पृथ्वीराज चव्हाण यांचे ‘हवेत वार’

1
790

“वाढत्या स्पर्धेमुळे येत्या पाच-दहा वर्षात वृत्तपत्रे लुप्त होतील” असे भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले आहे.वरूणराज भिडे मित्र मंडळाच्यावतीने देण्यात येणार्‍या ‘वरूणराज भिडे स्मृती पुरस्कारा’चे वितरण चव्हाण यांच्या हस्ते पुण्यात  झाले तेव्हा त्यांनी हे भाकित केले..आपल्या विधानाच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी काही उदाहरणं ,आकडेवारी दिली असती तर निश्‍चितपणे त्यांच्या वक्तव्याचा विचार करावा लागला असता.मात्र त्यांनी तसं केलं नाही.पारावरच्या गप्पा मारताना जशी विधाने केली जातात तसे निराधार विधान त्यानी केले असल्यानेच पुराव्यासह आम्हाला त्यांचं विधान खोडून काढावं लागत आहे.पृथ्वीराज चव्हाण यांना नक्की कल्पना असेल की, इलेक्टॉनिक मिडिया आला तेव्हा अनेकांनी आता प्रिन्टची सद्दी संपली असे दावे  केले होते.प्रत्यक्षात झाले काय? तर नंतरच्या काळात  वृत्तपत्रांची संख्या, खप आणि वाचकसंख्याही वाढली.आता सोशल मिडिया आलेला आहे,इंटरनेट आलंय,वेब जर्नालिझम सुरू झालंय त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह  अनेकांना असं वाटू लागलंय की,वृत्तत्रांचे दिवस आता संपत आले आहेत.घडलेली घटना आता सोशल मीडिया द्वारे काही क्षणात जगभर पोहोचते हे जरी खरं असलं तरी व्हॉटस अ‍ॅपवरची बातमी सत्य असतेच असं कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही..त्यामुळं ही माध्यमं प्रभावशाली जरूर आहेत पण ती विश्‍वासार्ह नसल्यानं ती वृत्तपत्रांशी स्पर्धा करू शकत नाहीत हेच वृत्तपत्रांचा खप आणि वृत्तपत्राची संख्या ज्या वेगाने भारतात वाढते आहे त्यावरून स्पष्ट झाले आहे.प्रेस इन इंडियाचा 2014-15 चा जो अहवाल प्रसिध्द झालेला आहे त्यानुसार भारतातील नोंदणीकृत्त दैनिक,साप्ताहिकं,पाक्षिकं,मासिकांची एकूण संख्या 1 लाख 5 हजार 443 एवढी आहे.त्या अगोदरच्या वर्षात म्हणजे 2013-14 ही संख्या 99हजार 660 एवढी होती.म्हणजे एका वर्षात 5,783 वृत्तपत्रांची नव्याने भर पडली   आहे.ही वाढ 5.8 टक्क्याच्या आसपास आहे.गंमत म्हणजे जेव्हा 5,783 नवी वृत्तपत्रे सुरू झाली तेव्हा केवळ 34 वृत्तपत्रे बंद पडली आहेत.म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तशी स्थिती अजिबात नाही.

खपाच्या बाबतीत देखील अशीच भरघोष वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.2013-14 मध्ये देशातील एकूण वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा मिळून एकूण  खप45 कोटी 5 लाख 86 हजार 212 एवढा होता.2014-15 मध्ये तो 51 कोटी,05 लाख 21 हजार 445 पर्यंत वाढलेला आहे.म्हणजे एका वर्षात जर सहा कोटींपेक्षा जास्त खप वाढला असेल तर वृत्तपत्रांना भवितव्य नाही हे प्रिन्टबद्दल असुया असणारीच व्यक्ती म्हणू शकते हे उघड आहे.एकट्या हिंदी वृत्तपत्रांचा खप 25 कोटी 77लाख 61 हजार 985 एवढा प्रचंड आहे.इंग्रजी वृत्तपत्राचा खप 6 कोटी 26 लाख 62 हजार 670 एवढा आहे.त्यापाठोपाठ बंगाली,मल्याळम,मराठी,कन्नड अशी भाषिक वृत्तपत्रे विकली जातात.इलेक्टॉनिक आणि वेब जर्नालिझमची प्रिन्टला स्पर्धा तीव्र झाल्यानंतरचे हे खपाचे आकडे आहेत.हे लक्षात घेतले पाहिजे.हं जाहिरातीची विभागणी झाली असली तरी वृत्तपत्रांनी आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी नवे प्रयास सुरू केलेले आहेत.गंमत अशी की ज्या पर्यायी माध्यमांची म्हणजे इलेक्टॉनिकची अगोदर प्र्रिन्टला भिती दाखविली गेली त्या इलेक्टॉनिकवरील अनेक कार्यक्रमाच्या पानंच्या पानं जाहिराती प्रिन्टमध्ये प्रसिध्द होत आहेत.म्हणजे जाहिरातीचं हे नवं माध्यम प्रिन्टला मिळालं आहे. परकीय भांडवलही आता वृत्तपत्रात येत असल्याने भांडवलाअभावी वृत्तपत्रे बंद पडतील अशी शक्यता नाही.छोटी आणि जिल्हा वृत्तपत्रांना साखळी वृत्तपत्रांची जरूर स्पर्धा आहे पण तरूण भारत,मराठवाडा अशी विशिष्ट विचारांना वाहिलेली आणि विश्‍वस्त संस्थेमार्फत चालविली जाणारी वृत्तपत्रे सोडली तर महाराष्ट्रातही वृत्तपत्रे बंद पडलीत असं झालेलं नाही.जागतिक पातळीवरही अपवाद सोडला तर फार वृत्तपत्रे बंद पडली   नाहीत .त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू राजकारण्यानं वृत्तपत्रांना भवितव्य नाही हे भाकित कश्याच्या आधारे केलंय ते सांगता येत नाही.राजकारणी जेव्हा पत्रकारांच्या कार्यक्रमाला जातात तेव्हा त्यांना काही तरी गंभीर बोलावं लागतं,किंवा त्याना तसं वाटतं.त्यातून अशी विधानं केली जातात.चव्हाण यांच्याकडून खरं तर अशी अपेक्षा नाही.कारण प्रिन्ट मिडियामध्ये महाराष्टात अक्षरशः हजारो कुटुंबांची रोजी-रोटी चालते.त्यात केवल पत्रकारच नसतात तर पत्रकारेतर कर्मचारीही असतात.या सर्वांच्या मनात पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे भिती निर्माण होऊ शकते.जी मंडळी छोटी वृत्तपत्रे चालवितात त्यांच्याही पोटात गोळा येऊ शकतो.त्यामुळं अशी विधानं करताना किमान जबाबदारीनं ती केली पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे.या संदर्भाथ 22 एप्रिल 2012 रोजी प्रतापराव पवार यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं की,’पुढील वीस वर्षे वृत्तपत्रांच्या खपात वाढ अपेक्षित आहे’प्रताप पवार .सकाळसारखे वृत्तपत्र चालवत असल्याने ते काय बोलतात ते महत्वाचे आहे.पथ्वीराज चव्हाण जरूर प्रगल्भ राजकाऱणी आहेत पण वृत्तपत्र व्यवसायाची तयंना कसलीही कल्पना नाही त्यातूनच असं विधान झालेलं असू शकते.वस्तुस्थिती अशी आहे की,जोपर्यंत छापील शब्दावर लोकांचा विश्‍वास आहे तो पर्यंत वृत्तपत्रांना मरण नाही.त्यामुळं प्रिन्टमधील कोणीही घाबरण्याचं कारण नाही.(SM)

 

1 COMMENT

  1. लोकप्रियता मिळविण्यासाठी बोलण्याची सवय राजकारण्यांना असते मात्र बाबा त्यापैकी नाहीत अशी माझी धारणा आहे. कदाचित येथे बोलताना त्यांनी आकडेवारी दिली नसेल परंतू अभ्यासपूर्वक विचार करुन बोलणारे नेते अशी त्यांची ख्याती आहे. या प्रश्नांची ते आपले मत व्यक्त करतील अशी मला खात्री आहे.

Leave a Reply to अरविंद मेहता Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here