दिलगिरी झाली,विषय संपवायचा ?

0
671

सामचे मिलिंद  तांबे यांच्याशी गुटका मंत्री प्रकाश मेहता यांनी केलेल्या अरेरावीनंतर महाराष्ट्रात माध्यमात सर्वत्र संतापाची लाट उसळली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार राज्यात ठिकठिकाणी पत्रकारांनी निदर्शऩे केली,काळ्या फिती लावून काम केले,तहसिलदार ,कलेक्टरांना निवेदने दिली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या पत्रकार संघटनांच्या पॅरेंट बॉडीच्या पुढाकाराने काल मुंबईतील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘प्रकाश मेहता याचं वागणं अजिमात मान्य करता येण्यासारखं नाही,त्यांबद्दल राज्याचा प्रमुख म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो’ अशा भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यानंतर प्रकाश मेहता यांनीही ट्टिट करून माफी वगैरे मागितली.मात्र आपल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पत्रकारांची दिलगिरी व्य्कत करण्याची वेळ आली याचं वैषम्य प्रकाश मेहता यांना दिसत नाही.त्यामुळे माफी मागून भागणार नाही तर प्रकाश मेहता यांचा राजीनामा किंवा त्यांची बडतर्फी या मागणीवर राज्यातील पत्रकार आजही ठाम आहेत.कारण प्रकाश मेहतांचा स्वभाव असाय की,त्यांना प्रश्‍न विचारलेलं ,प्रश्‍न उपस्थित केलेलं आवडत नाही.ते ज्या भाषेत माध्यमांबद्दल बोलत होते ते बघता त्यांना लोकशाहीतील या चौथ्या स्तंभाबद्दल अजिबात आदर नाही.त्यामुळे अशा व्यक्तीची माफी ही देखील एक प्रकारचा देखावा असू शकते.त्यामुळे त्यांना घरी पाठविले पाहिजे असेच राज्यातील पत्रकारांना वाटते.( मेहतांचा राजीनामा यासाठी हवाय की,पुन्हा अशा एखादया प्रकाश मेहतांची दांडुके,बांबू असे बोलून पत्रकारांना शिविगाळ करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे.)

घटना घडून गेल्यानंतरही माध्यमांना प्रतिक्रिया देताना अत्यंत उद्दाम भाषा वापऱणारे मेहता नंतर माफी मागण्यापर्यत आले याचं कारण वरूनच त्यांचे कान उपटले गेले हे उघड आहे.मात्र अगोदर सर्व प्रकारांकडे हेतूतः दुर्लक्ष करणारे दिल्लीश्‍वर नंतर माफी मागा असा सल्ला मेहतांना देऊन मोकळे झाले याचं कारण पत्रकारांनी दाखविलेली विलक्षण एकजूट हेच आहे. प्रकाश मेहतांच्या अरेरावीची क्लीप पोहोचल्यानंतर अगोदर मराठी चॅनल्स आणि नंतर सर्वभाषीक , नॅशनल चॅनल्सनं ही बातमी अशी काही चालविली की,तिकडे दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही ठसका लागला.असं सांगितलं जातं की,अमित शहा हे प्रकाश मेहतांचे गॉडफादर आहेत.बातम्यांचा दबाव पाहून शहा यांनीच प्रकाश मेहता यांना फोन  करून विषय मिटवा,पक्षाची देशभर बदनामी होत असल्याचा आदेश दिला.त्यानंतर मेहतांची माफी वगैरे आली.त्याबद्दल सर्व  वाहिन्यांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने मनापासून आभार.पूर्वी असं व्हायचं नाही.सामच्या प्रतिनिधीवर हल्ला झाला तर सामचं साम बघून घेईल ,आयबीएन-लोकमवतवर हल्ला झाला तर त्याचं ते बघून घेतील.असे व्हायचे त्याच पध्दतीनं अन्य वाहिन्यांच्या बाबतीतही असंच असायचं.यावेळेस प्रथमच असं घडत होतं की,आपसातील टीआरपीची स्पर्धा बाजूला ठेऊन प्रत्येक वाहिनी आपल्याच पत्रकारावर हल्ला झाल्यासारखं प्रकाश मेहतांवर तुटून पडल्यासारखी दिसत होती.यामुळे माफी मागणार नाही अशी दर्पोक्ती करणार्‍या मुजोर मेहताला ताळ्यावर येत दिलगिरी व्यक्त करावी लागली.हा माध्यमांच्या एकजुटीचा विजय आहे असं मला वाटतं.

आणखी एका गोष्टीचा  आवर्जुन उल्लेख करावा लागेल.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं तर कोणत्याही पत्रकारावर हल्ला झाला तरी तो विषय लावून धरला आहे.असं करताना कधी छोटा-मोठा असा भेदही पाळला नाही.संघटना म्हणून समितीचं ते कामही आहे.मात्र आतापर्यंत ज्या पत्रकारावर हल्ला झाला त्या पत्रकाराच्या पाठिशी व्यवस्थापन खंबीरपणे उभे राहिलंय असं अभावानेच दिसलं.उलटपक्षी ज्या पत्रकारावर हल्ले झाले त्याना वार्‍यावर सोडले गेले,प्रसंगी हल्ले खोरांचीच त्यांच्या घरी जावून माफी मागण्याचे फर्मानही व्यवस्थापनांनी सोडल्याचा इतिहास आहे.काही वेळा दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाल्यानंतरही व्यवस्थापनांनी प्रकरण मिटविण्याचाच प्रयत्न केला.या सार्‍या पार्श्‍वभूमीवर सामचे व्यवस्थापन आणि संपादक संजय आवटे यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की,ते खंबीरपणे मिलिंद तांबे यांच्या पाठिशी उभे राहिले.सकाळनेही हा विषय लावून धरला.संजय आवटे यांनी महाड एमआयडीसीत जावून प्रकाश मेहता यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही दिली.ही त्यांची कृती नव्या पत्रकारांना उमेद देणारी आहे,विश्‍वास देणारी आणि शोध शोध पत्रकारिता किंवा समाजहिताची पत्रकारिता करताना कोणालाही अंगावर घेम्याची जिगर दाखवायला बळ देणारी आहे हे नक्की .  सर्वच व्यवस्थापन आणि संपादकांनी असा दृष्टीकोन ठेवला तर कायदा केला नाही तर हल्ले नक्कीच कमी होतील. एखादया पत्रकारावर हल्ला झाला तर संपादकांनीच हल्लेखोरांवर गुन्हे दाखल कऱणे हा देखील एक महत्वाचा आणि परिणामकारक  उपाय ठरू शकणार आहे.

प्रकाश मेहताप्रकऱणावरून आणखी एक गोष्ट दिसून आली.राज्यातील पत्रकार आता पुरते एकसंध झाले आहेत.कुठं काही झालं की,सारे एकत्र होऊन आक्रमकपणे तुटून पडतात.अनेकजणआम्हाला  विचारतात तुम्ही सात-आठ वषे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी चळवळ चालवत आहात त्याचं फलित काय ? पत्रकार एक झालेत हेच आमच्या चळवळीचं मोठ्ट यश आहे असं आम्हाला  वाटतं.पुर्वी ज्याच्यावर हल्ला झाला तो किती मोठा पत्रकार आहे,तो कोणत्या पत्राचा किंवा वाहिनीचा आहे,तो साप्ताहिकाचा आहे की,दैनिकाचा तो वाहिनीचा आहे की प्रिन्टचा हे सारे भेद बघून निषेध करायचा की नाही ते ठरविले जायचे .आज ही स्थिती नाही.पत्रकार मग तो कुठलाही असो त्याच्यावर अन्याय झाला की,सारे पत्रकार,पत्रकार संघटना एक होतात,भेद विसरतात आणि संबंधितांनी अद्दल घडवितात हा फार मोठा बदल झालेला आहे आणि ते केवळ आपल्या चळवळीमुळे हे मी नमूद करू इच्छितो.पत्रकारांची ही एकजूट हितसंबंधीयांच्या डोळ्यात खुपणार हे वेगळं सांगायला नको.पुर्वी अनेकजण जाहिरपणेही असे  बोलायचे  की पत्रकार ही जमात बुध्दीजिवी असल्यानं दोन पत्रकार एकत्र येऊ शकत नाहीत ,विविध पातळ्यावर पत्रकारांनी एकत्र येऊ नये म्हणूनही प्रयत्न व्हायचे.आज आपल्या हक्कासाठी आपल्यावर होणार्‍या अन्यायासाठी पत्रकार सारे भेद विसरून एकत्र येत असल्याने काही भक्तांचा पोटशूळ उठला असल्यास नवल नाही.मग त्यांनी पत्रकारांच्या विरोधात सोशल मिडियावर गरळ ओकायला सुरूवात केली आहे.पत्रकारांनी कसं वागावं,? पत्रकारांनी काय करावं,? पत्रकार कसे चुकतात?  यावर प्रवचण देणार्‍या काही पोस्ट कालपासून फिरत आहेत.हे होणारच.पत्रकार एकत्र आल्याने काहींची पोटदुखी होणार .अशा  पोस्टनी आपण विचलित होण्याचं कारण नाही.जे अशा पोस्ट फिरवित आहेत ते बायस आहेत.माध्यम नसती तर देशात आणि राज्यात आज काय घडलं असतं याची कल्पना त्या बिचार्‍यांना नाही म्हणून ते असं बोलतात.माध्यमांचा दबाव आहे म्हणून सारे बदमाश सरळ आहेत.याला कोणी  मिडिया ट्रायल म्हणोत की आणखी काही.आम्ही करतो ती मिडिया ट्रायल आणि तुम्ही जनतेशी वागता ते काय ? हा प्रश्‍न उरतो.त्यामुळे अशा पोस्टची फार चिंता न करता आपण आपली एकी कायम ठेवली पाहिजे एवढीच विनंती .  मिलिंद ताबे या तरूण ,धडाडीच्या पत्रकारास न्याय मिळवून देण्यासाठी आणि मग्रुर प्रकाश मेहतांना अद्यल घडविण्यासाठी  ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांचा मी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आभारी आहे रायगडमधील पत्रकारांचेही आम्ही विशेष आभारी आहोत कारण मेहता हे रायगडचे पालकमंत्री आहेत,रायगडच्या प्रश्‍नांशी त्यांना काही देणं-घेणं नाही.त्यामुळे रायगडचे पत्रकार अगोदरच मेहतांवर चिडलेले आहेत.त्यातच ही घटनाही रायगडात घडलेली त्यामुळे घटना समोर आल्यानंतर रायगडमधील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत आठदिवसांसाठी प्रकाश मेहतांच्या बातम्यांवर बहिष्कार टाकला आहे.ही त्यांची कृती योग्य की अयोग्य यावर तात्विक चर्चा कऱणार्‍यांना करू द्या,पण नाठाळाशी असावे नाठाळ या न्यायाने रायगडच्या पत्रकारांच्या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभारही मानतो.

 एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here