पत्रकारांचा अंत पाहू नकाः एस.एम.

0
1204

पत्रकारांच्या आंदोलनास अभूतपूर्व यश

34 जिल्हयात पत्रकार रस्त्यावर 

आंदोलन 100 टक्के यशस्वी झाल्याचा समितीचा  दावा

सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यास मार्चमध्ये चलो मुंबई :एस.एम.देशमुख यांची घोषणा 

मुंबई दिनांक 26 नोव्हेंबर ( प्रतिनिधी ) पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन,मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न आदि मागण्यांसाठी राज्यातील पत्रकारांनी आज 35 जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेले आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे.स्वतः एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी धरणे आंदोलन केले.यावेळी बोलताना एस.एम.देशमुख यांनी सरकारनं पत्रकारांचा आता जास्त अंत पाहू नये असा इशारा सरकारला दिला.आजच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नाही तर मार्चमध्ये राज्यातील दहा हजार पत्रकार चलो मुंबईचा नारा देऊन तेथे धडक मारतील असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारनं पत्रकार संरक्षण कायदा 7 एप्रिल 2017 रोजी दोन्ही सभागृहात पारित केला असला तरी दीड वर्षे होऊन गेल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नाही.त्यामुळं पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणिय वाढ झाली आहे.ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्याची घोषणा सरकारनं मागील अधिवेशनात केली परंतू अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.श्रमिक पत्रकारांसाठीच्या मजिठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टानं देऊनही राज्य सरकार त्यासाठी टाळाटाळ करीत आहे. छोटया वृत्तपत्रांची गळचेपी करणारे जाहिरात धोरण तयार केले असून हे जाहिरात धोरण अंमलात आले तर बहुसंख्य छोटया वृत्तपत्रांच्या कार्यालयांना टाळे लावावे लागेल,अधिस्वीकृतीच्या नियमांतही ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणारच नाही अशी व्यवस्था केली गेलेली आहे.यासर्व मागण्या घेऊन समितीने सरकारकडे सातत्यानं अर्ज विनंत्या केल्या ,मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आश्‍वासनंही दिलेली आहेत.मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही.केलेले वादे सरकारनं अंमलात आणावेत यासाठी आजचे राज्यव्यापी आंदोलन होतं.सरकारनं या आंदोलनानंतरही पत्रकारांच्या मागण्यांची पूर्तता केली नाही तर मार्च मध्ये चलो मुंबईचा नारा देण्यात येईल अशी घोषणा आज एस.एम.देशमुख यांनी आज पुणे येथे केली . .

मुंबई वगळून आज राज्यातील ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,नाशिक,सोलापूर,अकोला,औरंगाबाद , बीड,हिंगोली,जालना,वाशिम,परभणी,नांदेड,लातूर आदि जिल्हयांसह राज्यभर आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाणी पत्रकारांनी घोषणा देत कलेक्टर ऑफिसचा परिसर दणाणून सोडला.पत्रकारांशी पंगा घेऊ नका,2019 जवळ आलंय,जो वाद किया हो,निभाना पडेगा,पत्रकार जनतेचा आवाज आहेत,त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका अशा घोषणा लिहिलेले फलक पत्रकारांनी हातात धरले होते.आजच्या आंदोलनामुळे राज्यातील पत्रकारांच्या एकजुटीचे अभूतपूर्व दर्शन आज महाराष्ट्राला घडले.धरणे आंदोलन संपल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदनं दिली गेली.

आठ हजारांवर एसएमएस पाठविले

आंदोलनाचा एक भाग म्हणून आज मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून आठ हजारांवर एसएमएस पाठविले गेले.प्रत्येक जिल्हयातून अडिचशे ते तिनशे एस.एम.एस.मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांना पाठविले गेले.एसएमएसच्या माध्यमातून पत्रकारांनी आपल्या संतप्त भावना मुख्यमंत्र्यांकडं नोंदविल्या असून तातडीने पत्रकारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याची विनंती केली आहे.

रावसाहेब दाणवेंना निवेदन

हिंगोलीमध्ये पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवेदन देतानाच पेन्शन आणि पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याचे आश्‍वासन 2014 च्या पक्षाच्या जाहिरनाम्यात दिले होते याचे स्मरण करून दिले.दानवे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत तुमच्या पदाधिकार्‍यांची बैटक लावून हे प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

बेळगावचे पत्रकार कोल्हापुरात

सीमावर्ती बेळगावच्या पत्रकारांनी कोल्हापुरात येऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत पत्रकारांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍याना दिले.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार राज्यातील जिल्हा संघ,तसेच इतर बहुतेक पत्रकार संघटनांनी एकत्र येत आजचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here