण त्याचे परिणाम त्यांना माहित असतात.योग्य वेळ येताच अशा नेत्यांना हिसका दाखविल्याशिवाय राहात नाही.अजित पवार यांना तो हिसका बसलेला आहे.अजित पवार यांनी  एकदा पत्रकारांशी पंगा घेतला होताच.त्याबद्दल थोरल्या पवारांना माफी मागावी लागली.नंतर त्यांना पाणी मागणाऱ्या देशमुखांच्या बाबतीत जी भाषा वापरली ती,महाराष्ट्रात कोणालाच आवडली नाही.त्यांनी त्यावर नंतर कराडला जाऊन प्रायश्चित घेतलं असलं तरी स्वभाव बदलला असं झालं नाही.ऐन निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाही आपल्याच बारामतीच्या परिसरात पाणी मागणाऱ्या गावकऱ्यांशी त्यांनी जी अरेरावी केली ती महाराष्ट्र खपवून घेणं शक्य नव्हतं.त्याचं मापही जनतेनं राष्ट्रवादीच्या पदरात टाकलंच टाकलं. राष्ट्रवादीत एकटे अजित पवारच “अरेरावी फेम”  आहेत असं नाही,प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे अजित पवारांच्या तोडीस तोड आहेत.महाराष्ट्राची सत्ता आपल्याकडं आहे.सोबतीला संपत्ती देखील आहे अशा स्थितीत आपलं कोणीच काही करू शकत नाही ही या नेत्यांची भावना त्यांच्या पक्षाच्या पतणाला कारणीभूत ठरली आहे. एक गोष्ट या साऱ्या नेत्यांनी  लक्षात घ्यायला हवी की,मराठी माणूस एखादेवेळेस भ्रष्टाचाऱ्यास माफ करेल,विकास केला नाही तर गप्प बसेल  पण तो मस्तवाल वागणाऱ्यंा कधी क्षमा करीत नाही.बारामतीत हे दिसलं,नाशिकात दिसलं आणि  तिकडं सिंधुदुर्गाही हेच बघायला मिळालं.नारायण राणे म्हणतात, “मी कोकणाचा विकास केला,पंचवीस वर्षे कोकणासाठी राबलो” .ते सारं खरंही असेल पण तुम्ही लोकांशी वागलात कसं,तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या तोंडी भाषा कशी असते.हे तुम्ही कसं विसरता.? विकासाबरोबर जर विनयाचंही दर्शन राणे यांनी घडविलं असतं तर सिंधुदुग्रच्या जनतेनं त्यांना असं आस्मान दाखविलं नसतं.नजिकच्या रायगडचं बघा.सुनील तटकरेंवर भ्रष्टाचाराचे ढिगभर आरोप झाले.त्याकडं रायगडच्या जनतेनं दुर्लक्ष केलं.जेमतेम 2 हजार मतांनी सुनील तटकरे पराभूत झाले.त्यांचा विरोधात उभे केलेले डुप्लीकेट सुनील तटकरेंना 9 हजारांवर मतं पडली.याचा अर्थ त्यांचा तांत्रिक पराभव झाला असं म्हणता येईल.सुनील तटकरे जिल्हयात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेऊन आहेत.अजित पवार ज्या भाषेत बोलतात ती भाषा तटकरे कधी वापरत नाहीत.म्हणजे नेत्यांची ठायी विनयशीलता,आदब,जनतेप्रती आदर या बाबीं असतील  निवडणुकीच्या राजकारणात त्त्यांचा  फार मोठा रोल असतो हे यावेळी पुन्हा एकदा दिसून आलंय. .जी गोष्ट तटकरेंची तीच अशोक चव्हाण यांची.त्यांनीही कधी अरेरावीची भाषा वापरली नाही.त्यांच्यावरही आदर्शबाबत अनेक आरोप होऊनही ते विजयी झाले.त्यांच्या विजयाचं वेगळं विश्लेषणं राजकीय पंडितांना करता आलेलं नाही.ज्या नेत्याला मुख्यमंत्री पद सोडावं लागलं,त्यांना कॉग्रेसनं तिकिट दिल्यानंतरही मोठें काहूर उठलं.मात्र नांदेडच्या मतदारांवर याचा काही परिणाम झालेला दिसला नाही.त्यांना मतदारांनी घवघवीत मतांनी विजयी केलं.समजा ते पराभूत झाले असते तर” त्यांना आदर्श भोवले”  असं आम्ही म्हणालो असतो आज साऱ्यांची बोलती बंद आहे. त्यांचा विजय का झाला यावर सखोल विश्लेषण वाचणात किंवा एकण्यात आलेलं नाही,.त्यांनी नांदेडात असंख्य  माणसं जोडली अरेरावीपासून ते नेहमीच दूर राहिले त्याचा त्यांच्या विजयात नक्कीच फार मोठा वाटा आहे.त्यांनी  नांदेडचा फार विकास केलाय असं कोणीच म्हणत नाही.तरीही  आणि मोदी लाट असतानाही ते जर  विजयी होत असतील तर ती केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाची जादू आहे. लोकमानसाला त्यांच्याबद्दल वाटणारा आपलेपणा यामध्ये त्यांच्या विजयाचे सार दडलेलं आहे.विजयासाठीचे अन्य सारे घटक दुय्यम आहेत.

आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल असतील किंवा महाराष्टातील त्या पक्षाच्या महान नेत्या अंजली दमानिया असतील ही सारी मंडळी ज्या आविर्भावात वागत होती,ज्या अरेरावीनं एका क्षणात साऱ्यांना भ्रष्ट ,नालायक ठरवून मोक ळे होत होती,ज्या पध्दतीनं सत्तेवर आल्यावर पत्रकारांना तुरूंगात टाकण्याची भाषा बोलत होती ती  अजिबात क्षम्य नव्हती.निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी पराभवाची तरतूद आपल्या वागण्या-बोलण्यातून करून ठेवली होती.वाहन्यांवरील चर्चेच्या वेळेसची अंजली दमानियांची मांडणी,त्यांचा आक्रस्ताळेपणा आणि इतरांना तुच्छ लेखून आम्हीच काय ते आता दिवे लावायला आलो आहोत असा आविर्भाव लोकांना अजिबात आवडायचा नाही., “अंजली दमानिया ज्या वाहिनीवर असायच्या ते चॅनेल आपण बंद करायचो ” असं मला अनेकांनी सांगितलं होतं. आपच्या नेत्यांबद्दलची ही लोकभावना असल्यानं त्यांना मतं देण्याचा प्रश्नच येत नव्हता. परिणामतः व्यवस्था परिवर्तनाची भाषा बोलणारे आणि त्यासाठीच आपण लढतो आहोत असा आव आणणारे  आपचे नेते विजयाचं तर सोडाच आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत .त्यांना चिंतन करायचंच असेल तर लोकांनी आपल्यावर विश्वास का ठेवला नाही याचं करावं  आणि आपल्या स्वभावातील दोषांचंही पोस्टमार्टम त्यांनी करावं..आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडणं शक्य असतं.असं करून आपणच आपली फसगत करून घेत असतो.  मोदींनी किती पैसे खर्च केले,त्यांनी किती परदेशी कंपन्यांकंड पीआरचं काम दिलं होतं अशा गोष्टीसागून  काही होणार नाही. निवडणुकां जिंकण्यासाठी हे सारे फंडे अवलंबिलेच जातात.तुम्हाला ते जमत नाही म्हणून इतरांनी ते करू नयेत असं होत नाही.मोदीनी जे सारं केलं,ते करायलं तुम्हाला कोणी रोखलं होतं ? .तुमच्याकडं पैसा नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.त्याला मोदी काय करतील ? .मुळात अशा पीआरनं निवडणुका जिंकता येतात असं नाही.तसंच असेल तर मग “तुम्ही दिल्लीत कोणत्या देशाची पीआर एजन्सी आयात केली होती”? ते देखील सांगावं लागेल.मुख्य मुद्दा विश्वासार्हतेचा असतो.ती विश्वासार्हता आपच्या  नेत्यांनी गमविली होती.पैसा तुमच्याकडं नसेल तर विनयशीलता तरी हवी पण आपमध्ये त्याचीही वानवा होती. दिल्ली जिंकल्याची धुंदी आणि जनतेला आमच्याशिवाय पर्याय नाही ही मस्तवाल भावना असल्यानेच मतदारांनी त्यांना साफ नाकारले.दिल्लीचे तख्त जिंकायला निघालेल्या या मंडळीचा फोलपणा जनतेला  समजलाय आता आपचं काही होऊ शकत नाही. त्यांना चिंतन करायला भरपूर वेळ आणि वाव आहे.पराभूतांना कोणी गांभीर्यानं घेत नाही.यापुढं अरविंद केजरीवाल देखील अदखल पात्र होणार आहेत.कारण त्यांची विश्वासार्हता रसातळाला गेलीय.

निवडणूक काळात डोक्यावर बर्फ़ आणि तोंडात साखर ठेवायला हवं.बोलताना तारतम्य  बाळगायला हवं.निवडणूक प्रचाराच्या अंतिम पर्वात न रेंद्र मोदी देखील थोडे घसरले. जातीसंबंधीचा त्यांनी केलेला  उल्लेख  देखील लोकांना आवडलेला नाही. कारण मोदी कोणत्या जातीचे आहेत हे पाहून लोक त्यांना मतं देणार नव्हते तर देशाचं भलं करू शकणारा एक कर्तृत्ववान माणूस म्हणून लोकांंनी त्यांंना स्वीकारण्याची तयारी दाखविली होती.जातीच्या उल्लेखामुळे त्यांच्याबद्‌द्लची एक सुप्त नाराजी दिसत होती.तीचा मतांवर परिणाम झाला नाही.कारण बदल करायचाच असा निर्णय़ मतदारांनी घेतला होता.मात्र मोदी देखील चुकले होते हे नक्की. प्रचार काळात उध्दव ठाकरे यांनी कमालीचा संयम बाळगल्याचं दिसले. राज ठाकरेंनी अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली तरी उध्दव ठाकरे यांनी संयम पाळला.आपण सभ्य आणि सुसस्कृत आहोत हे आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवून दिलं,ते सभांमधून मोजकं बोलले.जे बोलले ते मुद्याचंच बोलले.राज ठाकरेंच्या आरेला कारे नं उत्तर देण्याचं टाळून त्यांनी लाकंाच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निंर्माण केली.त्याचं माप त्यांच्या पदरात पडलं.

मला वाटतं विकास,भ्रष्टाचार आणि अन्य अशाच गोष्टींपेक्षा पक्षाचं नेर्तृत्व आणि त्याची भूमिका,त्याचं वर्तन,लोकाप्रतीचं त्याचं उत्तरदायीत्व,त्याचं व्यक्तिगत चारित्र्य  या गोष्टी लोकांसाठी फार महत्वाच्या असतात..पहिल्या युपीएच्या वेेळेस डॉ.मनमोहनसिंग यांच्या संयमी,समतोल,अभ्यासू,निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न  नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखविला होता यावेळी राहूल गांधींचे नेतृ्रत्व मतदारांना परिपक्व वाटले नाही. गरिबांच्या झोपडीत जाऊन त्यांच्याबरोबर राहणं,जेवणं हे ते आपलेपणानं करतात असं लोकांना वाटलंच नाही.ते नाटकी वाटलं.त्यामुळं मागची सारी पुण्याई विसरून लोकांनी त्यांना नाकारलं.या साऱ्या गोष्टी फार महत्वाच्या होत्या.असतात..मोदी लाट होती  असं यावेळी म्हटलं गेलं. ती कशामुळं आली.गुजरातचा विकास त्यांनी केला हे जरी खरं असलं तरी तसा विकास तर महाराष्ट्राचाही झालेला आहे,मध्यप्रदेश किंवा बिहारमध्येही नितीशकुमार यांनी तो केला आहे.मुद्दा तेवढाच असता तर नितीशकुमारांचा पराभव होण्याच,काहीच कारण नव्हतं.पण मुद्दा तेवढाच नसतो.नेर्तृत्वाबद्दल लोकांना विश्वास,खात्री,आपलेपणा वाटला पाहिजे.तो मोदींच्या बाबतीत वाटला.आपल्या शरद पवारांच्या बाबतीत तसा विश्वास कोणालाच आणि कधीही वाटला नाही.पवारांच्या पराभवाचं विश्वास नसणं हे ही एक कारण आहेच.

शेकापवर काही भाष्य करावं अशी स्थिती आता त्या पक्षाची राहिली नाही. एन.डी.पाटलींनी एका पक्षाचा प्रचार करायचा,गणपतरावांनी राष्ट्रवादीबरोबर सलगी करायची,आणि रायगडात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात अंतुले आणि राज ठाकरे यांची छायाचित्रं आपल्या बॅनरवर लावायची.हे सारं करातानाही गप्पा साधनशूचितेच्या करायच्या आणि आवही पतिव्रतेचा आणायचा पण ही चलाखी जास्त दिवस चालत नाही.काही प्रसंगी आणि ठराविक काळासाठी तुम्ही  लोकांना   मुर्ख ठरवू शकता पण नेहमीच जनतेला कोणीच मुर्ख बनवू शकत नाही.आमदार जयंत पाटील यांनी एवढं तत्व जरी लक्षात ठेवलं तरी त्यांना वेगळं चिंतन करायची गरज भासणार नाही.जयंत पाटलांचा व्यवहारवादावर जास्त भरोसा असल्यानं अशा चिंतन-बिंतनाचा त्यांना कंटाळाच असतो.स्वतःच्या पलिकडं जाऊन ते कोणाची म्हणजे मतदार,कार्यकर्ते,पक्षाची चिंताही करीत नाहीत.पक्ष एखादया कंपनीसारखा चालविता येऊ शकतो यावर त्यांचा गाढा विश्वास असल्यानं ते चिंतन करीत बसत नाहीत.

सांगण्याचं तात्पर्य एवढंच की,ज्या नेत्यांना असं वाटतं की,किमान विधानसभेत आणि पुढं कधीच आपल्याला मान खाली घालण्याची वेळ येऊ नये आणि पक्षाची देखील नामुष्की होऊ नये अशांनी चिंतनाच्या बैठकीत स्वतःच्या स्वभावाचंही चिंतन केलं पाहिजे.ते त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या हिताचं ठरणार आहे.दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडून आपण जर नामानिराळे राहणार असू तर अशा पक्षाचं आणि त्याच्या नेत्यांचं काय होणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

 

एस एम देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here