अवघे ५० ते ६० दिवाळी अंक बाजारात; किमतीत २० ते २५ रुपयांची वाढ

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिवाळी अंकांना यंदा वस्तू-सेवा कराचा फटका बसला असून बाजारात अवघे ५० ते ६० अंक व्रिक्रीसाठी आले आहेत, तसेच दिवाळी अंकांच्या किमतीतही यंदा २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे.

मराठीशिवाय अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेत इतक्या मोठय़ा संख्येत दिवाळी अंक निघत नाहीत. दरवर्षी मराठीत साडेतीनशे ते चारशे अंक प्रकाशित होतात. साधारणपणे दरवर्षी दसऱ्यापासून दिवाळी अंक बाजारात यायला सुरुवात होते. दिवाळी पाच दिवसांवर आली असली तरी बाजारात अवघे ५० ते ६० अंक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

बी. डी. बागवे वितरण कंपनीचे हेमंत बागवे म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या खूपच कमी आहे. वस्तू-सेवा कराचा फटका यंदाच्या वर्षी दिवाळी अंकांना बसल्याचे दिसून येत आहे. जाहिराती, छपाई व कागद, वाहतूक यांचे वाढलेले दर आणि वस्तू-सेवा कर यांचा परिणाम झाला आहे. मात्र असे असले तरी खासगी किंवा सार्वजनिक ग्रंथालये, वैयक्तिक स्तरावर दिवाळी अंक घेणारी मंडळी यांच्याकडून होणाऱ्या खरेदीवर काहीही परिणाम झालेला नाही.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी अंकांच्या किमतीत २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे, तर काही अंकांतील वाढ यापेक्षाही जास्त आहे. बाजारात जे काही अंक आले आहेत  त्यात ‘जत्रा’, ‘मोहिनी’, ‘हंस’, ‘नवल’, ‘शतायुषी’, ‘ऋतुरंग’ आणि अन्य नेहमीच्या दर्जेदार अंकांचा समावेश आहे. ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आदी अंकांच्या किमती गेल्या वर्षी ३०० रुपये होत्या. यंदा त्यांची किंमत ४०० रुपये झाली आहे. यंदाच्या वर्षी ‘झी मराठी’ने ‘उत्सव नात्यांचा’ हा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. त्याची किंमत अवघी शंभर रुपये असून त्याला खूप चांगला प्रतिसाद असल्याचेही बागवे यांनी सांगितले.

वाचकांचा प्रतिसाद

दरवर्षी आमच्या ग्रंथालयात फक्त दिवाळी अंक वाचण्यासाठी सुमारे ४०० ते ४५० नवे सभासद होतात. ३५ ते ८० असा वयोगट या वाचकांचा असतो. १५० रुपयांत चार महिने आम्ही हे अंक उपलब्ध करून देतो, अशी माहिती विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांनी दिली. यंदाही वाचकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे त्या म्हणाल्या. दिवाळी अंक वाचक सभासदांना आम्ही द्यायला सुरुवात करतो, तो खास सोहळा असतो. सर्व दिवाळी अंकांचे प्रदर्शन मांडतो. दिवाळी अंक घेण्यासाठी आलेल्या सभासदांना चाफ्याचे फूल देऊन, अत्तर लावून व बर्फी देऊन स्वागत केले जाते. गेली २७ वर्षे आमचा हा उपक्रम सुरू असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

लोकसत्ताची बातमी.साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here