Reporters Without Borders  नावाची संस्था जगभराच्या माध्यमातील घडामोडींवर लक्ष ठेऊन असते.पत्रकारांवर होणारे हल्ले,हत्या,बेकायदेशीर अटका,विविध पध्दतीनं माध्यमांचा आवाज बंद करण्याचा होणारा प्रयत्न आदि विषयावर संस्था संशोधन करून आपले निष्कर्ष जगासमोर मांडते.अलिकडंच संस्थेनं एक अहवाल प्रसिध्द केलाय.Online Harassment Of Journalists  असं या अहवालाचं शिर्षक आहे.आधुनिक तंत्राचा वापर करून जगभरातील माध्यम विरोधी आणि प्रामुख्यानं सत्तेची जवळीक सांगणारे  घटक  आपल्या ट्रोल आर्मीच्या सहाय्यानं, सोशल मिडियाच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा कसा प्रयत्न करतात  यावर अहवालात प्रकाश टाकण्यात आलाय .शोध पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची काही उदाहरणे देऊन त्यांना नामोहरम करण्याचा कसा प्रयत्न झाला याची माहिती अहवालात देण्यात आली आहे .चीन,भारत,टुर्की,व्हिएतनाम,इराण,अल्जेरिया आदि देशांचा उल्लेख करून सरकार आणि ट्रोल आर्मीचा संबंध असल्याचा दावाही अहवालात केला गेलाय.पत्रकारांना ‘लक्ष्य’ करणं,त्यांनी सोशल मिडियावरून अवमानित करणं,आणि प्रसंगी धमकावणं अशा घटना जगभर सर्रास सुरू असल्याचं ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’चं म्हणणं आहे.भारताच्या संदर्भात ‘योध्दा’ नावाची ट्रोल आर्मी सरकारी धोरणांचा  विरोध करणार्‍या किंवा जे सरकारधार्जिणे नाहीत अशा पत्रकारांवर  कशी तुटून पडते याची माहिती अहवालात सप्रमाण दिली गेलीय .त्यासाठी स्वतंत्र व्यवसायी पत्रकार राणा अय्युब याचं उदाहरण दिलं गेलं आहे.राणा यांना देशद्रोही समजून त्यांच्यावर किती खालच्या पातळीवरून हल्ले केले याची माहिती अहवालात आलीय . .त्यांची वेश्या अशा शब्दात संभावना केल्याचंही आणि .देशातील 75 टक्के महिला पत्रकार कधी ना कधी अशा ट्रोल आर्मीच्या हल्ल्याच्या शिकार झाल्याचं अहवालात नमुद केलं गेलंय.हल्ले करणारे अनेकजण असतात,बचाव करणारा पत्रकार एकटाच,एकाकी असतो.त्यामुळं तो हतबल होतो.निराश होतो.शेवटी हल्ल्याच्या माऱ्याने  गप्प बसतो.ही कार्यपध्दती आहे या आर्मीची.देशातील अनेक पत्रकार या ऑनलाईन हल्ल्याचे शिकार झालेत.पुण्य प्रसून वाजपेयींना कोणत्या कारणांमुळं एबीपी न्यूजचा राजीनामा द्यावा लागला हे सर्वश्रूत आहे.त्यांच्या समर्थनार्थ जेव्हा अनेकजण पुढं आले तेव्हा सारे ‘योध्दे’ जागे झाले आणि पुण्य प्रसूनची पोलखोल (?) करणार्‍या पोस्ट व्हायरल व्हायला लागल्या.जगभरातील अशा अनेक घटनांचा उल्लेख अहवालात आहे.

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरचा हा अहवाल प्रसिध्द होत असतानाच भारतात India Against Biased Media  नावाच्या संस्थेची स्थापना होणं हा योगायोग नसावा.ऑनलाईन हल्ले अधिक संघटीत स्वरूपात करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच ही संस्था उदयाला आली हे उघड आहे . याचा अर्थ ही संस्था स्थापन होण्यापुर्वी मिडियावर असा ‘वॉच’ ठेवला जात नव्हता असं नाही.पूण्यप्रसून वाजपेयी यांच्या एका लेखात दिल्लीतील केंद्रीय माहिती आणि सूचना कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर 200 जणांची एक फोज वाहिन्यांवर नजर ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचा उल्लेख आला होता.कोणत्या चॅनलवर कोणते कार्यक्रम झाले,नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कोणत्या चॅनलनं किती वेळा दाखविलं,राहूल गांधींना किती वेळा दाखविलं इथंपासून ते प्राईम टाइममध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली,कोणी सहभाग घेतला याची सारी माहिती ठेवली जाते.नंतर ती संकलीत करून वरिष्ठांना सादर केली जाते असं वाजपेयींनी म्हटलं होतं.ट्रोल आर्मी देखील कार्यरत आहेच.ऑनलाईन अ‍ॅटॅकहो होत राहिलेले आहेतच.मात्र आता अधिकृत आणि संघटीतपणे  हे काम होणार आहे .इंडिया अगेंन्स्ट बायस मिडियामुळे  पत्रकारांवरील ऑनलाईन हल्ले वाढणार यात शंका नाही. ‘आयएबीएम’ असा हैशटॅग वापरून या संघटनेत भरती होण्याचं आवाहन केलं गेलं आहे.पायलट ,अभियंता राहिलेले विपूल सक्सेना आणि दिल्लीचे वकील विभोर आनंद हे या संघटनेचे संस्थापक आहेत.विपूल यांनी ट्टिटरव्दारे आपली संघटना गैरराजकीय असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांच्या ट्टिटरवर वरच्या बाजुला नरेंद्र मोदींचा फोटो दिसतो .शिवाय ज्या मोजक्या ‘महानुभावांना’ मोदी ट्टिटरवरून फॉलो करतात त्यात विपूल महाशय आहेत . स्वाभाविक  त्यांना त्याचा अभिमानही आहे.वियूष गोयल,भाजपा प्रवक्ता तेजिंदर सिंह बग्गा,आणि माजी खासदार तरूण विजय देखील विपूल यांना फॉलो करतात.यावरून ही संघटना कोणी पुरस्कृत केलेली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही .सत्तेची शक्ती लाभलेली असल्यानं विपूल सक्सेना पत्रकारांना सरळ सऱळ धमक्या देत आहेत.एका ट्टिटमध्ये ते म्हणतात,’होय,आम्ही पत्रकारांवर हल्ले करतो आहोत,पण लोकांना माहिती आहे की,आम्ही त्याच लोकांवर हल्ले करतो आहोत की जे खोटया बातम्या प्रसारित करून लोकांमध्ये भिती निर्माण करीत आहेत’.विपूल सक्सेना यांना जे पत्रकार मान्य नाहीत त्यांना ट्रोल केलं जाणार तर आहेच त्याचबरोबर त्यांच्याविरोधात कोर्टात खटले दाखल केले जाणार आहेत.एवढंच नव्हे तर पत्रकार ज्या मिडिया संस्थेत काम करतात त्यांच्या मालकांना  बोलून पत्रकारांच्या नोकर्‍यांवर देखील टाच आणली जाणार आहे.इंडिया अंगेन्स्ट बायस मिडियाचे उद्देश पाहून अस्वस्थ झालेल्या रिपोर्टर विदाऊट बॉर्डरचे डेनियल बास्टर्ड यांनी भारत सरकारला विनंती केलीय की,’विपूल सक्सेना यांच्या या संघटनेवर बंदी घातली पाहिजे.ही संघटना केवळ ऑनलाईन हल्लेच करते असं नाही तर थेट खुनाच्या देखील धमक्या देत आहे’ विविध पध्दतानं माध्यमांवर दबाव आणणार्‍या अशा संघटनांवर बंदी घातली गेली पाहिजे अशी मराठी पत्रकार परिषदेची देखील मागणी आहे.

पत्रकारांना ‘शांत’ करण्याचे वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत.विपूल सक्सेना यांच्या सारख्या संघटना गावोगाव निर्माण झाल्या आणि त्या प्रत्येक बातमीवर आक्षेप घेऊन पत्रकारांना ट्रोल करू लागल्या,कोर्टात खेचू लागल्या किंवा त्यांच्या नोकर्‍यांवर गदा आणू लागल्या तर  पत्रकारांसाठी ही परिस्थिती आणीबाणीपेक्षा वाईट होईल.भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणत असलो तरी मिडियाला ‘शेट अप’ करायला लावण्यासाठी ज्या ज्या हालचाली सुरू आहेत,जे हातखंडे वापरले जात आहेत ते बघता भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्य हे केवळ कागदावरच दिसणारे स्वातंत्र्य आहे असंच म्हणावं लागेल.एकीकडं पाकिस्तानमध्ये सरकारी माध्यमांना स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न नवं सरकार करू लागलेलें असताना भारतात मात्र वृत्तपत्र स्वातत्र्यांचा संकोच केला जात आहे..त्यासाठी उघडपणे संघटना स्थापन करून त्यांना मदत केली जात आहे हे सारं नक्कीच संतापजनक आहे.वैचारिक मतभिन्नता बाजूला ठेऊन पत्रकारांनी  आणि पत्रकार संघटनांनी याचा विरोध केला पाहिजे.

एस एम.देशमुख 

2 COMMENTS

  1. पत्रकारांना नामोहरन करणे हे सगळे उद्योग आता गावपातळीवर सुरू झाले आहेत.त्यात वृत्तपत्रेही सहभागी होवू लागली आहेत.काट्याने काटा काढायचा ही निती अवलंबली जाते.जो पाहीजे तसी बातमी पाठवत नाही जाहीरात धंदा करत नाही त्याला सळोकीपळो करून सोडायचे आपल्या गटात बसत नाही त्याला उगाचच झापायचे नको त्या गोष्टींचा आग्रह करायचा हे बाहेर सुरू आहे तसे आतही सुरू आहे.हा पण हल्लाच आहे.पत्रकारांचे विरोधक कोण याची माहीती घ्यायची व त्यांना पत्रकारांच्या अंगावर सोडायचे मानधन कमी मिळेल याची आखणी करायची.जाहीरातीच्या कमीशन मध्ये विविध कारणे दाखवून काटछाट करायची.चेक परत गेल्यावर अवाच्या सव्वा दंड आकारायचा लायकी नसणारे पत्रकारांच्या बोकांडी बसवायचे हेपण याचाच भाग आहे

  2. महत्वाची सखोल बातमी, पत्रकारांचे शिरोमणी आदरणीय एस.एम.देशमुख साहेबांनी आपल्या लेखातून दिली आहे
    सर्व पत्रकारासाठी उपयुक्त अशी आ हे. धन्यवाद सर.— एम.बी.पटवारी, ऊदगीर
    🙏🙏

Leave a Reply to M.B.atwari, senior​ jur alistair​ UDGIR Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here