पंढरीनाथ सावंत ः सिर्फ नाम ही काफी है… 

पंढरीनाथ सावंत हे नाव माहिती नाही असा पत्रकार महाराष्ट्रात सापडणार नाही.मार्मिकचे दीर्घकाळ संपादक एवढीच पंढरीनाथ सावंत यांची ओळख नाही .. ते सिध्दहस्त लेखक आणि सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य करणारे मार्मिक भाष्यकारही आहेत..जीवनाचे अनेक रंग अनुभवलेल्या पंढरीनाथ सावंत यांनी आपल्या जीवनाची सुरूवात एका गणपती तयार करण्याच्या कारखान्यात मदतनीस म्हणून केली.पुढे ते बेस्टमध्ये बस कंन्डक्टर झाले.तेथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी महापालिका उर्दु शाळेत ड्रॉईंग टिचर म्हणून काम केले.पोटापाण्याच्या या सर्व नोकर्‍या सुरू असतानाच त्यांचे लेखन सुरू होते.1967 च्या सुमारास अरब-इस्त्राइल संघर्षावर मार्मिकमध्ये त्यांचा एक लेख प्रसिध्द झाला आणि ते मार्मिकच्या संपर्कात आले.त्याच सुमारास श्री,सिने ब्लिटझ,प्रभंजन,लोकमतमध्येही त्यांनी काम केले आणि अंतिमतः ते मार्मिकचे कार्यकारी संपादक झाले.त्यांनी हे पद समर्थपणे दीर्घकाळ सांभाळले.पत्रकारिता करीत असताना त्यांचं लेखनही सुरू होतं.हिटलरचे अवतार,रोगजंतूचे आद्य शिकारी,जागतिक कीर्तीचे जग बदलणारे,आदि पुस्तके त्यांनी लिहिली.‘मी पंढरी गिरणगावचा’ या पुस्तकाची विशेष चर्चा झाली.पंढरीनाथ सावंत यांचं वय आज 86 वर्षाचे आहे.मार्मिकचे विद्यमान संपादक मुकेश माचकर यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहंलय की,’20 वर्षांपूर्वी बसवलेला पेसमेकर,अगदी अलिकडे जडलेला मधुमेह,यापैकी कश्याचही असर पंढरीनाथ सावंत यांच्या उमद्या,उत्साही,उत्फुल्ल व्यक्तीमत्वावर पडलेला नाही..आजही रोज खिडकीतल्या टेबलापाशी बसून दुपारी किमान तीन तास ते काहीतरी लिहित- वाचत असतात “,,म्हणजे आजही त्यांच्यातला पत्रकार,लेखक जिवंत आहे..मुळचे रायगड जिल्हयाच्या महाडनजिकच्या विन्हेरे गावचे..पहिल्यापासून अगदी साधी राहणी असलेले पंढरीनाथ सावंत हे आजही लालबागला पत्रा चाळीत राहतात यावऱ विश्‍वास बसू नये पण हे वास्तव आहे..

पंढरीनाथ सावंत यांचा आज वाढदिवस नाही..तरीही हा मजकुर यासाठी की,..पंढरीनाथ सावंत हे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या लेखी पत्रकारच नाहीत..त्यामुळे त्यांना पेन्शन नाकारण्यात आली..त्यांनी  आपले नियुक्तीपत्र सादर केले नाही आणि ते कंडक्टर होते..अशी दोन कारणं त्याची असल्याचे समजते.वस्तुतः ज्या अधिकार्‍यांनी पंढरीनाथ सावंत यांचा सन्मान करण्यास नकार दिला त्या अधिकार्‍यांच्या वयापेक्षा अधिक काळ पंढरीनाथ सावंत यांची पत्रकारिता केलेली आहे..शिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.एक लाख रूपयांचा हा पुरस्कार आहे..पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सरकार दरवर्षी हा पुरस्कार देते..’त्यांची पत्रकारिता 30 वर्षांची नाही’ असं जर माहिती आणि जनसंपर्क विभागाला वाटत असेल तर मग त्यांना दिलेला जीवन गौरव पुरस्कार परत घेण्याची शिफारस माहिती आणि जनसंपर्क विभागाने सरकारकडे करायला हरकत नाही..कारण एकीकडे अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार द्यायचे आणि दुसरीकडे पेन्शन द्यायची वेळ आली की,कारणं शोधायची हे बरोबर नाही..त्यांना पेन्शन नाकारणार्‍या अधिकारयांवर सरकारने कारवाई केली पाहिजे असं आमची मागणी आहे..कारण या अधिकार्‍यांनी पत्रकार सन्मान योजनेचे रूपांतर पत्रकार अवमान योजनेत करून टाकलं आहे.सर्वपक्षीय आमदारांनी याविरोधात विधानसभेत आवाज उठविला पाहिजे..कारण वयोवृध्द पत्रकारांचा हा अवमान सहन करता येण्यासारखा नाही.

.भाजप नेते आशिष शेलार यांनी काल पत्रा चाळीत जाऊन पंढरीनाथ सावंत यांची भेट घेतली..त्यासंबंधीचे ट्विट शेलार यानी केले आहे.त्यांना मदतही केली..पंढरीनाथ सावंत हे दीर्घकाळ मार्मिकचे संपादक होते,मार्मिक हे शिवसेनेचे मुखपत्र ..विद्यमान मुख्यमंत्री शिवसेनेचे हे सारे संदर्भ शेलार यांच्या भेटी मागे असू शकतात..ते काहीही असले तरी विरोधकांना ही संधी माहिती आणि जनसपर्क विभागातील काही निर्बुध्द अधिकार्‍यांमुळे मिळाली आहे हे नाकारता येणार नाही..या भेटीमागचं राजकारण सोडा,पण शेलार यांनी सावंतांची भेट घेतली,त्यांना मदत केली त्याबद्दल त्यांना धन्यवादच द्यावे लागतील..कारण समाज पत्रकारांकडून ढिगभर अपेक्षा करतो,त्यांनी तत्वांशी तडजोड केली नाही पाहिजे,प्रामाणिकपणे पत्रकारिता केली पाहिजे,सामाजिक उत्तरदायीत्व निभावले पाहिजे वगैरे वगैरे .थोडक्यात समाजाच्या पत्रकारांकडून ढिगभर अपेक्षा असतात….या अपेक्षा गैर आहेत असं मी म्हणणार नाही.मात्र पत्रकारितेचा कवडीचा ही लाभ न घेणार्‍या पत्रकारांना त्यांच्या उत्तर आयुष्यात जपण्याची जबाबदारी समाजाची नाही काय ? आशिष शेलार आणि तत्सम मंडळी ती पार पाडणार असतील तर या बदलाचं स्वागत केलं पाहिजे..मात्र राज्यात सन्मानाच्या नावाखाली अपमानित झालेले पंढरीनाथ सावंत एकमेव ज्येष्ठ पत्रकार नाहीत राज्यात असे अनेक पत्रकार आहेत.त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे..त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी उद्याच्या अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित करून राज्यातील वयोवृध्द पत्रकारांची जी अवहेलना सुरू आहे ती थांबविली पाहिजे आणि अधिकार्‍यांची जी मनमानी सुरू आहे त्याला चाप लावला गेला पाहिजे.स्वतः मुख्यमंत्री एक पत्रकार आङेत..पत्रकारांच्या व्यथा त्यांनाही माहिती आङेत,त्यांनी देखील या प्रश्‍नात लक्ष घालून वयोवृध्द पत्रकारांना मंत्रायलाच्या पायरया वारंवार चढाव्या लागणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे अशी आमची विनंती आणि मागणी आहे..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here