कोण आहेत देवेंद्र फडणवीस ?

0
969

 

कोण आहेत देवेंद्र फडणवीस-

 विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील मूल हे फडणवीस यांचे मुळ गाव. फडणवीस कुटुंब हे मूल गावातील पिढीजात मालगुजर अर्थात वतनदार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर देवेंद्र यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस यांनी जनसंघाचे कार्य सुरू केले. विदर्भात जनसंघ (भाजप) रूजवण्यात आणि फुलवण्यात गंगाधरपंत यांचा वाटा मोलाचा राहिला. कालांतराने गंगाधरपंत हे भाजपतर्फे विधान परिषदेचे सदस्य झाले.

 याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस या चारवेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. याशिवाय त्या एकदा विधान परिषदेच्या सदस्यही राहिल्या आहेत. याशिवाय 1995 साली युती सरकारच्या काळात त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शोभाताईंच्या बाबतीत असं सांगितलं जातं की त्यांनी, सायकलवर फिरून पक्षाची बांधणी केली.

 देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. देवेंद्र फडणवीस यांचे स्वताचे कष्टही महत्वाचे आहेत. देवेंद्र अवघ्या 17 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच गंगाधरपंतांचे निधन झाले. त्यानंतर गंगाधरपंतांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.

 देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. विशेष म्हणजे, 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

 विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू व व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे.

 देवेंद्र फडणवीसांनी आपली स्वच्छ प्रतिमा कसोशिने जपली आहे. आजवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा राजकीय तडजोडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कदाचित या गुणांमुळेच वयाच्या 44 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या जवळपास पोहोचले आहेत. आजवर वायाच्या 37 व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री म्हणून पुढे येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here