पंतप्रधानांच्या दौ-यातील पत्रकार

0
748

पत्रकारांना पंतप्रधानाच्या सोबत परदेश दौ-यावर फुकट जाता येते हा असंख्य पत्रकारांसह अक्षरश: आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा गैरसमज आहे . पंतप्रधानांच्या अधिकृत परदेश दौ-यातच नव्हे तर राष्ट्रपती , उपराष्ट्रपती यांच्याही सोबत वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना केवळ विमान प्रवास मोफत असतो आणि राहणे-खाणे-पिणे-फिरणे-स्थानिक प्रवास-पर्यटन यासाठी स्वत:ला पैसा खर्च करावा लागतो , हे लक्षात घ्या . साधारण वीस-बावीस वर्षापूर्वी ( बहुदा नरसिंहराव किंवा भाजपचे तेरा महिन्यांचे सरकार आले त्यावेळपासून ) ही अशी पद्धत सुरु झाली …आणि मग बराच काळ मालक किंवा व्यवस्थापनातील बडे अधिकारी अशा परदेश दौ-यात सहभागी होऊ लागले हे अनेकांना आठवत असेल… मराठीत याला अपवाद होते ते लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स आणि सकाळ या दैनिकांचे मालक म्हणा की व्यवस्थापन . आता त्या यादीत ‘लोकमत’चे नाव आले म्हणून मलाही एक दौरा करायला मिळाला !
दुसरे महत्वाचे म्हणजे ; पंतप्रधान किंवा वर उल्लेख केलेल्या अन्य महत्वाच्या लोकांसाठी एअर इंडियाचे जे विमान विशेष विमान वापरले जाते त्यात पत्रकारांसाठी केवळ ३५ ते ४० जागा असतात आणि त्यापैकी किमान १० जागा शासनाच्या सेवेतील प्रसिद्धी अधिका-यासाठी राखीव असतात . म्हणजे प्रत्यक्षात पत्रकारांना जागा मिळतात त्या २५ ते ३० ! शेकडो पत्रकार हा दौरा करतात असे विधान सरसकट केले जाते , ते बरोबर नाही . या २५/३० पैकी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था (५) , राष्ट्रीय दैनिके (५), आंतरराष्ट्रीय दैनिके (५) , प्रकाशवृत्त वाहिन्या (५) आणि उर्वरित भाषक पत्रकारितेतील पत्रकार अशी विभागणी ढोबळमानाने असते .
मी अशा दौ-यात सहभागी झालेलो आहे . ‘लोकमत’चा राजकीय संपादक असताना गेल्याच वर्षी पंतप्रधानांसोबत जी-२० च्या बैठकीसाठी रशियाला गेलो होतो . म्हणजे ही माहिती अपडेट आहे .
एक मात्र वादातीत – विमानांत खाण्या-पिण्या’ची चंगळ असते ! एकंदरीत , पत्रकारांविषयी गोडगैरसमजच जास्त असतात , हे खरेच की !!

-प्रवीण बर्दापूरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here