“ताऱिफ ए काबिल”

0
875

मुंबई : घरच्या गरिबीवर मात करत, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणा-या गुणवंतांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. ‘मिशन झी 24 तास, संघर्षाला हवी साथ’ या सामाजिक मोहीमेच्या माध्यमातून, या गुणवंत विद्यार्थ्यांना भरभरून आर्थिक मदत देण्यात आली… त्यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून मदतीचे हात पुढे आलेत.

यंदा दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारी कोल्हापूरची नेहा पाटील. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत, शिक्षण घेणा-या नेहासारख्या 24 गुणवंत विद्यार्थ्यांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. परिस्थितीशी झगडत, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणा-या गुणवंतांची स्वप्नं साकार व्हावीत, त्यांच्या पंखांना बळ मिळावं, यासाठी झी मीडियानं खास मोहीम राबवली.

मिशन झी 24 तास, संघर्षाला हवी साथ… आम्ही असं आवाहन केलं आणि महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या कानाकोप-यातून मदतीचे हात पुढे आले. या सर्व गुणवंतांचा कौतुकसोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाला. या विद्यार्थ्यांची पाठ कौतुकानं थोपटण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, सिने दिग्दर्शक अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री उषा जाधव आदी मान्यवर यावेळी आवर्जुन उपस्थित होते.

या कष्टकरी, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संघर्षकथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांचे डोळे अक्षरशः पाणावले. काही विद्यार्थी या कौतुकसोहळ्यानं एवढे भारावून गेले की, त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना..पण तिच्या या निःशब्द भावनाच खूप काही बोलून गेल्या. हा हृदयस्पर्शी भावसोहळा पाहताना उपस्थित मान्यवरांनाही गहिवरून आले.

महाराष्ट्राची धैर्यकन्या मोनिका मोरे हिचा देखील याप्रसंगी खास सत्कार करण्यात आला. तर अत्यंत सकारात्मक अशी ही मोहीम राबवल्याबद्दल सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही झी मीडियाचे खास कौतुक केलं. यापुढंही संघर्षाला साथ देण्याचं हे मिशन अव्याहतपणे सुरू राहिल, अशी ग्वाही झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी यावेळी दिली.

सामाजिक उपक्रमांमध्ये झी मीडियाचं नेहमीच एक पाऊल पुढं राहिलाय. त्याचा पुनर्प्रत्यय यानिमित्तानं आला. झी 24 तास…राहा एक पाऊल पुढे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here