‘जनशक्ती’ला शुभेच्छा देताना…

0
1287

जच्या भांडवलदारी वृत्तjanshaktiपत्रांना चळवळींशी काही देणं-घेणं नसलं तरी एक काळ असा होता की,चळवळी उभ्या करण्याचं आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम मराठी वृत्तपत्रांनी चोखपणे पार पाडलं होतं.जळगावचा जनशक्ती,नांदेडचा प्रजावाणी,औरंगाबादचा मराठवाडा,अलिबागचा कृषीवल,सोलापूरचा संचार,बेळगावचा तरूण भारत,अमरावतीचा हिंदुस्थान,धुळ्याचा आपला महाराष्ट्र ,नाशिकचा गावकरी,सातार्‍याचा ऐक्य.फटकन आठवणारी ही काही नावं . .ही नामावली बरीच मोठी आहे.या वृत्तपत्रांनी आपआपल्या भाागातील लोक लढे लढले,त्याचं नेतृत्व केलं,आणि सामांन्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, आणीबाणी विरोधी लढा असो ,शेतकर्‍यांचे प्रश्‍न असोत,कामगारांचे विषय असोत की,जनसामांन्यांचे प्रश्‍न असोत ही  वृत्तपत्रे तुटून पडत.त्यामुळे आपआपल्या भागात या पत्रांचा नक्कीच दबदबा होता.वृत्तपत्राचे संपादक काय म्हणतात ?  याची दखल राज्यकर्त्याना ध्यावीच लागायची.या पत्रांच्या संपादकांची  मालकांची नाळही चळवळीशी जोडली गेलेली असल्यानं ते पोटतिडकीने विषय मांडत.ते लावून धरत.त्यामुळे या पत्रांना आणि त्यांच्या संपादकांना जनमानसात कमालीचे आदराचे स्थान असे.जनशक्तीकार ब्रिजलाल पाटील अशा चळवळ्या संपादकांचे मुकुटमनी होते.त्यानी जनशक्ती अगोदर साप्ताहिक स्वरूपात सुरू केला.हे व्यासपीठ पुरेसं नाही असं दिसल्यावर त्याचं दैनिकात रूपांतर केलं आणि मग त्यानी जनसामांन्यांची बाजू घेत चौफेर लेखणी चालविली.ते बोलके समाजसुधारक नव्हते तर ते कोणत्याही कार्याची सुरूवात स्वतःपासून करणारे सच्चे समाजसुधारक होते.त्यांनी 60-65 वर्षांपूर्वी जातीपातीचा पगडा असताना आंतरजातीय विवाह करून तरूणांना जातीपातीची बंधनं तोडण्याचा मार्ग दाखविला होता.समाजवादी पक्षाचं संघटन करताना त्यानी अनेकदा तुरूंगवारी ही  पत्करली होती.1956 मध्ये त्यांनी जनशक्तीला सुरूवात केली आणि नंतरच्या काळात हे पत्र चळवळीचे आणि जळगाव भागातील जनतेचे मुखपत्र बनले.संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल किंवा आणीबाणी असेल जनशक्तीनं सर्वशक्तीनिशी जनमत संघटीत कऱण्याची भूमिका पार पाडली.सामांन्यांचे प्रश्‍नही त्यानी तेवढ्याच तडफेने मांडले .त्यामुळे लोकाना जनशक्ती आपला वाटायचा.जनशक्तीला मोठा जनाधार मिळाला तो त्यामुळेच.ब्रिजलाल पाटलांच्या निधनानंतर मात्र जनशक्तीचा दरारा क्रमशःकमी होत गेला.भाऊबंदकीत वर्तमानपत्राची वाताहत झाली.आज जनशक्तीचं मॅनेजमेंट वेगळ्या कंपनीकडे आहे,मात्र जनशक्ती ब्रिजलाल पाटलांनी कोणत्या हेतून काढला होता याचा विसर नव्या व्यवस्थेला पडलेला नाही ही त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे.जनशक्ती नव्या तंत्राच्या सहाय्यनं प्रसिध्द होतोय आणि त्यातून लोकांचे प्रश्‍न त्याच तडफेने मांडले जातात ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.जनशक्तीला आमच्या मनापासून शुभेच्छा.

जनशक्ती आणि ब्रिजलाल पाटील यांच्याबद्दल आमच्या मनात विशेष आपुलकी आहे.याचं कारण ब्रिजलाल पाटील हे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होते.पत्रकारांच्या हक्कासाठी आम्ही लढत असताना अनेकांना हा टिंगलीचा विषय वाटतो मात्र आमच्यासमोर आदर्श आहे तो ब्रिजलाल पाटील,रंगाअण्णा वैद्य,अनंत भालेराव,दादासाहेब पोतनीस आदिंचा.या सर्वांनी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठविला,आपली लेखणीही चालविली.आम्हीही तसाच प्रयत्न करतो आहोत. ब्रिजलाल पाटलांच्या पुढाकारानेच 1962 मध्ये जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाची स्थापना झाली होती.आणि तेव्हापासून ते पत्रकारांच्या हक्काच्या चळवळीशी जोडले गेलेले होते.बिहार प्रेस बिलाच्या विरोधात राज्यात मराठी पत्रकार परिषदेने जे आंदोलन केले होते त्यातही ब्रिजलाल भाऊ सक्रिय होते.पत्रकारांच्या हक्काबरोबरच पत्रकारांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे यासाठी त्यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असायचे . त्यानी मराठी पत्रकार परिषदेचे जळगावला अधिवेशनही घेतले होते.त्या अधिवेशनाचे बाबुराव ठाकुर हे अध्यक्ष होते.नंतर ब्रिजलाल पाटील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यात सक्रीय झाले.1978 मद्ये नाशिक येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.निधडया छातीचा पत्रकार,सिध्दहस्त लेखक असलेले ब्रिजलाल पाटील आयुष्यभर समाजवादी विचारांची कास धरून जगले,गरिबांबद्दल कमालीची कणव असलेला,त्यांच्यासाठी लेखणी झिजविणारा हा झुंजार पत्रकार 15 नोव्हेंबर 1989 रोजी आपल्यातून निघून गेला असला तरी जनशक्तीच्या माध्यमातून ते आजही आपल्यामध्ये आहेत याचा आनंद होतो.जनशक्तीचा 31 जुलैला वर्धापन दिन साजरा होत असताना ब्रिजलाल भाऊंचा जनशक्ती वर्षानुवर्षे पुर्वीच्या तेजाने तळपत राहो एवढीच मनोकामना व्यक्त करतो ( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here