गोपाळ साक्रीकर यांना पुरस्कार’

0
863

—-
शर्मिष्ठा भोसले यांना युवा पत्रकारिता पुरस्कार
—–
औरगाबाद, ता. 18 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा “अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना; तर युवा पत्रकारिता पुरस्कार मुक्‍त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नीरज वैद्य यांनी शनिवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत दिली.
वैद्य म्हणाले, “”गेल्या पाच वर्षांपासून वैद्य यांच्या स्मृतिदिनी पत्रकारितेतील ज्येष्ठ व्यक्‍तीला वैद्य स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा हा पुरस्कार येथूनच पत्रकारिता सुरू केलेले ज्येष्ठ पत्रकार श्री. साक्रीकर यांना देण्यात येत आहे. तसेच यंदापासून ज्येष्ठांसोबतच युवा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवा पत्रकारिता पुरस्कार मुक्‍त पत्रकार, शर्मिष्ठा शशांक भोसले यांना दिला जाईल. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 5 हजार रुपये या पुरस्कारचे स्वरुप असेल,” अशी माहिती त्यांनी दिली. श्री. साक्रीकर यांनी दैनिक अंजिठापासून पत्रकारितेस सुरवात केली. मराठवाडा, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ या वृत्तपत्रामधून त्यांनी निष्ठेनी आपली लेखणी चालवली. आणीबाणीच्या काळ, नामांतर आंदोलन, मराठवाडा विकासाचे आंदोलन, विविध सामाजिक समस्या आपल्या लेखनीतून निर्भिडपणे मांडल्या. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला व साहित्य क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच विविध सामाजिक विषयांवर भाष्य करीत विचार करण्यास भाग पाडायला लावणारे लेखन शर्मिष्ठा यांच्याकडून केले जात आहे. त्यांना यापूर्वी प्रियांका डहाळे युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्या सध्या “मीडिया वॉच’ या त्रैमासिकांच्या कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. 29 मार्चला मराठवाडा महसूल प्रबोधीनीचे सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल. यापूर्वी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर, निळू दामले, शांतारामबापू जोशी, विद्याभाऊ सदावर्ते, जीवनधर शहरकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, प्रमोद माने, संजय वरकड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here