अरूण करमरकर यांचा सत्कार

0
856

ठाणे, दि १३ (प्रतिनिधी) ‘‘सामाजिक जीवनात ज्या वेळेला संस्थात्मक जीवनाचा र्‍हास होतो, संस्थेपेक्षा व्यक्तीला महत्त्व येत, ज्याप्रमाणे पुष्पहारातील केवळ पुष्प दिसतात त्यांना जोडणारा धागा दिसत नाही तसे धाग्यासारखे काम करणारा व सतत काट्यांशी हितगुज करणारा कार्यकर्ता अशी अरूण करमरकर यांची ओळख आहे’’ असे कौतुकाचे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख प्रा. अनिरूध्द देशपांडे यांनी काढले. अरूण करमरकर यांच्या षष्ठ्यब्दीपुर्ती सोहळयाचे गोखले मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभुणे, मदनदासजी देवी, दादा इदाते, नंदु जोशी, विनय सहस्त्रबुध्दे, अच्यु्तराव कराडकर, अच्युतराव वैदय, भालचंद्र दाते, प्रा. श्याम अत्रे, नितीन केळकर, भगिरथ प्रतिषठानचे डॉ प्रसाद देवधर, रवींद्र कर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. अनिरूध्द देशपांडे पुढे म्हणाले की, ‘‘संकट किंवा अडचणीत प्रतिबध्दता म्हणजेच कमीटमेंट दिसुन येते. अशाप्रकारची प्रतिबध्दता अरूण करमरकर यांच्यात दिसते. सामाजिक समरसता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तरूण भारतचे संपादक अशा अनेक जबाबदार्‍या सांभाळतांना त्यांची ही प्रतिबध्दता दिसुन आली. संघ परिवारातील आपुलकी आणि आत्मीयतेच्या भावनेमुळे ही प्रतिबध्दता वृध्दींगत होते. संघाचे काम करणे हा एक भाग्ययोग आहे यांचा प्रत्यय आपल्याला येतो, हेच काम अनेकांचे जीवन ध्येय होऊन बसते, अशा कार्यकर्त्यांपैकी अरूण करमरकर एक असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अरूण करमरकर यांना शुभेच्छा देतांना ज्येेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभुणे म्हणाले की, ‘‘संपर्कात आलेल्यांना प्रत्येकाशी दिर्घकाळ मैत्री टिकवून ठेवण्याचे कसब अरूण करमरकर यांच्याकडे आहे . एखादया कादंबरीचा नायक होण्यासारखा अरूण करमरकर यांचा जीवनप्रवास आहे. अरूण करमरकर यांनी अनेक हिर्‍यांना पैलु पाडण्याचे काम केले आहे. संपुर्ण आयुष्यात अरूण करमरकर यांनी निरलसपणे काम केले. यात त्यांनी पद आणि अहंकार जाणीवपूर्वक दूर ठेवले’’.
यावेळी अरूण करमरकर यांच्याबरोबर काम करण्यांची संधी लाभलेल्या विविध कार्यकर्त्यांंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. श्याम अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या अरूण करमरकर यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणार्‍या ‘निरलस कार्यकर्त्याची गोष्ट, अरूण एकसष्ठ’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘आजपर्यंत ज्यांनी मला दोषासकट स्विकारले आणि माझ्यावर संस्कार केले त्यांच्यामुळेच मी काम करू शकलो. परंतु प्रत्येक जण हा अपुर्णांक असतो, अनेक अपुर्णांकातून पुर्णांक तयार होत असतात, या विचारावर माझा विश्वास असल्याचे सांगत आत्तापर्यंत राहिलेले काम पुर्ण करण्याचा अरूण करमरकर यांनी संकल्प सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here