newsroomन्यूजरूम लाइव्ह दिवाळी अंकाचे प्रकाशन

मुंबईतील इलेक्टॉनिक मिडियात काम करणार्‍या काही संवेदनशील तरूण पत्रकारांनी एकत्र येत न्यूजरूम लाइव्ह नावाचा चांगला दिवाळी अंक प्रसिध्द केला आहे.या अंकाचं हे तिसरं वर्ष.गेल्या वर्षी अंकाला काही पुरस्कार मिळाले.यंदाचा अंक देखील त्याच तोडीचा आहे.टीव्हीच्या पत्रकारांना व्यक्त होण्यासाठी फार संधी नसते.त्यामुळं मनातील भावभावना,स्पंदनं,मनातील वैचारिक कल्लोळ व्यक्त करता येत नाहीत.अशा पत्रकारांसाठी कमलेश सुतार,प्रसाद काथे ,पंकज दळवी,प्रशांत डिंगणकर या पत्रकारांनी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.टीव्हीची दुनिया वलयांकित असते.मात्र या झगमगाटामागेही वेदना आहेत,दुःख आहेत,आक्रोश आहे,अडचणी.समस्या आहेत हे सारं व्यक्त करण्याचं न्यूजरूम लाइव्ह हे चांगलं माध्यम आहे.अर्थात फक्त आदळआपट करण्यासाठीच काही हा अंक नाही,जे चांगले अनुभव आहेत,ज्या सुखद आठवणी आहेत त्या मांडण्यासाठीही न्यूजरूम लाइव्हचा नक्कीच अनेकांनी उपयोग करून घेतला आहे.अंकाच्या मांडणीपासून सजावटीपर्यंत अंक उठावदार झालेला आहे यात शंकाच नाही.पत्रकारांची भूमिका नेहमीच सामाजिक उत्तरदायीत्व पार पाडणारी असते किंवा असावी असा संदेश देणारं अत्यंत देखणं आणि परिणामकारक मुखपृष्ठ हे या अंकाचं वैशिष्टय म्हणावं लागेल.आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूजरूम लाइव्ह हा अंक विकून जे पैसे मिळतील ती रक्कम सरकारच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीला देण्यात येणार आहे.ही बाब स्वागतार्ह आणि नक्कीच प्रेरणा देणारी म्हणावी लागेल.या भूमिकेबद्दल टीम न्यजरूप लाइव्हचे अभिनंदन.

अंकाचं प्रकाशन काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.राज ठाकरेचं भाषणात अनेक मुद्यांना हात घातला.समाजात अनेक प्रश्‍न असताना पत्रकार,साहित्यिक कोणतीच भूमिका घेत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.त्यांच्या या मताशी कोणीही सहभत होईल यात शंकाच नाही.कारण स्वतःला ज्येष्ठ समजणारी मंडळी देखील ठोस किंवा ऱोखठोक भूमिका घेतल्यानं कुणाचे हितसंबंध तर धोक्यात येणार नाहीत ना याची भिती मनात बाळगून गुपचूप असते.त्यामुळं सारा समाज अबोल झाल्यासारखा झाल्याचं ठाकरे यांचं म्हणणं आहे.आणीबाणीच्या वेेळेस माध्यमांनी जी भूमिका घेतली ती आज हजार-पाचशेवरून सारा देश अडचणीत सापडलेला असतानाही घेताना दिसत नाही असं मत त्यानी व्यक्त केलं आहे.अग्रलेखातूनही ठोस भूमिका बघायला मिळत नसल्याचं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे.टीव्हीत येणार्‍या नवख्या पत्रकारांच्या भाषेवर त्यांनी बरोबर बोट ठेवले.भाषा सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत अशी सूचना त्यांनी केली.पत्रकारांशी संवाद साधण्यात आपल्याला आनंद मिळतो असं सांगतानाच त्यांनी बातमी विरोधात आली किंवा बाजुनं आली तरी आपण कुणाला फोन करून जाब विचारत नसल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं.

एकूण कार्यक्रम उत्कृष्ट झाला.रश्मी पुराणिक यांनी मोजक्या शब्दात महिला पत्रकारांना संपादक होण्याची फारशी संधी दिली जात नसल्याचं किंवा अगदी ब्युरोचीफ किंवा पोलिटिकल बीट देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखविण्याचीही कुणाची तयारी नसते अशी खंत व्यक्त केली.महिलांना राजकारण कळत नाही अशी यामागची भावना असावी असं मतही त्यानी व्यक्त केलं.महिला पत्रकार म्हणून येणार्‍या अन्य अडचणी देखील त्यांनी मांडल्या. .कमलेश सुतार यांनी प्रास्ताविकात अंकाची भूमिका मांडली.मिलिंद भागवत यांनी सूत्रसंचालन आणि पंकज दळवी यांनी आभार मानले.प्रशांत डिंगणकर यावेळी व्यासपीठावर होते.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here