‘स्टोरी’ एका जिगरबाज पत्रकाराची …

0
2060

मिडिया,राजकारण्याचं मौनही न्या.लोया यांच्या मृत्यूएवढंच संशयास्पद,
न्यायमूर्ती लोयांना न्याय कोण देणार ?

देशातील सारा मिडिया मुठभर भांडवलदारांच्या हाती देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर का चालला आहे याचं उदाहरण म्हणून आपणास न्या.बृजगोपाल हरकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाकडं बघता येईल.सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेल्या लोया यांचा मृत्यू 30 नोव्हेंबर 2014 रोजी नागपुरात झाला.सांगितलं असं जातंय की,न्या.लोया यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला,त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.मात्र रात्री 11.30 वाजता न्या.लोया आपल्या पत्नीशी 40 मिनिटे बोलले.त्यांनी घरची सारी चौकशी केली पण आपली तब्येत खराब असल्याचं त्यांनी सांगिंतलं नाही.मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी लोया यांच्या कुटुंबियांना फोन आला आणि लोया यांचा ह्रदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं.तीन वर्षांपुर्वी जेव्हा ही घटना घडली तेव्हाही माध्यमांनी लोया यांच्या मृत्यूची फारशी दखल घेतली नाही किंवा त्यावर कोणी सवालही विचारला नाही.त्यामुळं पत्रकार निरंजन टकले यांनी या संदर्भातला गौप्यस्फोट केल्यानंतर मिडिया या प्रकरणात शांत आहेयाचं विशेष आश्‍चर्य वाटण्याचं काऱण नाही.परिस्थितीजन्य पुरावे ज्यांच्याकडं अंगुलीनिर्देश करताहेत त्या आसामी मोठ्या हस्ती असल्यानं धंदेवाईक मिडियानं मौन राखणं पसंत केलंय असं दिसतं.

निरंजन टकले यांनी सलग तीन वर्षे सार्‍या घटनाक्रमांची माहिती संकलीत केल्यानंतर जी स्टोरी तयार केली ती ते ज्या द वीक शी जोडले गेलेले आहेत त्या विकनं ही  छापण्याचं नाकारलं. The Caravan या बेबसाईटनं ती स्टोरी छापल्यानंतर वायर आणि अन्य काही वेबसाईटवर ही स्टोरी झळकली.त्याची देशभर चर्चा सुरू असली तरी मेनस्ट्रीम मिडियामध्ये मात्र ही स्टोरी छापण्याचं धाडस अजून कोणी केलेलं नाही.इलेक्टॉनिक मिडियालाही जेवढं महत्व पद्मावतीला द्यावं वाटलं त्याच्या एक टक्काही न्या.लोया यांचा संशयास्पद मृत्यू महत्वाचा वाटला नाही.सारा मिडिया ताब्यात ठेवण्याचा कसा फायदा होतो हे आज दिसायला लागलं आहे.त्यामुळं वृत्तपत्र स्वातंत्र्यांचा पुरस्कार करणार्‍या मंडळींनी संभाव्य धोके लक्षात घेऊन संघटीत आवाज उठविला पाहिजे.हा विषय केवळ पत्रकार संघटनांपुरताच मर्यादित नसून वृत्तपत्र स्वातंत्र्याशीही निगडीत आहे.हे लक्षात घेतलं पाहिजे.मिडियाच नव्हे तर सारेच राजकीय पक्ष,अपवाद वगळता बहुतेक सामाजिक संघटना या विषयावर मूगगिळून बसले आहेत.हे सारं भयानक आहे.एक पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता एका मोठ्या विषयाचा पर्दाफास करतो आणि समाज,राजकीय पक्ष आणि सारा मिडियाचं त्याची उपेक्षा करतो हे सारं भयानक आहे.चिंताजनक आहे .

‘इतना सन्नाटा क्यो है भाई’ असा प्रश्‍न विचारताना सारा घटनाक्रम लक्षात घेतला पाहिजे.तो निरंजन टकले यांनी आपल्या स्टोरीत दिलेला आहे.बृजगोपाल हरकिशन लोया हे मुळचे लातूर जिल्हयातील गोटेगावचे.मुंबईत 2014 ला त्यांच्याकडं सीबीआय न्यायालयाचे कामकाज सोपविण्यात आले.त्यांच्या अगोदर जे.डी.उत्पात नावाचे न्यायमूर्ती हे कामकाज पहात  होते.त्यांच्या समोर सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी सुरू होती.अनेकदा सूचना करूनही हाय डायबेटीसचं कारण देत अमित शहा न्यायालयात उपस्थित राहात नव्हते.त्यामुळं 6 जून 2016 रोजी न्या उत्पात यांनी अमित शहांच्या वकिलांना चांगलंच फटकारलं.मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही.20 जून रोजीच्या तारखेलाही अमित शहा कोर्टात आलेच नाहीत.त्यानंतर 26 जूनला तारीख नक्की केली गेली.मात्र 25 जून रोजीच उत्पात यांची बदली केली गेली.वस्तुतः सर्वोच्च न्यायालयाने एकाच न्यायाधीशानं सोहराबुद्दीन खटल्याची सुनावणी करावी असे आदेश दिलेले असतानाही ही बदली केली गेली.न्या.लोया यानी सूत्रे घेतल्यानंतर पुन्हा अमित शहा तारखेला आलेच नाहीत.31 ऑक्टोबर रोजी पुन्हा ताऱीख पडली तेव्हा न्या.लोया यांनी शहांच्या वकिलांनी ‘अमित शहा मुंबईत असतानाही कोर्टात आले का नाहीत’? असा सवाल केला होता.त्यानंतर या खटल्याची सुनावणी 15 डिसेंबर 2014 रोजी नक्की केली गेली होती.दरम्यानच्या काळात न्या.लोया यांच्या एक सहकारी न्यायाधीश सपना जोशी यांच्या मुलीचे नागपूरला लग्न होते.न्या.लोया या लग्नाला जायला उत्सुक नव्हते.त्यानी नकार दिला होता.मात्र अन्य दोन न्यायाधीशांनी आग्रह केल्यानंतर ते नागपुरला गेले .त्यांचा मुक्काम नागपुरातील रवी भूवन या व्हीआयपींसाठी असलेल्या विश्रामगृहात होता.30 नोव्हेंबर रोजी लग्न उरकून आल्यानंतर रात्री 11.30 वाजता त्यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता.फोनवर ते 40 मिनिटे बोलले.मात्र आपली तब्येत बिघडली आहे,किंवा तब्येतीची काही तक्रार आहे हे त्यांनी पत्नीला सांगितलं नव्हतं.मात्र दुसर्‍या दिवशी  एका कार्यकर्त्यानं त्यांच्या मृत्यूची खबर त्यांच्या नातेवाईकांना दिली.एका महत्वाच्या व्यक्तीचं निधन होतंय आणि त्याची खबर सरकारच्यावतीनं न दिली जाता ज्यांचा न्या,लोया यांच्याशी संबंध नाही अशी व्यक्ती देतेय हे न पटणारं आहे.

निरंजन टकले यांनी जो घटनाक्रम सांगितला आहे तो एखादया चित्रपट कथेसारखा आहे.लोया यांच्या छातीत दुखायला लागल्याची जेव्हा त्यांनी तक्रार केली तेव्हा त्यांना रिक्षामधून दांडे हॉस्पिटलमध्ये नेले गेले.सीबीआयचा जज आजारी असेल तर त्याला रूग्णालयात न्यायला गाडीही मिळाली नाही यावर कोणाचा विश्‍वास बसत नाही.शिवाय रवी भूवनवर नेहमीसाठी पाच-पंचवीस गाड्या असतातच.असं असतानाही त्यांना रिक्षातून का नेलं गेलं ? याचं उत्तर कोणाकडंच नाही.एवढंच नव्हे तर ज्या दांडे हॉस्पिटलमध्ये त्याना नेलं गेलं तेथील इसीजी मशिन म्हणे बंद होती.तेथून त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं.तेथे त्यांना मृत घोषित केलं गेलं.जर खरंच त्याना ह्रदयविकाराचा झटका आला असेल तर  ही सारी दिरंगाई त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यास कारणीीभूत ठरली असं म्हणता येईल.संशय इथंच संपत नाही तर दुसर्‍या दिवशी जेव्हा त्यांचा मृतदेह त्यांच्या लातूर जिल्हयातील गोटेगाव या मुळगावी नेला गेला तेव्हा अ‍ॅब्युलन्समध्ये चालकाशिवाय कोणीच नव्हते.म्हणजे एखादया बेवारस व्यक्तीसारखा तो मृतदेह पाठविला गेला होता.त्यांना नागपूरला चला म्हणण्याचा आग्रह करणारे ते दोन जज कोठे होते ?.ते किंवा अन्य कोणीच मित्र का त्यांच्यासमवेत आले नाहीत ?.मृतदेह घरी आल्यानंतर त्यांच्या मानेच्या डाव्याबाजुला शर्टवर रक्ताचे डाग होते असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.असं असेल तर हे रक्त कोठून आलं हे कोडं उलगडत नाही.

.सोहराबुद्दीनची खोटया चकमकीत हत्त्या केली गेली असा आरोप होता.त्या प्रकरणात भाजपचे नेते अमित शहा यांची कार्टाला भूमिका जाणून घ्यायची होती.मात्र खटला सुरू झाल्यापासून अमित शङा एकदाही कोर्टात हजर झाले नाहीत.खरं तर गुजरातमधलं या प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालाने हे प्रकरण महाराष्ट्रात पाठविले होते या प्रकरणाची सुनावणी सीबीआय न्यायालयात सुरू होती.त्यामुळं हे प्रकरण अधिकच गंभीर होतंय.मात्र सारा मिडिया यावर चुप्पी साधून आहे.पद्मावती चित्रपटासाऱख्या एका दुय्यम विषयावर चर्चेचे फड रंगविणारा इलेक्टॉनिक मिडिया न्या.लोया यांना न्याय द्यायला कमी पडताना दिसतो आहे.याचं कारण एकतर दबाब असावा किंवा भिती असावी.मिडियाच्या मौनाचं कारण काहीही असलं तरी भांडवलदारी मिडिया आपला धर्म विसरत चालला आहे हे या प्रकरणानं पुन्हा दिसून आलंय.मात्र निरंजन टकले यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांनी मोठं धाडस करून हे प्रकरण लावून धरलं.त्याला पुढं किती यश येईल,नाही  हे माहित नसलं तरी निरंजन टकले यांनी आपला पत्रकारितेचा धर्म पाळला आहे असं आम्हाला वाटतं.उठसुठ पत्रकारांबद्दल नकारात्मक सूर काढणारे निरंजन टकले यांच्यासार्‍या निडर पत्रकारांच्या पाठिशी उभे राङणार आहेत की नाही हे महत्वाचे आहे.मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि राज्यातील पत्रकार निरंजन टकले यांच्याबरोबर आहेत हे नक्की.

एस.एम.देशमुख 

(पत्रकार निरंजन टकले यांच्या The Caravan, The Wire, the Quint Media Vigil या वेबसाईटवर प्रसिध्द झालेल्या मजकुराच्या आधारे..)

https://youtu.be/JnVzN-kwyaU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here